प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांचा 'महिंद्रा स्कॉर्पियो'मधून १२ कि.मी. प्रवास; मतदारांना केलं खास आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 06:28 PM2024-05-18T18:28:07+5:302024-05-18T18:30:46+5:30

पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई, ठाणे, कल्याणसह आसपासच्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केलं होतं.

Chief Minister eknath shinde traveled 12 km in Mahindra Scorpio | प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांचा 'महिंद्रा स्कॉर्पियो'मधून १२ कि.मी. प्रवास; मतदारांना केलं खास आवाहन

प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांचा 'महिंद्रा स्कॉर्पियो'मधून १२ कि.मी. प्रवास; मतदारांना केलं खास आवाहन

डोंबिवली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया २० मे रोजी पार पडणार आहे. निवडणूक प्रचार संपण्यापूर्वी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय नेत्यांकडून सुरू होता. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यंदा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संपूर्ण राज्य पिंजून काढलं. आता पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई, ठाणे, कल्याणसह आसपासच्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केलं होतं. अशातच बापगाव हेलिपॅडवर उतरल्यानंतर नियमित वाहनाला उशीर झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हेलिपॅड ते डोंबिवली असा १२ किलोमीटरचा प्रवास 'महिंद्रा स्कॉर्पियो'तून केल्याचं पाहायला मिळालं. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे ठाणे विभागाचे संचालक सत्यजित पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचे सारथ्य केले. यावेळी स्वदेशी बनावटीबद्दल महिंद्रा कंपनीचं कौतुक करत मुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारांनाही खास आवाहन केलं आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, "येत्या २० तारखेला महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. माझं सर्व मतदार बंधू-भगिनींना आवाहन आहे की, आपलं एक मत देशाचा विकास घडवणार आहे, आपलं एक मत देशाची प्रगती करणारं आहे आणि आपलं एक मत राष्ट्र घडवणारं ठरणार आहे. त्यामुळे २० मे रोजी सकाळी ७ वाजता आपल्या कुटुंबासह मतदानाचा पवित्र हक्क बजावा आणि या देशाची लोकशाही आणखी समृद्ध करा," असं आवाहन शिंदे यांनी जनतेला केलं आहे.

माझ्या ताफ्यातही महिंद्राच्या अनेक गाड्या...मुख्यमंत्री काय म्हणाले?

महिंद्रा स्कॉर्पियोतून आज प्रवास केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "माझ्या ताफ्यातही महिंद्राच्या अनेक गाड्या आहेत. महिंद्राची वाहने अत्यंत दणकट आणि मजबूत आहेत. या गाड्या शहरात, गावांमध्ये, अगदी कुठेही चालतात. स्वदेशी बनावटीची ही महिंद्रा स्कॉर्पियो गाडी आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनीही आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे. आत्मनिर्भरतेतून आत्मसन्मान मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि महिंद्रादेखील यामध्ये भर टाकत आहे," असं मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं आहे.

Web Title: Chief Minister eknath shinde traveled 12 km in Mahindra Scorpio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.