मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 05:27 PM2024-05-17T17:27:57+5:302024-05-17T17:29:32+5:30

Sonia Gandhi In Raebareli : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी भावूक झाल्या.

lok sabha election 2024 Speaking at Rae Bareli in Uttar Pradesh, former Congress president Sonia Gandhi got emotional while praising Rahul Gandhi | मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक

मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक

Sonia Gandhi Election Campaign : उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे एका सभेला संबोधित करताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी भावूक झाल्या. जनतेला भावनिक आवाहन करत त्या म्हणाल्या की, मी माझा मुलगा जनतेसाठी समर्पित करत आहे, तो तुमचाच असून आपला म्हणून सांभाळून घ्या. तुमच्या प्रेमाने मला कधीच एकटे वाटू दिले नाही. आमच्या कुटुंबाच्या आठवणी रायबरेलीशी जोडलेल्या आहेत. आज खूप दिवसांनी मला तुमच्यामध्ये येण्याची संधी मिळाली याचा मला आनंद वाटतो. मी मनापासून तुमची ऋणी आहे. माझे डोके तुमच्यापुढे कायम आदराने झुकले आहे. 

तसेच मागील वीस वर्षांपासून एक खासदार म्हणून तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. रायबरेली हे माझे कुटुंब आहे, त्याचप्रमाणे अमेठी देखील माझे घर आहे. माझ्या आयुष्यातील केवळ गोड आठवणीच या जागेशी जोडलेल्या नाहीत, तर आमच्या कुटुंबाची मुळे या मातीशी गेली १०० वर्षे जोडलेली आहेत. राहुल गांधी कधीच येथील जनतेला निराश करणार नाहीत, असेही सोनिया गांधी यांनी नमूद केले.

सोनिया गांधी आणखी म्हणाल्या की, माता गंगेसारखे पवित्र असलेले हे नाते अवध आणि रायबरेलीच्या शेतकरी आंदोलनापासून सुरू झाले आणि आजही कायम आहे. आज खूप दिवसांनी बोलायची संधी मिळाली. तुम्ही मला खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. इंदिराजींवरही तुमचे अपार प्रेम होते. मी त्यांना खूप जवळून काम करताना पाहिले आहे. इंदिराजींचे देखील रायबरेलीच्या लोकांवर अपार प्रेम होते.

"मी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना तेच संस्कार दिले आहेत, जे इंदिरा गांधींनी मला दिले होते. सर्वांचा आदर करा असे मी त्यांना सांगते. दुर्बल लोकांसाठी जसे लढता येईल, त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते करायला सांगितले आहे. एखाद्याचे रक्षण करताना अजिबात घाबरू नका. माझ्या त्यांना आशीर्वाद आहे", असेही सोनिया गांधी यांनी उपस्थितीतांना संबोधित करताना म्हटले. यावेळी राहुल आणि प्रियांका हे दोघेही होते. 

Web Title: lok sabha election 2024 Speaking at Rae Bareli in Uttar Pradesh, former Congress president Sonia Gandhi got emotional while praising Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.