Agriculture News : शेतकरी बांधवासाठी नवीन असे हे अवजार आहे. ज्याला आपण पटाशी नांगर (Patashi Nangar) असे म्हणतो तर इंगजीमध्ये याला आपण सब सॉईलर प्लो (Sub Soiler Plow) म्हणतो. हा एक प्रकारचा नांगर आहे. या अवजाराचा उपयोग बहुतांश शेतकरी बांधव करताना दिसत नाहीत.
आपणास माहित आहे की, तयार झालेल्या शेतमालाला शेतातून घरी आणेपर्यंत कितीतरी वेळा शेतामध्ये ट्रॅक्टरची (Tractor Farming) ने-आण करावी लागते. ट्रॅक्टर सोबत विविध अवजारे शेतीमध्ये चालविली जातात. ट्रॅक्टर आणि अवजारे इत्यादीच्या सततच्या वापरामुळे जमिनीचा खालचा थर कठीण झालेला दिसतो. यालाच आपण हार्डपॅन असे म्हणतो.
हार्डपॅन तयार होण्यामागे रोटावेटर (Rotavator) चालविण्याचा प्रामुख्याने समावेश होतो. जमिनीचे खालचे थर कडक राहिलेले दिसून येतात. आणि याचा परिणाम असा होतो कि पावसाचे पडणारे पाणी या हार्डपॅनमुळे जमिनीत मुरत नाही आणि खोलवर जात नाही आणि त्यामुळे जर सब सॉईलर प्लोव्दारे जमिनीची नांगरणी केल्यास जवळपास दोन ते अडीच फूट पर्यंतचा कडक थर तोडला जातो.
जास्त पाऊस झाल्यास पाणी जमिनीमध्ये खोलवर जाण्यास मदत होते आणि जमिनीची पाणी भरण क्षमता वाढते. पाऊस कमी झाल्यास जमिनीमध्ये ओलावा टिकून रहातो आणि त्यामुळे पाण्याअभावी पिके लवकर सुकत नाहीत. रब्बी हंगामामध्ये घेत असलेल्या पिकांना या जमिनीतील ओलाव्याचा फायदा होतो.
ज्या शेतामध्ये पावसाचे पाणी साचते आणि ज्या शेतामध्ये मातीतील ओलावा लवकर कमी होत जातो अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीसाठी सब सॉईलर प्लो अत्यंत उपयोगी आहे. सबसॉईलर प्लोच्या वापरामुळे जमिनीमध्ये पाणी धरून राहते. पाऊस जास्त झालेल्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होतो.
- डॉ. अनिलकुमार कांबळे संशोधन अभियंताअखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.