जागतिक पाणथळ दिन विशेष: प्रदूषणाने पाणथळी धोक्यात; पर्यावरणवाद्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 12:40 AM2019-02-02T00:40:51+5:302019-02-02T00:43:34+5:30

प्लॅस्टिकने घेतला ताबा; शहर, उपनगरातून सोडल्या जाणाऱ्या प्रदूषित पाण्याचा दुष्परिणाम

World Wetlands Day Special: Pollution is in danger due to water scarcity; Angry in environmentalists | जागतिक पाणथळ दिन विशेष: प्रदूषणाने पाणथळी धोक्यात; पर्यावरणवाद्यांमध्ये नाराजी

जागतिक पाणथळ दिन विशेष: प्रदूषणाने पाणथळी धोक्यात; पर्यावरणवाद्यांमध्ये नाराजी

Next

मुंबई : विकासकामांस, प्रकल्पांस विरोध नाही. मात्र, पर्यावरणाची हानी करत विकास होत असेल आणि पाणथळीच्या जागा नष्ट होत असतील तर ते योग्य नाही, असे म्हणत पर्यावरणवाद्यांनी ‘जागतिक पाणथळ जागा दिना’निमित्त मुंबईकरांना पाणथळीच्या जागा वाचविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. माहिम येथील मिठी नदीचा किनारा, शिवडी खाडी, माहिम खाडीसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील समुद्र किनाºयावरील पाणथळींच्या जागा नष्ट होत असून, सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने पर्यावरणवाद्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आजघडीला मुंबई महानगर प्रदेशाचा विचार केला, तर माहिम खाडी, शिवडी खाडी, मिठी नदीचा काहीसा परिसर, नवी मुंबईलगतचा परिसर येथील पाणथळींच्या जागा धोक्यात आहेत. विशेषत: अनेक जागांमध्ये कचºयाची भर पडत असून, प्लॅस्टिकच्या कचºयासह उर्वरित कचºयाने पाणथळीच्या जागा धोक्यात आल्या आहेत. शिवाय शहरासह उपनगरातून सोडले जाणारे प्रदूषित पाणी पाणथळीचा गळा घोटत असून, यावर महापालिकेकडून आवश्यक उपाय योजना केल्या जात नाहीत.

परिणामी, येथील परिसंस्थेला म्हणजेच जैवविविधतेला धोका पोहोचत असून, यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, १९०० पासून जगातील पन्नास टक्के पाणथळ जागा नष्ट झाल्या असून, यातील अनेक जागा या गेल्या पन्नास वर्षांत नाहीशा झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे पाणथळ जागा नष्ट होत असल्याने पुराचा धोका वाढत आहे. पुराचा धोका वाढल्याने पाण्यामार्फत पसरत असलेल्या रोगांचा प्रादुर्भाव होतो, याकडेही पर्यावरणवाद्यांनी लक्ष वेधले आहे. अशा प्रकारे पर्यावरणाची हानी होणे धोक्याचे असल्याचेही पर्यावरणवाद्यांनी सांगितले़

प्रगतीच्या प्रयत्नात प्रकृती नष्ट
आर्द्र भूमीमुळे वातावरणात संतुलित राहते. जगभरात प्रदूषण वाढत आहे. विकसनशील देश प्रगती करण्याच्या प्रयत्नात प्रकृती नष्ट करत आहेत. वाढते औद्योगिकरण, मानवी गरजा, वाढत्या मागण्या आणि वाहनांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या या गोष्टी पृथ्वीसाठी घातक ठरत आहेत. झाडांची संख्या कमी होत असून, झाडे मोठ्या संख्येने लावली पाहिजेत. प्रदूषणाची समस्या इतकी जटिल आहे की, फक्त झाडे लावल्याने सकारात्मक परिणाम होणार नाहीत.
- हिमांशू प्रेम, प्रशासक, भवन्स नेचर अ‍ॅडव्हेन्चर सेंटर

संवर्धन गरजेचे
पाणथळ जमिनीमुळे तापमान कमी राहते. पाणथळींचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पृथ्वीवरील वापरण्यायोग्य पाणी कमी होत आहे, परंतु पाणथळ जमिनीचे संरक्षण केले, तर आयुष्यभर पाणीपुरवठा होईल. पाणथळ जमिनीवर भराव टाकून त्या नष्ट केल्यास भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होईल. पाणथळ जमिनीमध्ये मत्स्यपालन आणि पक्ष्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात असतो. पाणथळ वाचली, तर सृष्टी वाचेल.- डी. स्टॅलिन, संचालक, वनशक्ती प्रकल्प

...तर आपल्याला पाणथळच वाचवेल
सागरी संकट निर्माण झाले, तर आपल्याला पाणथळच वाचवू शकेल. मुंबईमधील कित्येक पानथळ जमिनीवर भराव टाकून गगनचुंबी इमारती उभ्या केल्या आहेत. सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आहे. त्यामुळे भविष्यात नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली, तर याला सर्वस्वी जबाबदार आपणच आहोत.
- झोरु बथेना, पर्यावरणप्रेमी.

पाणथळ जागा ही संमिश्र परिसंस्था असून, यात भूपृष्ठीय, किनारी आणि सागरी अधिवासाची वैविध्यता आढळते.
नैसर्गिक जैवविविधता जिवंत राहण्यासाठी पाणथळ जागा आवश्यक आहेत.
दुर्मीळ प्रजातीच्या पशुपक्षांना, नामशेष होत चाललेल्या वनस्पती व कीटकांना, स्थलांतरित पक्षांना या जागा अधिवास पुरवितात.
देशातल्या बहुतांश पाणथळ जागा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गंगा, कावेरी, कृष्णा, गोदावरी या नदीसंस्थांशी जोडल्या आहेत.
इंडो-गँजेटिक वेटलँडस ही देशातील सर्वात मोठी पाणथळ जागांची व्यवस्था म्हणून ओळखली जाते. सिंधू नदीपासून ब्रह्मपुत्रेपर्यंत ती विखुरेलेली आहे.
किनारी पाणथळ जागा या पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश, तामीळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी पट्ट्यालगत पसरल्या आहेत. खारफुटींचा यात प्रामुख्याने समावेश आहे.
पाणथळ जागांचे प्रशासन कोणाच्याही अखत्यारीत येत नाही. यांचे व्यवस्थापन प्रामुख्याने पर्यावरण व वन मंत्रालयाची जबाबदारी आहे.

Web Title: World Wetlands Day Special: Pollution is in danger due to water scarcity; Angry in environmentalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.