कमला मिल आगप्रकरणी सीबीआय चौकशी करणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 06:17 AM2018-04-10T06:17:16+5:302018-04-10T06:17:16+5:30

कमला मिल दुर्घटनेत गंभीररीत्या जखमी झालेल्या एकाच कुटुंबातील सात जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Will CBI probe in Kamla Mill fire proceedings? | कमला मिल आगप्रकरणी सीबीआय चौकशी करणार का?

कमला मिल आगप्रकरणी सीबीआय चौकशी करणार का?

Next

मुंबई : कमला मिल दुर्घटनेत गंभीररीत्या जखमी झालेल्या एकाच कुटुंबातील सात जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी व नुकसानभरपाई मिळावी, अशी विनंती या सर्वांनी याचिकेद्वारे केली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सोमवारी दिले.
न्या. शंतनू केमकर व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना या प्रकरणाची सीबीआय चौकशी का करण्यात यावी, याचे स्पष्टीकरण देण्यासाठी याचिकेमध्ये सुधारणा करण्याचे निर्देशही या वेळी दिले.
याचिकाकर्ते प्रतीक ठाकूर व त्यांचे कुटुंब दुर्घटनेच्या दिवशी वन अबव्ह या पबमध्ये डिनरसाठी आले होते. मात्र, ते या आगीत होरपळले. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला.
ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेत समाजातील प्रभावी व्यक्ती आणि बडे सरकारी अधिकारी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असल्याने पोलिसांनी नीट तपास केला नाही. ‘पब्सचे मालक, चालक समाजातील प्रभावी व्यक्ती असल्याने पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्यास मागेपुढे करत आहेत. त्यामुळे आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करणे योग्य आहे,’ असे याचिकेत म्हटले आहे.
त्यावर न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे वकील प्रकाश वाघ यांना याआधीच याची चौकशी न्यायालयीन आयोगाला करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. तरीही वाघ यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, असा आग्रह केला. त्यामुळे न्यायालयाने वाघ यांचे कारण नमूद करण्यासाठी याचिकेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले. राज्य सरकार व पोलीस यांनाही या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश देत न्यायालयाने या याचिकेची सुनावणी चार आठवड्यांनंतर ठेवली आहे.

Web Title: Will CBI probe in Kamla Mill fire proceedings?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.