Join us

कृषी केंद्राचा पत्ता एका जागेचा, व्यवसाय दुसरीकडेच, मग कृषी विभागाची पडली धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 13:42 IST

अप्रमाणित बियाणे विकणे, जास्त दराने बियाणे व खते विकणे, त्यांचा काळाबाजार करणे, लिंकींग करणे अशा तक्रारी कृषी केंद्र चालकांबाबत शेतकरी करत आहेत. त्या विरोधात कृषी विभागाची धडक कारवाई सुरू आहे.

रविवारी सुटीच्या दिवशीही  औरंगाबाद कृषी विभागाच्या भरारी पथकाने सोयगाव आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई केली. सोयगाव तालुक्यातील कृषी विभागाच्या भरारी पथकाने तिडका येथील गणेश कृषी सेवा केंद्रावर धाड टाकली.

यावेळी तेथे केलेल्या तपासणीमध्ये दुकान मालकाने कृषी निविष्ठा केंद्र अनधिकृतरीत्या परस्पर अन्य ठिकाणी स्थलांतरित केल्याचे निदर्शनास आले. बियाणे, खते आणि कीटकनाशके विक्री केंद्राचा व्यवसाय करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी घर नंबर ४४४ मेन रोड तिडका या जागेचा परवाना दिला होता.

विक्रेत्याने कृषी विभागाला न कळवता परस्पर तिडका गावातील मारुती मंदिरातील एका गाळ्यात दुकान स्थलांतरित केल्याचे निदर्शनास आले. बियाणे साठा रजिस्टर ठेवलेले नाही, प्रमाणित केलेले नाही, विक्री बिलावर शेतकऱ्यांच्या सह्या घेतलेल्या नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. यानंतर संबंधित दुकानदाराला कापूस बियाणे विक्री बंद करण्याचे आदेश दिले.

ही कारवाई कृषी अधिकारी मदन शिसोदिया, कृषी अधिकारी संतोष भालेराव, मंडळ कृषी अधिकारी एस. जी. वाघ यांच्या पथकाने केली. याशिवाय बियाणे परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे सादर केला.

यासोबतच जि.प. कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दोन बियाणे विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी केली. दुकानदाराने अनियमितता केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावरही कारवाई प्रस्तावित करण्यात आली. ही कारवाई कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख, कृषी अधिकारी मेघशाम गुळवे , जिल्हा कृषी अधिकारी सरकलवाड आणि विश्वास अधापुरे यांनी केली.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरी