Join us

रखरखत्या उन्हामुळे पशुधनाचे दूध आटले, उत्पादनातही घट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 9:42 AM

शेतीला जोड व्यवसाय म्हणून आणि आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांचा पशुपालनाकडे कल आहे.

रखरखत्या उन्हामुळे जीवाची काहिली होत आहे. पशुधनासाठी हिरवा चारा मिळेनासा झाला आहे. पशुधनास उसाचे वाडे, सोयाबीन गुळीवर गुजराण करावी लागत आहे. परिणामी, जिल्ह्यातील पशुधनाचे दूध आटल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. जानेवारीच्या तुलनेत एप्रिल अखेरीस जवळपास २१.६३ टक्क्यांनी घट झाली आहे.

शेतीला जोड व्यवसाय म्हणून आणि आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांचा पशुपालनाकडे कल आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे लातूर  जिल्ह्यातील पशुधनाच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या तर वैशाख वणवाच सुरू आहे. तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. त्याचा परिणाम, मानवी आरोग्यावर होत आहे.

 लातूर जिल्ह्यात दोनच सहकारी संस्था

दूध संकलनासाठी जिल्ह्यात शासकीय चार संस्थांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही वर्षापासून त्या बंद पडून आहेत.

सध्या जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर दोन संस्था आहेत. त्यात जिल्हा संघ आणि मांजरा तालुका संघाचा समावेश आहे. एप्रिल अखेरीस जिल्हा दूध संघात केवळ ६ हजार ९१५ लिटर दूध संकलन होते.

दुसऱ्या सहकारी संस्थेचे दूध संकलन सहा वर्षांपासून बंद आहे. खासगी तत्त्वावर १२ संस्था आहेत. त्यात १ लाख ७४ हजार ९२ लिटर दूध संकलित होत आहे.

जिल्ह्यातील सर्व दूध हैदराबादला

जिल्ह्यात संकलित होणारे संपूर्ण दूध हे हैदराबादला पाठविण्यात येते. त्यामुळे लातुरातील दुधाचा उपयोग परराज्यात होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. याउलट लातुरात परजिल्ह्यातील दूध मोठ्या प्रमाणात येते.

उन्हाळ्यामुळे दूध उत्पादनास फटका

दरवर्षी उन्हाळ्याच्या कालावधीत दूध उत्पादनात घट होते. फेब्रुवारीमध्ये जिल्ह्यात २ लाख ४० हजार ५१३ लिटर दूध संकलित होत होते. सध्या १ लाख ८१ हजार ०७ लिटर दूध संकलित होते. जवळपास ५९ हजार ५०६ लिटर दूध घटले आहे. हे सर्व दूध हैदराबादला जाते.- एम.एस. लटपटे, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दूध)हिरव्या चाऱ्याचा अभाव, उन्हाचा ताण

उन्हाळ्यात पशुधनास हिरवा चारा। मिळत नाही. त्यामुळे सोयाबीन गुळी, उसाचे वाडे, कडबा अशा चाऱ्यावर पशुधनाची गुजराण होते. याशिवाय, उन्हाची तीव्रता सहन करण्यात पशुधनाची ऊर्जा मोठ्या प्रमाणात खर्च होते. तसेच उन्हामुळे पशुधनावरही ताण वाढतो. अशा विविध कारणांमुळे दूध उत्पादन घटते. - डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंर्वधन अधिकारी

टॅग्स :दुग्धव्यवसायतापमानगायदूध