वन्यजीवप्रेमींची खंत : उपक्रमांनाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत नसल्याबाबत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:40 AM2017-10-07T02:40:54+5:302017-10-07T02:41:04+5:30

वनसंवर्धन आणि वन्यजीव संवर्धनाबाबत हाताच्या बोटावर मोजण्याइतपत संस्था कार्यरत असल्या तरी सरकारी पातळीवर याबाबत पुरेसे काम केले जात नाही.

Wildlife conspiracy: Displeasure about the activities of the people too | वन्यजीवप्रेमींची खंत : उपक्रमांनाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत नसल्याबाबत नाराजी

वन्यजीवप्रेमींची खंत : उपक्रमांनाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत नसल्याबाबत नाराजी

Next

अक्षय चोरगे
मुंबई : वनसंवर्धन आणि वन्यजीव संवर्धनाबाबत हाताच्या बोटावर मोजण्याइतपत संस्था कार्यरत असल्या तरी सरकारी पातळीवर याबाबत पुरेसे काम केले जात नाही. विशेषत: मुंबई शहर आणि उपनगरात मुळातच आरे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वगळले तर फारशी वनसंपदा नाही. तिवरांच्या जंगलाबाबत तर आपल्याकडे उदासीनता असून, उरलीसुरलेली हिरवळही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पर्यायाने हिरवळीतल्या वन्यजिवांनाही यामुळे धोका निर्माण होत असून, वन्यजीव संवर्धनाबाबत आपल्याकडे असलेली निष्क्रियतचा यास कारणीभूत असल्याचे मत वन्यजीवप्रेमींनी मांडले आहे.
वन्यजीव सप्ताह सध्या अनेक ठिकाणी साजरा केला जात आहे. ४ आॅक्टोबर रोजी जागतिक प्राणी दिवसही साजरा करण्यात आला, परंतु प्राणिप्रेमी, पर्यावरणप्रेमी आणि वन विभागाव्यतिरिक्त खूपच कमी नागरिकांना जागतिक वन्यजीव सप्ताह आणि जागतिक प्राणी दिनाबाबत माहिती आहे. यास वनविभागाची निष्क्रियता जबाबदार आहे. वन विभागातर्फे काही ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, परंतु या कार्यक्रमांबद्दलही लोकांना माहिती नाही. शासकीय संस्थांमार्फत आयोजित केलेल्या ज्या उपक्रमांबाबत लोकांना माहिती असते, अशा उपक्रमांनाही लोकांचा फार चांगला प्रतिसाद मिळत नसल्याची खंत अनेक पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली. काही ठिकाणी वन विभाग आणि पालिकेकडून वन्यजीव सप्ताहानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु लोकांचा त्यास फार चांगला प्रतिसाद नसल्याची खंत प्राणिप्रेमींनी व्यक्त केली आहे. वन्यजीव संपदेचा ºहास होत आहे. हा ºहास रोखण्यासाठी वन विभागाने ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचेही पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
वेस्टर्न रिजन क्राइम कंट्रोल ब्यूरोचे प्रादेशिक उपसंचालक एम. मरांको यांनी उपक्रमाबाबत सांगितले की, वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्यूरो, वेस्टर्न रिजनच्या कार्यक्षेत्रामध्ये वन्यजीव निरीक्षक डोकी आदिमल्लय्या आणि राकेश बर्मन यांच्यासोबत तानसा वाइल्ड लाइफ सँक्च्युरी आणि आसपासच्या परिसरात भेटी दिल्या. वन्यजीव अभयारण्य आणि वन विभागाच्या साहाय्याने पिवळी गाव, कोंडाचा पाडा आणि आवळे गावात लोकांसाठी जनजागृती आणि मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. येथे लोकसहभाग मोठ्या संख्येने होता. असेच उपक्रम मुंबईतही अनेक ठिकाणी राबवण्यात आले होते.

मुंबईकर उदासीन
वन्यप्राण्यांबात शहरे आणि शहरातील नागरिक अधिक उदासीन असल्याचे अनेक प्राणिप्रेमींचे मत आहे. मुंबईत आरे कॉलनी, कांदळवनांच्या परिसरात बांधकाम व्यावसायिक वनांचा नाश करून तेथे मोठ्या इमारती बांधत आहेत. यामुळे वन्यप्राण्यांचा निवारा हिरावला जात आहे. कांदळवने वाचवण्यासाठी, शहरातील वन्य भाग टिकवण्यासाठी लोकांकडून प्रयत्न होत नाहीत.

पेंग्विनसाठी खर्च का?
लाखो रुपये खर्च करून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात पेंग्विन आणले. त्यापेक्षा भारतात आढळणाºया प्राण्यांच्या संवर्धनाकडे लक्ष द्यावे, असे मत अनेक प्राणिप्रेमींनी मांडले. विविध संग्रहालयांमध्ये आपल्याकडे आढळणारे प्राणी असावेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना येथील प्राण्यांची माहिती मिळेल. त्यांची माहिती विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी हाक प्राणिप्रेमींनी दिली आहे.

आपण काय करायला हवे?
जंगल सीमेवरील स्थानिकांमध्ये जनजागृती करणे. वन्यप्राण्यांबाबत योग्य माहिती, मार्गदर्शन व सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करणे. वन्यजिवांचे ज्या ठिकाणी वास्तव्य आहे, अशी जंगले तोडण्यास नेहमी विरोध करावा.

वन्यजीव सप्ताह का साजरा करतात?
जंगलतोड, वाढते शहरीकरण आणि पशू-पक्ष्यांच्या राहण्याच्या ठिकाणी मानवी अतिक्रमणे होऊ लागल्यामुळे वन्यजिवांचा आणि जैवविविधतेचा ºहास होऊ लागला आहे. ही परिस्थिती बदलता यावी यासाठी जागतिक वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. भारतात १९५२ सालापासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. नामशेष होत चाललेल्या वन्य पशू-पक्ष्यांबाबत जनजागृती करणे हा त्यामागील हेतू आहे.

सोशल मीडियाचा वापर
वन विभागाकडून वन्यप्राणी संवर्धनासाठी योग्य प्रमाणात प्रयत्न होत नसल्याने प्राणिपे्रमींकडून अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या साहाय्याने जनजागृती केली जाते. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचा प्रभावी वापर केला जात आहे.

वन्यजिवांच्या सुरक्षिततेसाठी आणि जनजागृतीसाठी वन विभागाने विशिष्ट प्रोग्राम तयार करावा. लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी शाळा-महाविद्यालयापासूनच सुरुवात करण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना वन्यजिवांबाबत माहिती द्यावी. विद्यार्थ्यांसाठी विविध प्रदर्शने भरवावी.
- कर्नल डॉ. जे.सी. खन्ना, सचिव, पशू वैद्यकीय रुग्णालय, परळ
फक्त वन विभागाने वन्यजीव सप्ताह साजरा न करता, त्यामध्ये लोकसहभाग असणे आवश्यक आहे. सर्वांना एकत्र आणण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. वन्यजिवांबात अनेक बेकायदेशीर गोष्टी घडत असतात. त्याबाबत लोकांना कोणतीच माहिती नसते. लोकांना त्यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
- मीत आशर, प्राणिप्रेमी
वन्यजीव सप्ताह शासकीय पातळीवर काही प्रमाणात साजरा केला जातो. प्राणिप्रेमींव्यतिरिक्त इतर नागरिकांचा त्यामधील सहभाग अगदीच कमी असतो. लोकसहभागाशिवाय शासकीय पातळीवर वन्यजिवांसाठी मोठी कामे करता येणे अशक्य आहे. वन्यजिवांबाबतच्या अनेक बेकायदेशीर गोष्टींना नागरिक अनपेक्षितपणे प्रोत्साहन देत असतात. ते थांबवणे अत्यावश्यक आहे. वन विभागासह प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी व अनेक प्राणिपे्रमी संस्था, संघटना विविध उपक्रम राबवत असतात. आरे कॉलनी, संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये वन्यजिवांबाबत मार्गदर्शनासाठी विविध उपक्रम राबवले जातात.
- सुनिश कुंजू, सचिव, प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी

Web Title: Wildlife conspiracy: Displeasure about the activities of the people too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई