Join us

Animal Feed Price : पशुखाद्याचे दर गगनाला; काय म्हणतात दूध उत्पादक ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 16:22 IST

Animal Feed Price : पशुखाद्याच्या भावात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. परंतू दुधाचे दर मात्र 'जैसे थे' आहेत. त्यामुळे आता दुधाला हमीभाव जाहीर करावा ही मागणी जाेर धरू लागली आहे.

अरुण देशमुख

भूम : एकीकडे पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी पशुपालकांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असताना दुसरीकडे चांगल्या प्रतिच्या दुधाला देखील योग्य दर मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने दुधाला हमी भाव द्यावा, अशी मागणी दूध उत्पादकांमधून होत आहे.

तालुक्यात डोंगराळ भाग असल्याने मागील अनेक वर्षांपासून जवळपास सर्वच शेतकरीशेतीसोबत दुग्ध व्यवसाय करतात. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह दूग्ध व्यवसायावर चालतो.यासोबच दुधापासून बनविण्यात येणाऱ्या खवा, पेढा यासारख्या पदार्थांची निर्मितीही तालुक्यात मोठ्या प्रमाणात होते. यामुळेच तालुक्यात सद्यस्थितीत चाळीस हजाराच्या आसपास दुभती जनावरे असून, या माध्यमातून शासकीय आकडेवारीनुसार दररोज १ लाख ५० हजार लिटर दुधाचे संकलन होते.

सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे दूध संकलन चांगले आहे. दरम्यान, खासगी व्यापारी शेतकऱ्यांकडून केवळ २५ रुपये लिटर प्रमाणे दूध खरेदी करीत असून, त्याची विक्री मात्र ६० रुपये दराने होत आहे. त्यामुळे खासगी दूध केंद्र चालवणारे मालामाल होत असले तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना मात्र 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर दुग्ध व्यवसाय करावा लागत असल्याचे दिसते.

वास्तविक दुग्ध व्यवसाय करताना पशुधनाची जोपासना हा मुख्य भाग आहे. दूधवाढीसाठी पेंड, कळणा, खुराक, औषधोपचार, वैराण, घास यासाठी शेतकऱ्यांना रोख पैसे मोजावे लागतात. त्यातच पशुखाद्य, खुराकांचे भाव दर तीन चार महिन्याला वाढतात. मात्र, दुधाचे 'जैसे थे' राहत असल्याने हातात दमडीही राहत नसल्याचे तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत.

असे आहेत पशु खाद्याचे दर..

सरकी पेंड३० ते ३३ प्रति किलो
शेंगदाणा पेंड४० ते ४५ प्रति किलो
कळणा२५ ते ३० प्रति किलो
सुग्रास३० ते ३५ रु प्रति किलो

शेतकरी काय सांगतात......

मी मागील पाच सहा वर्षांपासून दुग्ध व्यवसाय करतो. माझ्याकडे सध्या १५ दुभती जनावरे आहेत. मात्र, दुग्ध व्यवसायचा खर्च पाहता दुधाला शासनाकडून मिळणारा २५ रुपये दर खूपच तोकडा आहे. त्यामुळे सरकारने दुधाला कमीत कमी ६० रुपये प्रती लिटर हमी भाव जाहीर केला तरच भविष्यात दुग्ध व्यवसाय टिकेल. - राजकिरण गोयकर, आरसोली, ता. भूम

दिवसेंदिवस हवामानाचा समतोल ढासळतोय. त्यामुळे शेतीतून तोडके उत्पन्न हाती येते. त्यामुळे जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करावा लागतोय, परंतु, दुग्धव्यवसायाचा खर्चही वाढत असून, त्या प्रमाणात दर मिळत नाही. सरकारने दुधाला ६० रूपये हमीभाव जाहीर केला तरच दुग्ध व्यवसायातून प्रगती होईल, अन्यथा दुग्ध व्यवसाय बंद करावा लागेल. - बापू मस्के, दरेवाडी, ता. भूम

व्यावसायिकांचे जाळे वाढले

तालुक्यास दुधाचा तालुका म्हणून एक वेगळी ओळख आहे. मागील काळात प्रशासनाची शासकीय दूध योजना तसेच खासगी तत्त्वावरील भूम तालुका दूध संघ सुरू होता. परंतु, सहकारतल्या खाबुगिरीमुळे हे प्रकल्प आज बंद आहेत. पर्यायाने व्यावसायिकांचे जाळे वाढताना दिसत आहे. शेतीमालासोबत दुधालाही सरकारने हमी भाव जाहीर करावा, ही मागणी आजही प्रलंबित आहे.

हे ही वाचा सविस्तर : Animal Care : आता आजारी जनावरे ओळखा झटपट; आर्थिक फायद्यासह होईल वेळीची बचत

टॅग्स :शेती क्षेत्रअन्नदूधदूध पुरवठाशेतकरीशेती