अधिसभेत युवा सेनाच मोठा भाऊ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 05:09 AM2018-03-29T05:09:30+5:302018-03-29T05:09:30+5:30

मुंबई विद्यापीठ अधिसभेच्या (सिनेट) पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रविवारी पार पडल्यानंतर मंगळवारी सुरू झालेली मतमोजणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Youth Army big brother in the Senate! | अधिसभेत युवा सेनाच मोठा भाऊ!

अधिसभेत युवा सेनाच मोठा भाऊ!

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठ अधिसभेच्या (सिनेट) पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रविवारी पार पडल्यानंतर मंगळवारी सुरू झालेली मतमोजणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, राखीव प्रवर्गांच्या जागांवर युवा सेनेने एकहाती वर्चस्व मिळवत पाचही जागा जिंकल्याची घोषणा प्रशासनाने बुधवारी केली. तर खुल्या गटातील उमेदवारांनी मिळवलेल्या मतांची मोजणी गुरुवारी पूर्ण झाल्यानंतरच निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे.
शासनाने आखलेल्या नव्या कायद्यानुसार पहिल्यांदाच होणाऱ्या अधिसभेच्या या निवडणुकीत पाचही जागांवर युवा सेनेने सहज विजय मिळवला. महत्त्वाची बाब म्हणजे चुरशीच्या मानल्या जाणाºया या निवडणुकीत सर्वांचीच अपेक्षा फोल ठरवत युवा सेनेचे सर्वच उमेदवार १० हजारांहून अधिक मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा या निवडणुकीत अक्षरश: धुव्वा उडाल्याचे दिसून आले. परिणामी, खुल्या प्रवर्गातील जागांमध्ये युवा सेनेचे उमेदवार विजयी लय कायम राखणार का? याकडेच विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. याउलट मनविसेसह अभाविप खुल्या गटांत तरी अधिसभेवरील खाते उघडणार का? हे गुरुवारच्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राखीव प्रवर्गांमधील महिला प्रवर्गातून शीतल शेठ, अनुसूचित जाती प्रवर्गामधून निखील जाधव, अनुसूचित जमाती प्रवर्गातून धनराज कोहचडे, डीटीएनटी प्रवर्गातून शशिकांत झोरे आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातून राजन कोळंबकर या युवा सेनेच्या पाच उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत शीतल शेठ यांना एकूण १८ हजार ३०८ मते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी अभाविपच्या उमेदवार शलाका मिठबावकर यांना केवळ २ हजार ६८४ मते मिळाली आहेत. शीतल शेठ यांच्याप्रमाणेच युवा सेनेच्या निखिल जाधव यांनी १८ हजार ०८८ मते मिळवत, तर धनराज कोहचडे यांनी १८ हजार ७६७ मते मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवारांचा धुव्वा उडवला. विजयी उमेदवारांत शशिकांत झोरे आणि राजन कोळंबकर यांची अधिसभेवर निवडून जाण्याची ही दुसरी वेळ आहे.

कोण ठरणार बाजीगर?
राखीव प्रवर्गात युवा सेनेने पाचही जागा एकहाती जिंकल्याने खुल्या प्रवर्गाच्या निकालांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. खुल्या प्रवर्गाच्या पाच जागांसाठी तब्बल ३६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे पसंतीक्रमाच्या या लढाईत मतदारांच्या पसंतीस कोण उतरणार? हे गुरुवारी पहाटेपर्यंत निश्चित होईल.

Web Title: Youth Army big brother in the Senate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.