Join us

दिवाळी पाडव्याला या गावात होते म्हशींची पूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 14:52 IST

बलिप्रतिपदा अर्थातच दिवाळी पाडव्याच्या दिवशी अनेक ठिकाणी म्हशींची पूजा करण्याची प्रथा आहे. नाशिक जिल्ह्यातील गावातही अशीच प्रथा जोपासली जाते. जाणून घेऊ त्याविषयी...

 रविंद्र शिऊरकर

दिवाळी मध्ये लक्ष्मीपूजेनंतर येतो तो म्हणजे दिवाळी पाडवा अर्थात बळीप्रतिपदा या दिवशी सर्वसाधारणपणे शेतकरी बळीराजाची पूजा करतात. मात्र गवळी समाज या दिवशी आपल्याकडील म्हशींना सकाळी स्वच्छ धुवून काढतात. सजवतात. त्यांची दुपारी सर्व समाजाच्या वतीने गोवर्धन पूजा मांडली जाते तिथून मिरवणूक काढली जाते. घरोघरी पूजन केले जाते. म्हशींना व रेड्यांना नैवेद्य दिला जातो. 

कर्नाटक मधून महाराष्ट्रात पोटापाण्याच्या हेतूने आलेला वीरशैव लिंगायत गवळी समाज सध्या महाराष्ट्राच्या विविध भागात वास्तव्यास आहे. गाय आणि म्हशीच्या दुधाची विक्री करणे, तूप, दही, ताक आदींची निर्मिती करणे या गवळी समाजाचा मुख्य व्यवसाय.  या समाजातील साधारण ४०० ते ४५० नागरिकांची ११० घरांची गवळी वाडा म्हणून एक वस्ती नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी पासून अवघ्या एक किमीवरच्या सावरगाव रस्त्यावर आहे.

म्हशीला सर्वोच्च स्थान काळानुसार काही अंशी गवळी समाजाकडे सध्या गाई आहेत. पण पूर्वीपासून या समाजात म्हशीला सर्वोच्च स्थान असल्याचे समाजाचे जाणकार सांगतात. या म्हशीच्या दुधावर इथल्या गवळी समाजाची पिढ्यान‌्पिढ्या प्रगती होत आलेली आहे. घरे, शेती, मुलांचे शिक्षण, लग्न, असं सर्व काही होत उपजिविका चालते. त्याचेच प्रतिक म्हणून आजही प्रत्येक घरी म्हैस आढळते. 

रेड्यांची झुंज आणि शर्यत गवळी समाजाच्या वतीने पाडव्याच्या पूजेनंतर किंवा त्यानंतर एक दोन दिवसांत हेल्यांची किंवा रेड्यांची झुंज लावली जाते. सर्व समाज यात एक होत आपल्या रेड्यांना मैदानात उतरवतो. त्याद्वारे एका रेड्याचा नंबर काढला जातो. तसेच मोटारसायकलच्या मागे रुमाल आणि चादर पकडत त्या गाडी मागे म्हशींना पळविले जाते. पूर्वीपासून समाज हे करत आल्याने आम्ही आजही या सर्व प्रथा साजऱ्या करत आहोत.  - मलकू आप्पा भिमा आप्पा घटी,  रा. गवळी वाडा, न्यायडोंगरीता. नांदगाव जि. नाशिक

 

टॅग्स :दिवाळी 2023दिवाळीतील पूजा विधीदूधशेतकरी