बसपचा हत्ती किती खोलात? अखेरच्या क्षणी मुंबईत सहा उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 08:13 AM2024-05-05T08:13:11+5:302024-05-05T08:13:24+5:30

गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत बसप चर्चेत होता. तेव्हा चारच उमेदवार पक्षाने मुंबईतील निवडणूक रिंगणात उतरवले होते.

How deep is BSP's elephant? At the last moment, six candidates entered the fray in Mumbai | बसपचा हत्ती किती खोलात? अखेरच्या क्षणी मुंबईत सहा उमेदवार रिंगणात

बसपचा हत्ती किती खोलात? अखेरच्या क्षणी मुंबईत सहा उमेदवार रिंगणात

जयंत होवाळ
लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : उत्तर प्रदेशात उतरती कळा लागलेला मायावतींचा बहुजन समाज पक्ष (बसप) महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत कोणाच्या खिजगणतीतही नाही. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतरही बसपचा हत्ती बसूनच होता. मात्र, अचानक अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी बसपने मुंबईतील सहाही मतदारसंघांत उमेदवार उभे केल्याने पक्षात धुगधुगी असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यातही प्रख्यात गायक नंदेश उमप यांना उत्तर पूर्वमधून उमेदवारी देत बसपने आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत बसप चर्चेत होता. तेव्हा चारच उमेदवार पक्षाने मुंबईतील निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यापैकी दोन उमेदवार पाचव्या, तर दोन चौथ्या क्रमांकावर होते. एकाही उमेदवाराला दहा हजार मतांची वेस ओलांडता आली नव्हती. त्याउलट वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घसघशीत मते मिळवली होती. सध्या बसपला देशभरात उतरती कळा लागली. महाराष्ट्रात तर पक्षाचे मजबूत केडरही शिल्लक नाही. २००९ ते २०१४ या काळात विलास गरुड हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. मुंबई आणि महाराष्ट्रातील  तिकीट वाटपावर त्यांचा प्रभाव असायचा. आता मात्र पक्षाचे मुंबई प्रमुख कोण, प्रवक्ता कोण आहे,  याची कोणाला कल्पना नाही.

 २०१४ सालच्या निवडणुकीत  मुंबईतील उत्तर-पूर्व या एकमेव मतदारसंघातून पक्षाला सर्वाधिक १७,४२७ मते मिळाली होती. चाटे क्लासेसचे मच्छिंद्र चाटे त्यावेळी उमेदवार होते. २०१९ मध्ये हे मताधिक्य घसरले. या निवडणुकीत दक्षिण -मध्य मतदारसंघात सर्वाधिक ८६२३ मते मिळाली होती.
ॲड. सुरेश माने हे पक्षाचे खंदे पदाधिकारी होते. मात्र, २०१५ मध्ये त्यांनीही पक्षाला रामराम ठोकला. ज्यांच्या सोबत संघर्ष करायचा होता, त्यांच्यासोबतच मायावतींनी हातमिळवणी केल्याने संघर्ष कोणासोबत करायचा, असा प्रश्न कार्यकर्त्यांपुढे पडला. आंबेडकरी विचारधारेपासून पक्ष दूर गेला, पक्षाला बाजारूपणा आला, तिकीट वाटपापुरता पक्ष मर्यादित  राहिला. त्यामुळे बसपा रसातळाला गेला, असे निरीक्षण माने यांनी नोंदविले. 

Web Title: How deep is BSP's elephant? At the last moment, six candidates entered the fray in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.