नाट्यसंमेलनावर तरुण रंगकर्मींची उमटतेय छाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 06:08 AM2018-06-11T06:08:39+5:302018-06-11T06:08:39+5:30

मुलुंडमध्ये होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला आता दोन दिवस उरले आहेत. प्रसाद कांबळी यांनी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा दोन महिन्यांपूर्वी स्वीकारली.

Youthful impression of young painters on drama gathering | नाट्यसंमेलनावर तरुण रंगकर्मींची उमटतेय छाप

नाट्यसंमेलनावर तरुण रंगकर्मींची उमटतेय छाप

Next

- अजय परचुरे
मुंबई - मुलुंडमध्ये होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला आता दोन दिवस उरले आहेत. प्रसाद कांबळी यांनी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा दोन महिन्यांपूर्वी स्वीकारली. तरुण अध्यक्ष म्हणून रंगकर्मींच्या त्यांच्याकडून अपेक्षाही जास्त आहेत; पण हे नाट्यसंमेलन यशस्वी करण्यासाठी काही तरुण नाट्य शिलेदारही अहोरात्र मेहनत करत आहेत. यात परिषदेतील नियामक मंडळातील मंडळी, बॅकस्टेज आर्टिस्ट, तरुण पिढीचे कलाकार आणि दिग्दर्शकसुद्धा सामील झाले आहेत. गेली कित्येक वर्षे नाट्यसंमेलनामध्ये हरवलेली तरुणाई या आश्वासक वातावरणामुळे संमेलनाच्या जवळ आली आहे.
प्रसाद कांबळी हे या टीमचे कप्तान आहेत; पण पडद्यामागे काम करणारे अजून तरुण हात खूप आहेत. नियामक मंडळातील भरत जाधव, मधुरा वेलणकर-साटम, संदीप जंगम, सतीश लोटके, अशोक नारकर या मंडळींची रसद त्यांना मिळते आहे. या तरुण टीमला मार्गदर्शन करणारे गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी-मोने, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, राजन भिसे ही ज्येष्ठ रंगकर्मींची टीमही अंगात उत्साह संचारल्यागत कामाला लागली आहेत.नियामक मंडळात नसूनही रंगभूमीची सेवा करण्यासाठी अनंत पणशीकर, संतोष काणेकर, रत्नकांत जगताप, सुनील देवळेकर, श्रीकार कुलकर्णी, गणेश गावकर ही दुसरी टीम नाट्यसंमेलन सुरळीत होण्यासाठी पडद्यामागून मेहनत करत आहे. नाट्यसंमेलनाचा निमंत्रक दिगंबर प्रभू याने आपल्या मुलुंडच्या नाट्यपरिषद शाखेला हाताशी धरून अवघ्या एक महिन्यात हे संमेलन यशस्वीपणे घडवून आणूच, असा ध्यास घेतला आहे. या सर्वाच्या परिणामी सध्या संमेलनावर नव्या पिढीची छाप दिसते आहे.

संमेलनाला युवास्पर्श!

नाट्यसंमेलनाकडे तरुण रंगकर्मी पाठ फिरवतात, ही नेहमीची ओरड असते. मात्र, या संमेलनात हे चित्र काही अंशी तरी बदलेल, असे चित्र सध्या दिसते आहे. सध्या मराठी रंगभूमी गाजवणारी तरुण मंडळी या संमेलनात हिरिहिरीने सहभाग घेणार आहेत.
दिग्दर्शक प्रताप फड, प्राजक्त देशमुख, संगीतकार आनंद ओक, अभिनेत्री ऋजुता बागवे, शुभांगी सदावर्ते, मानसी जोशी, अभिनेता सिद्धार्थ जाधवपासून सर्व तरुण मंडळी या संमेलनात येणार आहेत.

नाट्यदिंडीपासून सर्व कार्यक्रमात ही मंडळी भाग घेणार आहेत, त्यामुळे काही वर्षांपासून संमेलनापासून दुरावलेली ही तरुणाई परिषदेतील आश्वासक वातावरणामुळे पुन्हा एकदा जोडली जाणार आहे.
शिवाय संमेलन मुंबईतच असल्याने चित्रपट-नाट्यक्षेत्रासोबतच मालिकांत काम करणाºयांना त्यांच्या सोयीनुसार संमलेनात सहभागी होणे शक्य होईल. त्यामुळे वेगवेगळ््या माध्यमांत काम करणारे रंगभूमी कलावंत संमेलनात पाहायला मिळतील.

Web Title: Youthful impression of young painters on drama gathering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.