१६ मे जागतिक कृषी पर्यटन दिन! संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेकडून मान्यता मिळाल्याने २००९ पासून हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी पर्यटन व्यवसाय चालू करण्यासाठी खुप मोठी संधी आहे.
कारण प्रत्येक गावाची एक वेगळी अशी अंगभूत ओळख असते स्थळानूसार प्रत्येक ठिकाणचे नैसर्गीक वातावरणात बदल होत असतो. तसेच ठिकाणानूसार व हवामानानूसार पिकांची विविधताही बदलत असते.
प्रत्येक ठिकाणचा विविध क्षेत्रातील पर्यटन वारसा, सांस्कृतीक सण, उत्सव अशाप्रकारच्या विविध जमेच्या बाजू कृषी पर्यटन व्यवसायासाठी पोषक आहे. लोकसंख्येच्या तुलनेत जवळपास ४५ टक्क्याहून अधिक असणाऱ्या शहरवासियांना ग्रामीण व कृषी उद्योजकांना पर्यटन व्यवसाय चालू करण्याची संधी प्राप्त झालेली आहे.
कृषी पर्यटन व्यवसायाबाबतची सखोल माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाचे कृषी खाते, कृषी विद्यापिठे, कृषी संलग्न शासकीय व निमशासकीय संस्था यासाठी चांगली मदत करू शकतात. याबरोबरच शासनाचे पर्यटन महामंडळ, एम.टी.डी.सी. यासारख्या संस्थांची भुमिकाही महत्वाची आहे. शासनाचे उदात्त धोरण व बँकांची सहानूभूती निश्चितच या व्यवसायाच्या भरभराटीस कारणीभूत ठरणार आहे.
शहरी लोकांना ग्रामीण संस्कृतीचा पडलेला विसर पडला असून त्यांना वेळीच सावध करण्याची गरज निर्माण झाली आहे अशा लोकांना सावध करण्याचे कामच कृषी पर्यटन करणार असून आपल्या पूर्वजांनी जमलेल्या ग्रामीण कृषी संस्कृतीचे दर्शन यांना या माध्यमातून करून देणार आहे. खऱ्या अर्थाने अशा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठीच कृषी पर्यटनाची गरज वाटते.
आदर्श कृषी पर्यटन स्थळावर राहाण्याची उत्तम व्यवस्था असावी. कृषी पर्यटन स्थळावरील फार्म हाऊस निट-नेटके असावा. विशेषतः तो आरामदायी असावा. राहाण्यायोग्य कमीत-कमी सुविधा असाव्यात. पाण्याची पुरेशी सोय असावी. कृषी पर्यटन स्थळावर झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर असावी. तेथील वातावरण नैसर्गीक असावे. कृषी पर्यटन स्थळावर विहिर, पोहण्याचा तलाव अथवा तळे असावे त्यामध्ये मत्स्य पालन केलेले असावे.
कृषी पर्यटन स्थळावर बैलगाडी, जनावरे त्यांचे गोठे इत्यादी सुविधा असाव्यात. शेळी फार्म, इमु पालन, रेशीम उत्पादन, हरितगृह, यासारख्या सुविधा असाव्यात. जेवणासाठी महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवन असावे. त्यामध्ये सकाळी नाष्टा, दुपारी जेवन व रात्रीचे जेवन यांचा समावेश असावा. कृषी पर्यटन स्थळावर अशा प्रकारच्या सेवा सुविधा असाव्यात की जेणेकरून पर्यटक त्या पाहतील व त्यामध्ये सहभागी होवून त्याचा आनंदही लुटतील.
कृषी पर्यटन स्थळावर ग्रामीण खेळांची सुविधा असावी. आलेल्या पर्यटकांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्यात यावी यामध्ये ग्रामीण वेशभुषा, कला, हस्तकला, सण उत्सव, ग्रामीण रूढी परंपरा यांचे दर्शन घडून यावे त्यांना यामध्ये प्रत्यक्ष सहभागी करून घ्यावे. त्याची थोडीसी सवय यांना दाखवावी. पर्यटकासाठी बैलगाडीतून सफर घडवून आणावी. घोडयावरून फेरफटका मारण्याची सुविधा असावी. पाण्यामध्ये मासेमारी करण्याची संधी त्यांना प्राप्त करून द्यावी.
शेतावर फेरफटका मारत असतांना शेतावरील फळे, मक्याची कणसे, ज्वारीचा हुरडा, भुईमुगाच्या शेंगा, ऊस आणि इतर खुप काही रानमेवा त्यांना शेतावर उपलब्ध करून द्यावा. त्यांना ग्रामीण भागातील प्राण्यांची, पक्ष्यांची ओळख करून द्यावी. पर्यटकांना लोककलेची ओळख होईल अशा कार्यक्रमाचे आयोजन करावे. पर्यटकांना जातांना आठवण म्हणून कृषी पर्यटन स्थळावर खरेदी करण्यासाठी विविध स्टॉल उभे असावे.
त्यामध्ये ग्रामीण भागातील स्थानिक कलावंतांनी तयार वस्तू विक्रीसाठी ठेवता येतील त्यामुळे स्थानिक लोकांना काहीतरी उद्योग निर्माण होईल त्यातून त्यांचे अर्थाजन चालेल याचाही विचार करून या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल व तरूणांना कृषी पर्यटनातून रोजगार उपलब्ध होईल. त्यातून गावाच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल.
लेखक प्रा. संजय बाबासाहेब बडे सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभागदादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर पिन कोड ४२३७०३