अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच काही क्षणांसाठी ते झाले जिवंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 05:46 AM2019-01-17T05:46:04+5:302019-01-17T05:46:15+5:30

विक्रोळीतील घटना : कुटुंबाचा आनंद ठरला क्षणभंगुर

While preparing for the funeral, they became alive for a few moments! | अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच काही क्षणांसाठी ते झाले जिवंत!

अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच काही क्षणांसाठी ते झाले जिवंत!

Next

- मनीषा म्हात्रे 


मुंबई : पदरात सात मुली. घरात मोठ्या मुलीच्या लग्नसराईची लगबग सुरू असतानाच, वडिलांची प्रकृती बिघडली. उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवागारातून मृतदेह घरी आणला. अंत्यविधीची तयारी सुरू झाली. हंबरडा सुरू असतानाच, ते जिवंत झाले; आणि सर्वांनाच आनंद झाला. बाबा परतले, म्हणत टाळ्यांचा गजर झाला. मात्र काही क्षणांतच त्यांची प्राणज्योत पुन्हा मालवल्याची धक्कादायक घटना बुधवारी विक्रोळीत घडली.


आंबेडकर नगरच्या ग्रुप क्रमांक २ येथे सुरक्षारक्षक विठ्ठल शिंदे हे पत्नी आणि ७ मुलींसोबत राहायचे. गेल्या महिनाभरापासून त्यांची प्रकृती ढासळली. पालिका रुग्णालयात डेंग्यूचे निदान झाले. त्यानुसार, उपचार सुरू झाले. पुढे खासगी रुग्णालयात नेले. तेथे डेंग्यू नसून टायफॉईड असल्याचे सांगत औषधोपचार सुरू केले. १५ दिवसांपूर्वी त्यांना डिस्चार्ज मिळाला. घरी असताना, मंगळवारी रात्री १२ वाजता त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यांना केईएम रुग्णालयात हलविले. तेथे शरीरात संसर्ग झाल्याचे सांगितले. उपचारादरम्यान रात्री १ च्या सुमारास त्यांना मृत घोषित केले. दोन तासांनी त्यांचा मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला. तेथील डॉक्टरांनी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करीत मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. सकाळी ११ वाजता त्यांचा मृतदेह घरी आणण्यात आला. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. घरात हंबरडा सुरू होता. मात्र अंत्यविधीची तयारी सुरू असताना, अचानक त्यांनी डोळे उघडले. सर्वांकडे पाहिले. ‘आई, बघ बाबा उठले..’ असा आवाज कानावर पडताच, सर्वांच्याच नजरा त्यांच्याकडे खिळल्या. त्यांनी श्वास घेतला. ते जिवंत झाल्याने सर्वांनाच आनंद झाल्याचे त्यांचा पुतण्या किशोर शिंदे याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
‘बाबा परतले. देवाने गाºहाणे ऐकले,’ म्हणत सर्वांनी जोरजोरात टाळ्या वाजवल्या. एकमेकांना मिठी मारली. याच आनंदोत्सवात त्यांची प्राणज्योत पुन्हा मालवली.
पण ते पुन्हा उभे राहतील. या आशेने कुटुंबीयांनी डॉक्टरांना बोलावून घेतले. प्रार्थना केल्या. मात्र तेथे आलेल्या डॉक्टरांनी आता ते उठणार नाहीत, असे सांगितले. अखेर काही तासांनी त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले.


काका जिवंत झाले... आणि पुन्हा गेले
अंत्यविधीपूर्वी काकांनी डोळे उघडले आणि श्वास घेतला. आम्ही सगळेच खूप आनंदात होतो. जल्लोष सुरू असताना, त्यांनी पुन्हा प्राण सोडले. डॉक्टरांनी आणखी प्रयत्न केले असते, तर कदाचित काका जगले असते.
- किशोर शिंदे, पुतण्या.

मुलीचे लग्न पाहण्याची इच्छा अपूर्णच..
सात मुलींची लग्न होऊन त्या आनंदी राहाव्यात अशी शिंदे यांची इच्छा होती. अनेक प्रयत्नांनंतर मोठ्या मुलीचे लग्न ठरले. १० फेब्रुवारी तारीख ठरली. मुलीचे लग्न थाटामाटात करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. मात्र लग्नापूर्वीच ही घटना घडल्यामुळे, मुलीचे लग्न पाहण्याची इच्छा अपूर्णच राहिल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.

Web Title: While preparing for the funeral, they became alive for a few moments!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.