पश्चिम उपनगरात वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 02:51 AM2018-07-11T02:51:24+5:302018-07-11T02:51:47+5:30

पश्चिम उपनगरात मंगळवारीही वाहतूककोंडी झाली होती. दहिसर, बोरीवली, मालाड, कांदिवली, गोरेगाव, ओशिवरा, जोगेश्वरी, अंधेरी सब-वे परिसरातील सखल भागांत पाणी साचल्याने वाहतूककोंडीच्या समस्येत भर पडली.

West suburbs transport News | पश्चिम उपनगरात वाहतूककोंडी

पश्चिम उपनगरात वाहतूककोंडी

Next

मुंबई : पश्चिम उपनगरात मंगळवारीही वाहतूककोंडी झाली होती. दहिसर, बोरीवली, मालाड, कांदिवली, गोरेगाव, ओशिवरा, जोगेश्वरी, अंधेरी सब-वे परिसरातील सखल भागांत पाणी साचल्याने वाहतूककोंडीच्या समस्येत भर पडली. त्यामुळे नोकरदार वर्गाला काही अंशी लेटमार्क लागला. अंधेरी कुर्ला रोडवरील मेट्रोच्या खाली सखल भागात, जुहू गल्ली सिग्नल परिसरात आणि मरोळ वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी साचले होते, तसेच पश्चिमेकडील इमारतीच्या आवारातील वाहनतळ पाण्याने भरले होते.
एस. व्ही. रोड आणि लिंक रोड मार्ग अरुंद असून, पावसादरम्यान येथील वाहतूक मंदावते. बोरीवली पश्चिमेकडील लिंक रोड येथेही सखल भागात पाणी जमा झाले होते. दहिसर सब-वे आणि मालाड सब-वे येथे पाणी साचल्याने दोन्ही सब-वेतून वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. पश्चिम उपनगरातील काही सब-वेमध्ये पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसविण्यात आले होते. मंगळवारच्या जोरदार पावसामुळे बोरीवली ते दहिसर चेकनाका येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने, पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूककोंडी झाली होती.

पूर्व उपनगराला झोडपले
मागील तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने चौथ्या दिवशीही पूर्व उपनगराला झोडपले. सखल भागात पाणी साचले होते, तर मध्य रेल्वेच्या मार्गावर पावसाचे पाणी साचल्याने लोकल २० ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. जागोजागी पाणी साचल्याने आणि रस्त्यावर खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली. रस्त्यावर वाहनांच्या लांब-लांब रांगा होत्या. किंग्ज सर्कल, चेंबूर, मुलुंड येथील सोनारपाडा, भांडुप, कांजूर येथील छत्रपती नगर, साईनगर, शिवकृपानगर, रामनगर, विक्रोळी, कन्नमवार, टागोरनगर, घाटकोपर, कुर्ला, मानखुर्द, गोवंडी या भागांत जोरदार पाऊस पडला. काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

Web Title: West suburbs transport News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.