लिची खायचीय? चला, बोर्डीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2023 01:33 PM2023-06-04T13:33:27+5:302023-06-04T13:34:19+5:30

पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील घोलवड आणि बोर्डी ही गावे लिचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. लिचीचे शास्त्रीय नाव लिची चायनेन्सीस असून त्याचे मूळस्थान चीनमध्ये आहे. सुमारे १७ व्या शतकात या फळाचे भारतात आगमन झाले.

want to eat lychee come on to bordi | लिची खायचीय? चला, बोर्डीला!

लिची खायचीय? चला, बोर्डीला!

googlenewsNext

- अनिरुद्ध पाटील

हवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार रोपांमध्ये निरनिराळ्या गुणधर्माच्या ८ ते १० जाती आहेत. ‘घोलवड लिची’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जातीमध्ये अर्ली व लेट असे दोन प्रकार आहेत. बियांपासून अभिवृद्धी झालेल्या झाडाला १५ वर्षांनी, तर गुटी कलमापासून अभिवृद्धी झालेले झाड सात ते आठ वर्षांनी फळे देते. पूर्ण वाढ झालेल्या एका झाडाचे सरासरी उत्पादन ११५ किलोपर्यंत येते. फलधारणा झाल्यानंतर ५० ते ५५ दिवसांत फळ काढणीस तयार होते. फळाचा नारंगी रंग जाऊन गुलाबी, लालसर रंग आल्यास फळे तयार झाल्याचा संकेत मिळतो. 

लालसर आकर्षक रंग, विशिष्ट प्रकारचा मोहक सुगंध आणि स्वादिष्ट चवीमुळे ही फळे लोकप्रिय आहेत. या फळात ७६ ते ८७ टक्के पाणी, साखरेचे प्रमाण ७ ते १२ टक्के, प्रथिने ०.७ टक्के, स्निग्धांश ०.३ ते ०.५ टक्के व खनिजाचे प्रमाण ०.७ टक्के असते. लिचीमध्ये उष्मांक ६५ कॅलरी असून जीवनसत्त्व क ६४ मि. ग्रॅम प्रति १०० ग्रॅममध्ये असते.

फळाच्या सालीचा पृष्ठभाग सपाट होतो तसेच दाबून पाहिल्यास फळ नरम लागते. साधारणतः २० ते २५ फळांचा एक घड, पानांसह काढावा लागतो. मे महिन्याचा मध्य ते जूनचा पहिला आठवडा हा या फळाच्या काढणीचा हंगाम आहे. बांबूच्या कारंड्यात किंवा खोक्यात करंज झाडाच्या हिरव्या पानांमध्ये या फळाचे पॅकिंग केले जाते. त्यामुळे फळाला उत्तम रंग प्राप्त होतो.

रात्रीच्या वेळेस वटवाघळांचा थवा फळे फस्त करीत असल्याने फळे तयार होण्याच्या काळात संपूर्ण झाडाला जाळ्याने शाकारण्यात येते. हल्ली घडाला प्लास्टिक पिशव्या बांधण्याचा प्रयोगही बोर्डीतील काही शेतकरी-बागायतदार करतात.


 

Web Title: want to eat lychee come on to bordi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न