Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात प्रक्रीया उद्योग करायचाय? कपाशीसह या क्षेत्रांमध्ये करता येईल व्यवसाय सुरु..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 14:16 IST

वैजापूर तालुक्यात या उद्योगांमध्ये प्रक्रीया व्यवसाय करण्यास वाव

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुका हा पूर्वी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. मात्र, आता तालुक्याची सर्वाधिक सिंचनाखालील शेतीक्षेत्र अशी ओळख निर्माण झाली आहे. नांदूर मध्यमेश्वर, शिवना टाकळी, मन्याड, भटाणा, नारंगी, बोर दहेगाव या प्रकल्पांमुळे हा कायापालट झालेला आहे. १३ वर्षांपूर्वी कार्यान्वित झालेल्या नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पामुळे तालुक्यातील ४५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. ऊस, कापूस, कांदा, मका या पिकाखालील क्षेत्र वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे.

साखर कारखाना सुरु झाल्यास..

वैजापूर तालुक्यात उसाखालील क्षेत्र जास्त असूनही साखर कारखाने नाहीत. त्यामुळे येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसशेती नगर जिल्ह्यातील ऊस कारखान्यांवर अवलंबून आहे. बंद पडलेला परसोडा येथील विनायक सहकारी साखर कारखाना व नव्याने होऊ घातलेला साखर कारखाना सुरू झाल्यास, काही प्रमाणात तालुक्यातील अर्थचक्र सुरू होण्यास वाव आहे.

कापूस, मक्याच्या प्रक्रीया उद्योगास वाव

वैजापूर तालुक्यातील बंद पडलेला साखर कारखाना, रामकृष्ण जलसिंचन उपसा योजना, औद्योगिक वसाहत सुरू होणे आवश्यक आहे. मात्र, ही कामे सुरू होण्याची शक्यता दिसत नाही. बंद पडलेली रामकृष्ण सिंचन योजना मार्गी लागल्यास १८ गावांतील शेती समृद्ध होईल. औद्योगिक वसाहत व साखर कारखाना सुरू झाल्यास अर्थचक्र भक्कमपणे फिरू लागेल, कापूस, मका, ऊस या पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यास येथे मोठी संधी आहे.

रेल्वे मालधक्का व सिंचन योजना रोटेगाव रेल्वे स्थानकावर चार वर्षापूर्वी मालधक्का कार्यान्वित करण्यात आला होता. तालुक्यातील भूजल पातळी समृदृध आहे. पाणी मुबलक असल्याने सर्वत्र कांदा लागवड होत असते. कापूस आणि त्यावरील जिनिंग उद्योग सुरू आहेत. वर्षाकाठी लाखो गाठी ट्रक कंटेनरद्वारे येथे रेल्वे वॅगनद्वारे निर्यात केल्या जातात. येथे रेल्वे धक्का सुरू झाल्यावर मका, कांदा, कापूस गाठी व अन्य भुसार माल निर्यात व इतर साहित्याची निर्यात सुकर होण्याची शक्यता होती. मात्र, व्यापारी वर्गाने पाठ फिरविल्याने हा मालधक्का रेल्वे विभागाने बंद केला आहे.

प्रक्रिया उद्योग उभारणे गरजेचे

• तालुक्यातील एकूण लागवडीखालील शेतजमिनीपैकी ६० टक्के जमिनीवर कापसाचा पेरा केला जातो. काही प्रमाणात बागायती कपाशी लावून शेवटी फरदड कापूसही घेतला जातो.

• याच पेरणीच्या बळावर तालुक्यातील जिनिंग बिनधास्तपणे सुरू आहेत; पण जिनिंग मीलच्या पलीकडे चांगले प्रक्रिया उद्योग उभारले जात नसल्याने, तालुक्याचे अर्थकारण समृदध होण्यास अडचण निर्माण झाली आहे. प्रक्रिया उद्योग उभारल्यास विकासाला गती मिळेल.

टेक्स्टाइल अँड गारमेंट्स

• धागा तयार करणाऱ्या स्पिनिंग मील तयार झाल्यानंतर टेक्स्टाइल मील उभारल्या जाऊ शकतील, या माध्यमातून कॉटन, टेरिकॉट आणि विविध दर्जाचे नावीन्यपूर्ण कापड तयार करणारी टेक्स्टाइल मील तयार झाल्यास आर्थिक समृद्धी येऊ शकते, तसेच टेक्स्टाइल मिल्समधून बाहेर पडणाऱ्या कापडापासून विविध रेडिमेड गारमेंट्स तयार करणारे कारखाने तयार होऊ शकतील.

• याद्वारे रेडिमेड क्षेत्रात काम करणारे हजारो कामगार यामुळे आपला उदरनिर्वाह करू शकतील, तसेच महिला कामगारांनाही अर्थार्जनाचे मोठे साधन निर्माण होईल, तसेच शिवणकाम करणारे टेलर यांच्यासह रेडिमेड मार्केट तयार करून कोट्यवधी रुपयांची दैनंदिन उलाढाल करणे शक्य आहे.

साबण उद्योग

सरकीमधून तेल बाहेर काढल्यानंतर मळकट असा लगदा उरतो. त्याला जिनिंग उद्योगाच्या भाषेत गादा' असे म्हणतात. या गाद्यापासून धुण्याचा साबण तयार करण्याचा छोटेखानी कारखाना उभारला जाऊ शकतो.

सरकीपासून तेल काढण्याचा कारखाना..

कापसातून रुई वेगळी झाल्यानंतर सरकी शिल्लक राहते. तिच्यापासून जनावरांसाठी पौष्टिक ढेप तयार केली जाते. ही ढेप तयार करणारा एक कारखाना येथे सुरु आहे. सरकीपासून कॉटन रिफायनरी ऑइल काढण्याचा कारखाना या ठिकाणी प्रक्रिया उद्योगामध्ये सुरू आहे. असे कारखाने आणखी निर्माण करता येतील. सरकी तेलाचा भाव इतर तेलांपेक्षा कमी आहे.    

स्पिनिंग : अर्थात धागानिर्मिती                

तालुक्यातील सुरू असलेल्या जिनिग मीलनंतर सूतगिरणी सुरू करण्यास येथे वाव आहे. सूतगिरणी सुरू झाल्यानंतर तेथे धागा निर्मिती होऊ शकेल.

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसव्यवसायशेतकरी