Sachin Vaze: ट्रायडंट हॉटेलमध्ये सचिन वाझेंसोबत दिसलेली 'ती' कोण? त्या ५ बॅगांचा शोध सुरू By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 06:12 PM 2021-03-23T18:12:59+5:30 2021-03-23T18:20:54+5:30
Nia Is Now Looking For A Woman Who Was With Sachin Waze In Hotel: सचिन वाझे १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान ट्रायडंटमध्ये वास्तव्यास; सीसीटीव्हीत दिसली महिला मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा (Mukesh Ambani Security Scare) तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) हाती घेतल्यापासून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या घटनेचा तपास करणारे पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या (Sachin Vaze) अटकेनंतर एनआयएच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत.
सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवली. अंबानींच्या घराजवळ पांढरा कुर्ता घालून वाझेच फिरत होते. त्यामुळे हा सगळ्या कारस्थानामागे त्यांचाच हात असल्याचा दाट संशय एनआयएला आहे.
अंबानी यांच्या घराबाहेर एक व्यक्ती पीपीई किट घालून चालताना दिसली होती. त्यानंतर एनआयएनं वाझेंना अंबानींच्या घराजवळील रस्त्यावर पीपीई किट घालून चालायला लावलं होतं. यानंतर आता एनआयएनं आणखी एक रिक्रिएशन केलं आहे.
२५ फेब्रुवारीला अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली. त्याआधी ५ दिवस वाझे हॉटेल ट्रायडंटमध्ये मुक्कामास होते. १६ ते २० फेब्रुवारी वाझेंचं वास्तव ट्रायडंटमध्ये होतं.
एनआयएनं जवळपास तीन तास हॉटेलमध्ये तपास केला. यातून बरीच महत्त्वाची माहिती पुढे आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एनआयएच्या अधिकाऱ्यांना एक महिला दिसली असून तिच्या हालीचाली संशयास्पद आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये सचिन वाझेंसोबत दिसलेल्या महिलेच्या हाती नोटा मोजण्याची मशीन आहे. विशेष म्हणजे एनआयएनं काही दिवसांपूर्वीच वाझे वापरत असलेली एक मर्सिडीज जप्त केली. त्यात ५ लाख रुपये आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली होती.
अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्याचं कारस्थान हॉटेल ट्रायडंटमध्येच रचण्यात आल्याचा संशय एनआयएला आहे. आता एनआयएचे अधिकारी वाझेंसोबत दिसलेल्या त्या महिलेचा शोध घेत आहेत.
सचिन वाझे बोगस कागदपत्रांच्या आधारे हॉटेल ट्रायडंटमध्ये वास्तव्यास होते. स्वत:चा फोटो असलेला, पण गावडे नाव असलेल्या आधार कार्डचा वापर त्यांनी केला होता. हॉटेलमध्ये वास्तव्यास असताना त्यांच्याकडे ५ बॅगा होत्या.
वाझेंकडे असलेल्या पाच बॅगांपैकी एका बॅगेत जिलेटिनच्या कांड्या असाव्यात असा संशय एनआयएला आहे.
वाझेंसोबत हॉटेलमध्ये दिसलेल्या महिलेच्या हातात नोटा मोजण्याची मशीन असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं. ही महिलादेखील संपूर्ण कारस्थानात सहभागी असावी असा संशय एनआयएला आहे.