Mansukh Hiren Case: ...अन् मनसुख हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले; त्या ५ रुमालांमुळे संशय आणखी वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 11:15 AM2021-03-25T11:15:47+5:302021-03-25T11:22:59+5:30

मनसुख हिरेन प्रकरणी (Mansukh Hiren Case) अनेक गाड्या देखील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवल्या होत्या.

मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्ट्रात दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस ) ठाणे न्यायालयाने बुधवारी मोठा झटका दिला. मनसुख हत्या प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) सोपविण्यात यावे, असे आदेश ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. इंगळे यांनी दिले आहेत. शिवाय, एटीएसने अटक केलेल्या विनायक शिंदे आणि क्रि केट बुकी नरेश गोर या दोन्ही आरोपींचाही ताबा एनआयएकडे देण्याचेही आदेश दिले.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात (Mansukh Hiren Case) दीव दमण येथून जप्त केलेली व्होल्वो कार ४ मार्च रोजी सचिन वाझेने (Sachin Vaze) काही कामानिमित्त ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. याच वाहनात मनसुख यांची हत्या केल्याचा संशय एटीएसला होता.

एटीएसने जप्त केलेली गाडी दमण येथील अभिषेक अग्रवाल यांची आहे. त्यांचा सायकल विक्रीचा व्यवसाय आहे. याच व्यवसायात वाझेही भागीदार होता. वाझेने कामानिमित्त ४ मार्च रोजी ही गाडी स्वतःकडे घेतली होती, अशीही माहिती समोर येत आहे. अशात, ४ मार्च रोजी विनायक शिंदेने बनावट सिमकार्डद्वारे तावडे नावाने मनसुख यांना कॉल करून बोलावून घेतले. पुढे, याच वाहनात मनसुख यांची हत्या केल्याचा संशय एटीएसकडून वर्तवण्यात आला होता.

अनेक गाड्या देखील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवल्या होत्या. त्यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकण्यात आलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

तत्पूर्वी, हिरेन यांचा मृतदेह सापडला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता. त्यांच्या नाकात आणि तोंडात रुमाल कोंबण्यात आले होते. एकूण पाच रुमाल त्यांच्या तोंडात खूपसण्यात आले होते. हे रुमाल रोल करण्यात आले होते.

मनसुख हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवावा असे आदेश केंद्र सरकारने २० मार्च २०२१ रोजी महाराष्ट्रात एटीएसला दिले होते. मात्र, राज्य सरकारने परवानगी दिली नसल्याचे कारण दाखवत एटीएसने हा तपास एनआयएकडे सोपविला नव्हता. त्यामुळेच २४ मार्च रोजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आॅफ इंडिया अनिल सिंग आणि अ‍ॅड. संदेश पाटील यांनी एनआयएची ही सर्व बाजू ठाणे न्यायालयात मांडली. एटीएसने हा मनसुख हत्या प्रकरणाचा तपास थांबवावा. तो एनआयए अ‍ॅक्टच्या सेक्शन ६ आणि ८ नुसार एनआयएकडे हस्तांतरित करण्याची मागणी न्यायालयात केली होती. सेक्शन ९ नुसार राज्य सरकार अर्थात एटीएस यामध्ये केवळ सहाय्य करु शकते, असाही युक्तिवाद करण्यात आला.

दोनच दिवसांपूर्वी एटीएसने सचिन वाझे यांचा मनसुख हत्या प्रकरणात प्रमुख सहभाग असून त्यांचा ताबा एनआयएकडून घेण्यासाठी न्यायालयाकडे मागणी करणार असल्याचे म्हटले होते. तत्पूर्वीच न्यायालयाने या तपासासह आरोपींनाही न्यायालयामार्फत आपल्या ताब्यात घेतल्याने एटीएसला ही मोठी चपराक असल्याचे बोलले जात आहे.

सर्व बाजू ऐकल्यानंतर न्या. इंगळे यांनी मनसुख हत्या प्रकरणाचा तपास एटीएसने थांबवून तो सर्व कागदपत्रांसह एनआयएकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. शिवाय, एटीएसने अटक केलेल्या विनायक शिंदे आणि क्रि केट बुकी नरेश गोर या दोघांचाही ताबा एनआयए कडे सोपवावा, असेही आदेश दिले. एटीएसची बाजू अ‍ॅड. अनिता सुपारे यांनी मांडली. यावेळी एनआयएचे पोलीस अधीक्षक विक्रम कलाटे, एटीएसचे सहायक पोलीस आयुक्त श्रीपाद काळे आदी उपस्थित होते.