'एवढा शस्त्रसाठा कशासाठी, भाजपाला दंगली घडवायच्या होत्या का?'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 10:14 IST2019-01-16T13:27:09+5:302019-02-02T10:14:54+5:30
भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

'एवढा शस्त्रसाठा कशासाठी, भाजपाला दंगली घडवायच्या होत्या का?'
मुंबई - भाजपा पदाधिकाऱ्याकडे मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा सापडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर तोफ डागली आहे. येणाऱ्या काळात भाजपा कशा प्रकारे राज्य सांभाळणार हेच यातून पाहायला मिळतं आहे. या शस्त्रांचा वापर करून भाजपाला कोणत्या दंगली घडवायच्या होत्या ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चाकू, सुरे, तलवारी, बंदुका ताब्यात घेतल्या, कुलकर्णी याला त्याच्या दुकानात इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा का ठेवला होतो, याची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे. धनंजय कुलकर्णी भाजपाचा डोंबिवली शहराचा उपाध्यक्ष आहे. अद्याप याबद्दल भाजपाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
डोंबिवलीतील महावीर नगरमध्ये धनंजय कुलकर्णी याचं दुकान आहे. त्या दुकानात कल्याण गुन्हे शाखेला मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला. हा संपूर्ण शस्त्रसाठा पोलिसांनी ताब्यात घेतला. यामध्ये अनेक विदेशी पिस्तुलांसह, चाकू, सुरे, तलवारी, कुऱ्हाडींचा समावेश आहे. कुलकर्णी याला इतका मोठा शस्त्रसाठा कुठून आणला, तो त्यानं कशासाठी बाळगला होता, या शस्त्रांची विक्री केली जाणार होती का, या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आणि फडणवीस सरकारला लक्ष्य केलं आहे. भाजपाचे पदाधिकारीच जर अशा प्रकारे बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगणार असतील तर राज्यात गुंड आणि दहशतवाद्यांची गरजच उरणार नाही. गुंड आणि दहशतवाद्यांची कामे भाजपाचे पदाधिकारीच करू लागले आहेत, असे पाटील यांनी म्हटले. तसेच भाजपाला दंगली घडवायच्या आहेत का ? असा सवालही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा विचारला आहे.
येणाऱ्या काळात भाजपा कशाप्रकारे राज्य सांभाळणार आहे हेच यातून पाहायला मिळतं आहे.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) January 16, 2019
या शस्त्रांचा वापर करून भाजपाला कोणत्या दंगली घडवायच्या होत्या ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. pic.twitter.com/ZhOnDrxMTf
हे पहा भाजपाचे पार्टी विद डिफ्रन्स..!
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) January 16, 2019
डोंबिवलीतील भाजप शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा आज जप्त करण्यात आला. चॉपर, तलवारी, एयरगन, फायटर्स, चाकू, सुरे, कुऱ्हाडी अशी शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली आहेत. pic.twitter.com/bl9curzxbN