Join us

जनावरांनाही 'ॲसिडिटी' सारखा त्रास; काय आहेत कारणे अन् उपाय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:30 IST

Agriculture News : माणसांप्रमाणेच जनावरांनाही, विशेषतः गाई-म्हशींसारख्या रवंथ करणाऱ्या प्राण्यांना 'ॲसिडिटी 'सदृश (Acidity) त्रास होऊ शकतो.

गोंदिया : माणसांप्रमाणेच जनावरांनाही, विशेषतः गाई-म्हशींसारख्या रवंथ करणाऱ्या प्राण्यांना 'ॲसिडिटी 'सदृश (Acidity) त्रास होऊ शकतो, ज्याला वैद्यकीय भाषेत 'आम्लविषार' (ॲसिडॉसिस) म्हणतात. हा विकार गंभीर असून, वेळीच उपचार न मिळाल्यास जनावरांचा जीवही जाऊ शकतो.

हा आजार जनावरांमध्ये (Animal Disease) काही प्रमाणात वाढू लागला आहे. मात्र, याबाबतची माहिती शेतकऱ्यांना फारशी समजत नाही. तसेच जनावरांना होणारा त्रासदेखील लक्षात येत नाही, अनेकदा गाई-म्हर्शीच्या शरीरात काही बदल झाल्यानंतरच हा त्रास समजत असतो. यासाठी वेळोवेळी तपासणी करावी.

आम्लविषार व आम्लपित्त यात फरक काय?आम्लविषार रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये होते. तर आम्लपित्त म्हणजेच ॲसिडिटी ही माणसांमध्ये होते. आम्लविषारमुळे जनावरांच्या पचनसंस्थेचे गंभीर नुकसान होऊन जिवाणूंचा असमतोल, विषारी पदार्थ निर्मिती होते. ॲसिडिटीमुळे छातीत जळजळ, अपचन, उलटीची भावना, गॅस होते.

पचनसंस्थेत बिघाड, आतड्यांत अन्न पचत नाही तर कुजतेआम्लविषारामुळे पचनसंस्थेतील नैसर्गिक प्रक्रिया बिघडते. यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही, उलट ते आतड्यांमध्ये कुजायला लागते. या कुजण्यामुळे विषारी वायू आणि इतर हानिकारक पदार्थ तयार होतात, जे जनावरांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतात.

जनावरांना आम्लविषार होण्याची कारणे काय?अचानक आहार बदल : जनावरांच्या आहारात अचानक जास्त प्रमाणात धान्य (मका, गहू, बार्ली) किंवा पिठासारखे घटक समाविष्ट करणे.अत्याधिक धान्य सेवन : जनावरांना त्यांच्या गरजेपेक्षा जास्त प्रमाणात धान्य किंवा उच्च कर्बोदके असलेले खाद्य देणे. निकृष्ट चारा : कमी दर्जाचा किंवा अपुरा चारा दिल्याने जनावरे जास्त प्रमाणात धान्य खाण्यास प्रवृत्त होतात. चुकीचे आहार नियोजन : जनावरांना योग्य प्रमाणात चारा आणि धान्याचे संतुलन नसणे.

पचनसंस्थेत अत्याधिक आम्ल वाढल्याचा परिणामजनावरांच्या पचनसंस्थेतील, विशेषतः 'रुमेन' नावाच्या पहिल्या पोटात, जेव्हा जास्त प्रमाणात कर्बोदके अचानक आणि जलद पचतात, तेव्हा लॅक्टिक आम्ल मोठ्या प्रमाणात तयार होते. यामुळे रुमेनचा सामू वेगाने कमी होतो, ज्यामुळे तेथील उपयुक्त जीवाणू मरतात आणि हानिकारक जिवाणूंची वाढ होते. या असंतुलनामुळे जनावरांच्या पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होतो.

आम्लविषार झाल्यास जनावराची लक्षणे : 

  • जनावर सुस्त होते आणि खाणे कमी करते
  • जनावर सुस्त होते आणि खाणे कमी करते किंवा पूर्णपणे बंद करते. 
  • स्वंथ करणे थांबवते. 
  • अतिसार होतो, कधीकधी शेण फेसयुक्त किंवा रक्ताचे असू शकते. 
  • पोट फुगते, दात चावणे किंवा कचकचणे, पायांवर सूज येऊ शकते.
  • आम्लविषाराची लक्षणे दिसताच तत्काळ पशुवैद्यकाशी संपर्क साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 
  • पशुवैद्यक जनावराची तपासणी करून योग्य निदान करतील आणि त्यानुसार उपचार सुरू करतील.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीपेरणी