'Yes, Amol kolhe sold Parel home for series', director kartik Kende was the witness | 'होय, अमोलनं मालिकेसाठीच परळचं घर विकलं', दिग्दर्शक केंढेंच होते साक्षीदार 
'होय, अमोलनं मालिकेसाठीच परळचं घर विकलं', दिग्दर्शक केंढेंच होते साक्षीदार 

मुंबई - महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर मतदारसंघातील उमेदवार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या घराबद्दलचा वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेकडून अमोल कोल्हेंनी घर विकले नसल्याचे म्हणत, अमोल कोल्हे श्रीमंत व्यक्ती असल्याचे म्हटले. या वादात आता मालिकेचे दिग्दर्शक कार्तिक केंढे यांनीच उडी घेतली आहे. तसेच, एका घटनेचा उल्लेख करताना, अमोलनं मालिकेसाठीच परळमधील घर विकल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष, म्हणजे मी स्वत: या घटनेचा साक्षीदार असल्याचेही त्यांनी आपल्या पत्रातून म्हटले आहे.  

निवडणुकांच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. त्यातून स्वराजरक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका निभावणाऱ्या अमोल कोल्हेंबाबत उलट-सुलट चर्चा होत आहेत. निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर, जर कोल्हेंची संपत्ती 5 कोटी रुपये आहे, तर मग त्यांनी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिकेसाठी घर गहाण ठेवल्याची अफवाच, असे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं होत. या प्रकरणावरुन कोल्हेंना ट्रोलही करण्यात आलं. मात्र, याबाबत कोल्हे समर्थकानेही पत्राद्वारे खुलासा केला होता. आता, या वादात मालिकेचे दिग्दर्शक कार्तिक केंढे यांनीही खुले पत्र लिहून अमोल कोल्हेंनी घर विकल्याचे समर्थन केले. तसेच, माझ्यासमोरच ही घटना घडल्याचा प्रसंगही त्यांनी सांगितला.  

 

''जेव्हा ९ जाने ते २० जाने २०१७ रोजी ह्या मालिकेचे पहीले चित्रीकरण करून, आपण सगळे मुंबईला आलो आणि २१ जाने २०१७ रोजी आपल्याला संबंधित वाहीनी कडून सांगण्यात आले की ही मालीका आम्ही करणार नाही, तेव्हा पायाखालची जमिन सरकली होती, ७/८ वर्षांची आपल्या संपुर्ण टिमची मेहनत पाण्यात गेली, असे मला वाटले होते, संपुर्ण टिम युद्ध हारल्याप्रमाणे, शस्त्र खाली ठेऊन, खालमानेने, ह्या संकटातून बाहेर पडण्याचा विचार करीत होती, पण मित्रा, तू हारला नाहीस, संभाजी महाराजांवरील श्रद्धेमुळे तू, त्याही परीस्थितीत लढलास. आणि परीस्तिथी बदललीस, मालिका पुन्हा सुरू केलीस, हाती पैसा नाही , होते फक्त स्वप्न…. .

आणि हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तू कुठलाही विचार न करता परळ येथे घेतलेले घर विकलेस, तूझी गाडी विकायला ठेवलीस, आणि मालीकेचे चित्रीकरण सुरू केलेस, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आणण्याठी तू केलेली महनत, तू केलेला आभ्यास आणि तू केलेला त्याग, ह्या सगळ्याचाच मी साक्षीदार आहे…''  असे कार्तिक केंढें यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंनी घर विकल्याची बातमी खरी असल्याच्या घटनेवर शिक्कामोर्तब झाले आहे. 

 


Web Title: 'Yes, Amol kolhe sold Parel home for series', director kartik Kende was the witness
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.