Join us

जनावरांना चारा कमी पडतोय? इथे या...; पशुसंवर्धन विभागाने जारी केलीये चारा उत्पादकांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 1:25 AM

यामुळे शेतकऱ्यांना चारा खरेदी करण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही.

पुणे : राज्यात कमी पाऊस पडला की, शेतकऱ्यांना चाराटंचाईला सामोरे जावे लागते. परिणामी राज्यातील पशुधनावर विपरीत परिणाम होतात आणि शेतकऱ्यांना कमी दरामध्ये पशुधन व्यापाऱ्यांना विकावे लागते. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असते. पण या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने थेट चारा उत्पादक आणि विक्रेत्यांची यादीच जाहीर केली आहे. 

यामुळे ज्या भागांत चाऱ्याची आवश्यकता आहे अशा भागांतील शेतकरी आपल्या जवळच्या उत्पादकांकडून हा चारा विकत घेऊ शकतात. चाराटंचाई आणि चाऱ्याचे वाढते दर लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाचा हा उपक्रम शेतकऱ्यांना चांगलाच फायद्याचा ठरताना दिसत आहे. 

पशुसंवर्धन विभागाने विभागानुसार, जिल्ह्यानुसार चारा उत्पादकांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये मुरघास, मका, कडबा (सुका चारा), वाळलेले गवत उत्पादन करणारे किंवा विक्री करणाऱ्यांची यादी आणि संपर्क क्रमांक दिलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही दलालाविना थेट उत्पादकांकडून चारा खरेदी करता येणार आहे. 

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या संकेतस्थळावर चारा उत्पादकांची यादी जाहीर करण्यात आली असून शेतकऱ्यांनी आपल्या जवळील चारा उत्पादकांशी संपर्क साधून चारा खरेदी करण्याचे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

राज्यात विक्रीसाठी किती चारा उपलब्ध?(मे २०२४ या महिन्यातील उपलब्ध आकडेवारीनुसार)

  • कोकण विभाग - २ हजार ६१२ मेट्रीक टन
  • पुणे विभाग - २३ हजार ६६६ मेट्रीक टन
  • नाशिक विभाग - १६ हजार ९२८ मेट्रीक टन
  • छत्रपती संभाजीनगर विभाग - २२ हजार ५१५ मेट्रीक टन
  • लातूर विभाग - २५९ मेट्रीक टन
  • अमरावती  विभाग - १ हडार ९२५ मेट्रीक टन
  • नागपूर विभाग - २ हजार १६८ मेट्रीक टन

एकूण चारा उपलब्धता - ७० हजार मेट्रीक टन

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीदुग्धव्यवसायप्राण्यांवरील अत्याचार