बुलढाणा : शेती, निसर्ग आणि ग्रामीण संस्कृतीचा संगम घडवणारे कृषी पर्यटन आता ग्रामीण अर्थकारणासाठी मोठी संधी ठरू लागले आहे. (Agritourism)
अपुरी सिंचन व्यवस्था, अनियमित पाऊस आणि शेतीसमोरील वाढत्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यासाठी कृषी पर्यटन हे केवळ पर्यटनाचे साधन नसून ग्रामीण विकासाला चालना देणारे प्रभावी माध्यम ठरू शकते, अशी भूमिका जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.(Agritourism)
शनिवारी साजऱ्या होणाऱ्या 'जागतिक कृषी पर्यटन दिन' निमित्त कृषी पर्यटनाच्या संधींवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.(Agritourism)
योग्य नियोजन आणि पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास बुलढाणा जिल्ह्यात कृषी पर्यटनातून किमान ५०० कोटी ते कमाल १५०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विकास आराखड्यात कृषी पर्यटनाला विशेष महत्त्व
गोखले इंस्टीट्यूट ऑफ़ पॉलिटिक्स एंड इकोनॉमिक्स, पुणे यांनी बुलढाणा जिल्ह्यासाठी तयार केलेल्या धोरणात्मक विकास आराखड्यात कृषीआधारित उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
या आराखड्यानुसार, पुढील चार वर्षांत जिल्ह्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी रुपयांच्या घरात नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी शेती, कृषी प्रक्रिया उद्योग आणि पर्यटन ही प्रमुख क्षेत्रे मानण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक स्थळांना जोडून 'पर्यटन परिपथ' अर्थात टुरिझम सर्कल विकसित करण्याची संकल्पनाही मांडण्यात आली आहे.
'टुरिझम सर्कल'मध्ये कोणत्या स्थळांचा समावेश?
जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना एकत्र जोडून पर्यटकांना ग्रामीण आणि कृषी अनुभव देण्याची योजना आखण्यात आली आहे. यामध्ये पुढील ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.
लोणार विवर सरोवर
शेगाव धार्मिक पर्यटन
सिंदखेड राजा
ज्ञानगंगा व अंबाबरवा अभयारण्य
कोराडी, खडकपूर्णा आणि पेनटाकळी धरण परिसर
भिंगारा घाट आणि जटाशंकर परिसर
या सर्व स्थळांना कृषी पर्यटनाशी जोडल्यास जिल्ह्यात पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते.
कृषी पर्यटनासाठी बुलढाण्याची बलस्थाने
बुलढाणा जिल्हा हा कृषी विविधतेसाठी ओळखला जातो. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, संत्रा, मोसंबी, केळी आणि पेरू यांसारख्या बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.
याशिवाय दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, वनसंपत्ती आणि ग्रामीण खाद्यसंस्कृती हीदेखील जिल्ह्याची मोठी ताकद मानली जाते.
ग्रामीण जीवनशैली, पारंपरिक शेती अनुभव आणि स्थानिक खाद्यपदार्थ यांना पर्यटनाशी जोडल्यास पर्यटकांसाठी वेगळा अनुभव निर्माण होऊ शकतो.
बचत गटांना रोजगाराची मोठी संधी
जिल्ह्यातील २१ हजारांहून अधिक बचत गटांना कृषी पर्यटनाशी जोडण्याची संकल्पनाही पुढे येत आहे. ग्रामीण भागातील घरगुती निवास व्यवस्था, स्थानिक खाद्यपदार्थ, शेतभेट, बैलगाडी सफर आणि शेती अनुभव यांसारख्या उपक्रमांतून महिलांसह ग्रामीण युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
यामुळे ग्रामीण भागातील पूरक उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अपुरी सिंचन व्यवस्था मोठे आव्हान
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यासमोर काही गंभीर अडचणीदेखील आहेत. जिल्ह्यात केवळ सुमारे २२ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. अनियमित पर्जन्यमानामुळे शेती मोठ्या प्रमाणावर अस्थिर बनत आहे.
तसेच पर्यटनासाठी स्वतंत्र यंत्रणा नसणे, पायाभूत सुविधांचा अभाव आणि उत्तर बुलढाण्यातील विकासातील असमतोल हीदेखील मोठी आव्हाने असल्याचे विकास आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामीण विकासासाठी महत्त्वाचा दुवा
अमरावती विभागात आर्थिक वृद्धीदरात बुलढाणा जिल्ह्याने लक्षणीय प्रगती केली असली, तरी या विकासाचा लाभ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी पर्यटन हा महत्त्वाचा दुवा ठरू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
शेती, पर्यावरण, संस्कृती आणि रोजगार यांचा संगम साधणारे कृषी पर्यटन योग्य नियोजनातून विकसित झाले, तर भविष्यात बुलढाणा जिल्ह्यासाठी ते अर्थकारणाला नवी दिशा देणारे क्षेत्र ठरू शकते.
हे ही वाचा सविस्तर : Organic Farming : महागडी खते सोडून शेतकरी आता करतायत 'ही' शेती वाचा सविस्तर
अधिक वाचा : Seed Germination Test : चमकदार बियाण्यांना फसू नका; पेरणीपूर्वी 'ही' टेस्ट कराच
Web Summary : Agritourism emerges as a significant opportunity for rural economies in Buldhana, Maharashtra. With strategic planning and infrastructure, it can generate substantial revenue, connecting tourism with agriculture and culture. Focus on local resources and experiences to boost rural income.
Web Summary : बुलढाणा में कृषि पर्यटन ग्रामीण अर्थव्यवस्थाओं के लिए एक महत्वपूर्ण अवसर के रूप में उभर रहा है। रणनीतिक योजना और बुनियादी ढांचे के साथ, यह पर्यटन को कृषि और संस्कृति से जोड़कर पर्याप्त राजस्व उत्पन्न कर सकता है। ग्रामीण आय को बढ़ावा देने के लिए स्थानीय संसाधनों और अनुभवों पर ध्यान दें।