Join us

हळद काढणीनंतर पारंपारिक पद्धतीने कढईत हळद शिजविताना काय काळजी घ्यावी?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 10:30 AM

८ ते ९ महिन्यांनी तयार झालेली हळद शेतातून खणून काढली की ती आपल्या रोजच्या उपयोगासाठी वापरता येत नाही. ती शिजवून प्रक्रिया करून वापरावी लागते. हळद ही लोखंडी कढईमध्ये पारंपरिक पद्धतीने शिजवली जाते.

८ ते ९ महिन्यांनी तयार झालेली हळद शेतातून खणून काढली की ती आपल्या रोजच्या उपयोगासाठी वापरता येत नाही. ती शिजवून प्रक्रिया करून वापरावी लागते. हळद ही लोखंडी कढईमध्ये पारंपरिक पद्धतीने शिजवली जाते.

या कढया विविध भागांत विविध क्षमतेच्या असतात. सर्वसाधारणपणे दोन क्विंटल ओली हळद बसेल, या क्षमतेपासून ८ ते १० क्विंटल हळद मावणाऱ्या कढया असतात. या कढईत हळद भरून वरती हळदीचा पाला व गोणपाट टाकून कढईचे वरचे तोंड बंद करून हळद शिजवतात. काही ठिकाणी कढईच्या वरती तोंड पाला टाकून चिखल मातीने लिंपून हळद शिजविली जाते.

जेवढी हळद कढईमध्ये शिजवताना जास्त भरली जाईल त्याप्रमाणे त्या हळदीला शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो. अशा पद्धतीने कढईच्या तळाजवळील हळद जास्त शिजते. काही वेळा करपते. अशा हळदीस लोखंडी हळद असे म्हटले जाते. वरील भागातील हळद कच्ची राहण्याची शक्यता असते. कारण कढईच्या वरील झाकण हे पूर्णपणे हवाबंद नसते. अशा हळदीला चकाकी चांगली येत नाही. पॉलिश करताना तिचे तुकडे उडतात. परिणामी अशा मालास बाजारभाव चांगला मिळत नाही.

त्यासाठी कढईत हळद शिजवायची असल्यास हळदीच्या थरावरती ५ ते ८ सेंटिमीटर पाणी राहील इतके पाणी टाकून त्यावर हळदीचा पाला टाकून गोणपाटाने झाकून शिजवावी म्हणजे हळद योग्य प्रकारे व कमी इंधनात शिजते. हळद शिजवण्याच्या नवीन पद्धतीनुसार तेलाच्या बॅरलचे सच्छिद्र ड्रम तयार करून त्यामध्ये हळद भरून मूळच्या कढईत फक्त पाणी टाकून उकळत्या पाण्यात हे ड्रम ठेवून हळद शिजविली असता हळद योग्य प्रकारे शिजते.

अधिक वाचा: उच्च प्रतीच्या उत्पादनासाठी सुधारित पद्धतीने अशी करा हळदीवर प्रक्रिया

या कामी कमी वेळ, कमी मजूर, कमी इंधन लागते. अशा मालास चांगली चकाकी येते. परिणामी बाजारभाव चांगला मिळतो. अशा पद्धतीचा वापर केल्यास कमी वेळात हळद व्यवस्थित शिजवली जाते आणि मजूर, श्रम, इंधन यांचा अपव्यय टाळता येतो. शिजवलेली हळद ही चांगल्या कठीण अगर सिमेंट काँक्रीटच्या खळ्यावर वाळवावी लागते. त्यासाठी ताडपत्री किंवा बांबूच्या चटईचा वापर करावा.

हळद पॉलिश करणेशिजवून, वाळवून तयार झालेली हळद लगेच विक्रीसाठी पाठवू शकत नाही. कारण ती आकर्षक दिसत नाही. हळकुंडावरील साल आणि मातीचा थर काही अंशी या हळकुंडावर बसलेला असतो. त्यासाठी हळद ही कठीण पृष्ठभागावर घासावी लागते.

घासल्यानंतर हळकुंडावरील साल व काही मातीचे कण निघून जातात. हळकुंड गुळगुळीत होते. त्याला चकाकी, पिवळेपणा येतो आणि आकर्षक दिसते. अशा मालास चांगला बाजारभाव मिळतो. यासाठी हळदीला पॉलिश करणे गरजेचे असते. हळद कमी असल्यास हातात गोणपाट घेऊन पॉलिश केले जाते.

टॅग्स :काढणी पश्चात तंत्रज्ञानशेतकरीकाढणीशेतीपाणी