Join us
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Success Story : बारावी पास तरुणाची कमाल! मधमाशी पालनातून उभा केला कोट्यवधींचा स्टार्टअप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 11:37 IST

Farmer Success Story : लातूर जिल्ह्यातील परमेश्वर हुरदळे या तरुणाने निसर्गातील संधी ओळखून मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरू केला. आज त्याच व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल होत असून अनेक महिलांनाही रोजगार मिळत आहे. (Farmer Success Story)

बालाजी देवर्जनकर

भारताच्या विविध राज्यांच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांचा गोड संगम एका बाटलीत बंद करून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे अनोखे काम लातूर जिल्ह्यातील एका तरुणाने केले आहे. (Farmer Success Story)

पंजाबच्या मोहरीचा सुवास, काश्मीर-हिमाचलच्या खोऱ्यातील जंगली मधाचा गारवा, झारखंडच्या तुळशीचा औषधी स्पर्श, गुजरातच्या ओवा-बडीशेपचा पाचक सुगंध आणि मध्य प्रदेशातील धन्यांचा थंडावा अशा विविध चवींचा संगम असलेला नैसर्गिक मध तयार करून परमेश्वर हुरदळे या तरुणाने यशस्वी स्टार्टअप उभारले आहे. (Farmer Success Story)

आज त्याचा हा उपक्रम वार्षिक कोट्यवधींची उलाढाल करत असून लवकरच देशाबाहेरही पोहोचण्याच्या तयारीत आहे.(Farmer Success Story)

लातूरच्या छोट्या गावातून उभारला 'मधाळ' व्यवसाय

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आलमला या छोट्याशा गावातील परमेश्वर हुरदळे हा केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला तरुण. 

पारंपरिक नोकरीच्या मागे न लागता त्याने निसर्गाशी मैत्री करत मधमाशी पालनाचा मार्ग निवडला. जिथे अनेकांना धोका दिसतो, तिथे त्याने संधी पाहिली आणि मधमाशी पालनातून स्वतःचा वेगळा व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला. आज त्याच निर्णयाचे रूपांतर एका यशस्वी आणि शाश्वत स्टार्टअपमध्ये झाले आहे.

नागपूर येथे भरलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात त्याच्या मधाच्या विविध फ्लेवर्सने ग्राहकांचे लक्ष वेधले आहे.

भारतातील विविध प्रांतांतील प्रसिद्ध पिकांच्या फुलांपासून मिळणाऱ्या परागातून तयार झालेला मध हा त्याच्या व्यवसायाचा मुख्य आधार आहे.

नैसर्गिक मधाचे अनोखे फ्लेवर्स

परमेश्वरने बाजारात पारंपरिक मधाबरोबरच विविध फ्लेवर्सचा मध उपलब्ध करून दिला आहे. यात

राजस्थानची मोहरी – पिवळ्या मोहरीच्या फुलांच्या परागातून तयार झालेला सुगंधी मध

गुजरातचा ओवा व बडीशेप – पचनसंस्थेसाठी गुणकारी चवीचा मध

हिमाचल-काश्मीरचा जंगली मध – हिमालयातील औषधी वनस्पतींचा अर्क असलेला दुर्मीळ मध

झारखंडची तुळस – रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा तुळशीचा मध

मध्य प्रदेशचे धने – मसाल्यांच्या पिकांमधून तयार होणारी वेगळी चव

याशिवाय आले, हळद, दालचिनी आणि ड्रायफ्रूट्स मिश्रित मधही तो तयार करतो. या सर्व उत्पादनांमध्ये कोणतेही रसायन किंवा कृत्रिम स्वाद वापरला जात नसल्यामुळे आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांचा त्याच्यावर विश्वास बसला आहे.

महिन्याला २ हजार किलो उत्पादन

अत्यल्प कालावधीत परमेश्वरच्या व्यवसायाने मोठी झेप घेतली आहे. सध्या तो महिन्याला सुमारे २ हजार किलो मधाचे उत्पादन करत असून वार्षिक सुमारे २५ हजार किलो मधाची निर्मिती केली जाते.

शुद्धतेमुळे त्याच्या उत्पादनांची मागणी वाढत असून या माध्यमातून वार्षिक कोट्यवधींची उलाढाल होत आहे.

महिलांनाही रोजगाराची संधी

या व्यवसायामुळे केवळ परमेश्वरच नव्हे तर अनेक ग्रामीण महिलांनाही रोजगार मिळाला आहे. बचतगटांच्या महिलांना मध संकलन, प्रक्रिया आणि पॅकिंग यामध्ये काम दिले जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीही झाली आहे.

ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण

ग्रामीण भागातील अनेक तरुण नोकरीच्या शोधात निराश होतात. मात्र निसर्गातील संधी ओळखून स्वावलंबी कसे व्हायचे, याचे उत्तम उदाहरण परमेश्वर हुरदळेने घालून दिले आहे. राज्याच्या 'उमेद' या संकल्पनेनेही त्याच्या या कल्पकतेला बळ दिले आहे.

आज त्याचा मध भारतातील विविध राज्यांच्या शेती आणि निसर्गाचे प्रतिनिधित्व करत असून लवकरच हा 'मधुसंगम' देशाबरोबरच परदेशातही पोहोचण्याच्या तयारीत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Women Farmer Success Story : हातात रिमोट, आकाशात ड्रोन! लातूरच्या रोहीणीताईंची शेतीत 'हायटेक' भरारी

अधिक वाचा :Women Farmer Success Story : शेतीसोबत लघुउद्योग; अर्चना डोळस यांनी महिलांना दिला स्वावलंबनाचा मंत्र

English
हिंदी सारांश
Web Title : 12th Pass Youth's Bee Farming Startup Achieves Multi-Crore Success

Web Summary : Parameshwar Hurdale, a 12th pass youth from Latur, built a multi-crore honey business. He creates unique honey flavors using nectar from various Indian states, empowering rural women and inspiring self-reliance.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती