उद्धव ठाकरे अजूनही एक डाव धोबीपछाड देऊ शकतात, कसं? एकदा हे वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 05:52 PM2022-07-07T17:52:36+5:302022-07-07T18:13:16+5:30

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे निर्माण झालेलं वादळ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शमलं असेल वाटत असेल तर तसं अजिबात नाहीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आता शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. कारण या बंडाचं लोण खासदार, महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समिती अशा सर्व पातळीवर पोहोचणार आहे. पण ज्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आहे अशा उद्धव ठाकरेंना कमी समजून चालणार नाही.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत सामील झालेले ३९ आमदार हे बंड इथवरच थांबणारं नाहीय. कारण एकनाथ शिंदेंसारखा तगडा जनसंपर्क असलेला नेता हातून जाणं म्हणजेच आता ठाणे पालिका देखील गेल्यात जमा आहे. तसंच याचे परिणाम नाशिक, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात महत्वाच्या ठिकाणी दिसणार याची पूर्ण कल्पना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचं सत्र त्यांनी सुरू केलं आहे.

शिवसेनेला येत्या काळात आणखी काही मोठे धक्के बसू शकतात. त्यामुळे बाळासाहेबांनी कमावलेली ताकद आणि पक्षाचं अस्तित्व उद्धव ठाकरे असं सहजासहजी कमकुवत होऊ देतील अशी शक्यता नाही. आमदार गेले, खासदार गेले, नगरसेवक गेले तरी चालतील. पण शिवसेनेचा कार्यकर्ता आपल्यासोबत राहावा यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत.

बाळासाहेबांना मानणारा हाडाचा कार्यकर्ता सोबतीला घेऊन नव्या कार्यकर्त्यांची ओढ पक्षाकडे वाढविण्यासाठी उद्धव ठाकरेंना अधिक लक्ष घालावं लागणार आहे. यात आदित्य ठाकरेंची भूमिका अत्यंत महत्वाची ठरू शकेल. दरवेळी निवडणूक मतदानात तरुणाईच्या मतदानाचा आकडा लक्षणीयरित्या वाढताना दिसतो. हीच बाब लक्षात घेऊन युवा मतदारांना पक्षाकडे खेचण्यासाठी एक आखीवरेखीव कार्यक्रम युवासेना आखू शकते.

भेट मिळत नाही, दौरे होत नाहीत अशा तक्रारी बंडखोर आमदारांनी वारंवार बोलून दाखवल्या आहेत. त्यामुळे आता पक्षाला नव्यानं उभारी देण्यासाठी समोर असलेलं आव्हान स्वीकारून राज्यभर जनसंपर्क दौरा उद्धव ठाकरे करू शकतात. दौराचा व्यवस्थित सर्वसमावेशक कार्यक्रम आखून तळागळापर्यंत पोहोचून पक्षाला बळकट जनसंपर्काची जोड उद्धव ठाकरे देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

शिवसेनेनं आजवर शरद पवारांविरोधात राजकारण केलेलं असलं तरी पवारांच्या बुद्धीचातुर्य आणि राजकीय डावपेचांचं खुद्द बाळासाहेबांनीही अनेकदा कौतुक केल्याचेही दाखले आहेत. बंडखोरांनी पक्षात ठराविक व्यक्तींना जास्त महत्व आणि अधिकार असल्याचे आरोप केले. याची दखल घेऊन पक्ष संघटनेतील महत्वाच्या पदांसाठी भाकरी फिरवून नव्यांना संधी देण्याचा पर्याय उद्धव ठाकरेंसमोर आहे.

जसं राष्ट्रवादीत प्रवक्ते असले तरी त्यांची इमेज शरद पवारांपेक्षा मोठी नाही. किंबहुना पवारांनी प्रत्येक पदाचं गांभीर्य ओळखून प्रत्येकाचे अधिकार आणि मर्यादेची शिकवणी वारंवार आपल्या मार्गदर्शनातून पक्षातील नेत्यांना देत आले आहेत. त्याचपद्धतीनं उद्धव ठाकरेंनाही पक्ष संघटनेत प्रवक्ते, नेते आणि इतर महत्वाच्या पदांबाबत फेरबदल करणं. तसंच मर्यादा घालून देण्याबाबत विचार करणं महत्वाचं ठरू शकेल.

महाविकास आघाडीच्या स्वरुपात शरद पवारांच्या भूमिकेशी सूत जुळलेले असल्याचा फायदा घेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला तर सकारात्मक संदेश राज्यात देता येईल. पक्षात सध्याच्या निराशाजनक वातावरणाची मरगळ झटकून टाकण्यासाठी ही बाब अत्यंत महत्वाची ठरू शकेल.

शिवसेना मर्द मावळ्यांचा पक्ष असल्याचं उद्धव ठाकरे अनेकदा भाषणातून बोलत असतात. संघर्ष आणि रस्त्यावर लढणारा पक्ष अशा धाटणीचा पक्ष असल्यामुळे तशी भूमिका असणं योग्यही आहे. पण वास्तविक पाहता शिवसेनेची महिला सेनेची ताकद प्रचंड आहे. याच शिवसैनिक महिला सध्याच्या कठीण काळात पक्षासाठी भक्कम आधारवड ठरू शकतात.

राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या महिला नेत्यांचे मेळावे घेऊन त्यांना स्फूरण देणं आणि स्थानिक पातळीवर पक्ष अबाधित ठेवण्यासाठी महिला सैनिकांची मदत घेतली जाऊ शकते. यात शिवसेनेतील आदेश बांदेकर, उर्मिला मातोंडकर यांसारख्या नेत्यांना जबाबदारी देऊन घराघरात पोहोचून महिला कार्यकर्त्यांमधील संभ्रमावस्थता दूर करता येईल.

हिंदुत्वाच्या मुद्द्याशी तडजोड झाली या मुख्य आरोपाखाली बंडखोरांनी अशी बंडखोरीची वेळ आल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या विचारांना पक्षानं सोडलेलं नाही असा संदेश जनतेत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंना ठोस पावलं उचलावी लागणार आहेत. यात पक्ष पातळीवर काही कार्यक्रम किंवा धोरण निश्चित करुन बंडखोरांना धोबीपछाड देता येऊ शकेल. तसंच पक्षात चार ठराविक लोकांना महत्व असल्याचा आरोप कसा चुकीचा आहे याचा संदेश सर्वांपर्यंत जाण्यासाठी पक्षीय जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल करण्याचा पर्याय उद्धव ठाकरेंकडे उपलब्ध आहे.