हातभट्टीच्या ‘झिंग’ला जबाबदार कोण ?

By Admin | Published: June 28, 2015 01:57 AM2015-06-28T01:57:35+5:302015-06-28T01:57:35+5:30

मुंबईतील मालाड येथील मालवणी भागात मिथेनॉलमिश्रित हातभट्टीची दारू प्यायल्याने १०३ जणांचा बळी गेल्यानंतर सर्वच शासकीय यंत्रणा जाग्या झाल्या आहेत.

Who is responsible for the 'zing' of the handball? | हातभट्टीच्या ‘झिंग’ला जबाबदार कोण ?

हातभट्टीच्या ‘झिंग’ला जबाबदार कोण ?

googlenewsNext

नारायण जाधव, ठाणे
मुंबईतील मालाड येथील मालवणी भागात मिथेनॉलमिश्रित हातभट्टीची दारू प्यायल्याने १०३ जणांचा बळी गेल्यानंतर सर्वच शासकीय यंत्रणा जाग्या झाल्या आहेत. पोलीस यंत्रणातर झपाटल्याप्रमाणे मुंबईसह नजीकच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील हातभट्टीच्या अड्ड्यांवर धाडी टाकून पत्रकार परिषदांद्वारे आपली पाठ थोपटवून घेत आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हातभट्टीतील दोषींना फाशीची शिक्षा द्यायला हवी, असे भाष्य केले आहे.
हातभट्टीची दारू पिऊन बळी जाण्याचा राज्यातील हा काही पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी रायगडमधील खोपोली, उरण, नवी मुंबईतील चिंचपाडा आणि मुंबईतील गावदेवी, आॅर्थर रोड, विक्रोळी येथेही तिने अनेकांचे बळी घेतले आहेत. यात रायगड आणि मुंबईतील घटनांमध्ये बळींची संख्या ८० ते १०० ते नवी मुंबईतील बळींची संख्या १० ते १२ च्या घरात होती. या प्रत्येक घटनेनंतर तत्कालीन शासकीय यंत्रणांनी अशाच राणाभीमदेवी थाटात घोषणा केल्या आहेत, ज्या आज मुख्यमंत्री फडणवीस करीत आहेत. प्रत्येक वेळी पोलीस, उत्पादन शुल्क खात्याच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सहा महिन्यांकरिता निलंबित करण्याचा नाटकी खेळ त्या त्या सरकारने खेळला आहे. आॅर्थर रोड आणि विक्रोळी येथील घटनांच्या वेळी तर तत्कालीन पोलीस उपायुक्त दिलीप भुजबळ, अशोक डोंगरे यांनाही निलंबित करण्यात आले होते. कालांतराने याच अधिकाऱ्यांना मानाच्या पदावर बसविण्यात आले.
मालवणी घटनेत अद्यापपर्यंत मोठ्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई विद्यमान सरकारने केलेली नाही. मात्र या घटनेनंतर मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड जिल्ह्यात पोलीस आणि उत्पादन शुल्क खात्याने जे काही धाडसत्र सुरू करून हातभट्टीचे अड्डे उद्वस्त करण्याचा सपाटा चालविला आहे, तो पाहता या भागात असे अड्डे आहेत, ते या यंत्रणांना ठाऊक होते. यापूर्वी त्यांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही,असा प्रश्न पडतो.
हे सर्व सांगण्यामागे हातभट्टीचा मुंबईला मोठा इतिहास आहे. एकेकाळचा मुंबईचा डॉन वरदाभाई राजन याने तिच्या जोरावरच आपल्या साम्राज्याचा पाया खोदला आहे. मुंबईतील अ‍ॅन्टाप हिल, धारावी, कोळीवाड्यांसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यापर्यंत तिची पाळेमुळे होती. ती आजही आहेत. कुठे ही खोपडी नावाने तर कुठे कोंबडी, ठर्रा या नावानेही ओळखली जाते. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील सध्याच्या अनेक दादांचा हातभट्टीची दारू विकण्याचाच धंदा होता. हेच दारू विके्रते राजकारणात येऊन बिल्डरापासून नगरसेवक, महापौर, आमदार आणि खासदार झालेले आहेत. यात कुणी हातभट्टीस लागणारा काळ गूळ विकतो तर कुणी नवसागर. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये जाऊन काळ्या गुळाच्या व्यापाऱ्यांची चौकशी केल्यास अनेकांचे बिंग फुटू शकते.
आजही पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील खाडीकिनारे, डोंगरकपाऱ्यांत हातभट्टीची दारू पाडली जात आहे. कुणी मोह फुलांची तर कुणी जांभूळ, द्राक्षांची. बॉलीवूडमधील एका ‘ड्रीमगर्ल’चा ‘गजब’ हीरो तर पालघरमधील काही आदिवासींकडून हीच दारू आज मागवून आपली तृष्णा भागवित असल्याच्या सुरस कथा आहेत.
आजही रायगडच्या उरणनजीकच्या धुतूमपासून ठाण्याच्या मुंब्रा, पडघा, खर्डी-कसारा अन् पालघरच्या वसई-विरार खाडीपट्ट्यापासून पालघरपर्यंत बिनदिक्कत हातभट्टी पाडून सर्रास मुंबईत विकली जात आहे. ती आणण्यासाठी मुंबईसह ठाण्यातील महानगरामध्ये अडल्यानडल्या महिलांचा वापर होत आहे. फुगा ओटीपोटी बांधला तर गरोदर महिला समजून गर्दीने तुडुंब असलेल्या लोकलमध्ये त्या हातभट्टीधारी महिलेस माणुसकीने इतर सहप्रवासी उठून जागा देतात, हा अनुभव अनेक प्रवाशांनी घेतला आहे.

शुद्ध गावठीचा प्रयोग फसला
१मागे आॅर्थर रोड आणि विक्रोळीत हातभट्टीचे १०० हून अधिक बळी गेल्यानंतर ते टाळण्यासाठी तिचे शौकीन असलेल्या कष्टकऱ्यांना शुद्ध गावठी दारू स्वस्तात द्यायला हवी, असा पर्याय तत्कालीन उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांनी सुचविला होता.
२हातभट्टीचे समूळ उच्चाटन करून शुद्ध गावठी दारू स्वस्तात दिल्यास गरिबांचे बळी जाणार नाहीत. हातभट्टी नवसारग, बॅटरीच्या सेलपासून मिथेनॉलसारखे विषारी पदार्थमिश्रित असल्याने जीवितहानी होते, असा त्यांचा युक्तिवाद होता.
३मात्र तो कोणाला रुचला नाही. उलट मंत्रीच असे बोलले म्हणून त्यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर राजाश्रयानेच हातभट्टीचे अड्डे सर्रास सुरू असून कधी खोपडी, कधी विक्रोळी, कधी चिंचपाड तर कधी मालवणीच्या घटनांतून ते समोर येऊन राज्यकर्ते, विरोधक आणि प्रसिद्धीमाध्यमांना एक विषय देऊन जात आहेत.

ठाण्याच्या मुंब्रा, खर्डी, कल्याणच्या ग्रामीण भागात कुष्ठरोग्यांकडून हातभट्टी पाडली जाते. हीच दारू मद्यशौकीन मोठ्या चवीने पहिल्या धारेची समजून आपला तळीरामी शौक पुरा करतात. मात्र साखळीत सर्वच यंत्रणांचे ‘चोर चारे मौसेरे भाई’चे नाते असल्याने माजंराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, हा प्रश्न आहे.

Web Title: Who is responsible for the 'zing' of the handball?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.