वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 06:10 AM2024-05-16T06:10:24+5:302024-05-16T06:11:11+5:30

मिळालेल्या महाकाय कर्जापैकी २४ हजार ५९५ कोटी रुपये हे ६६ कंपन्यांच्या माध्यमातून वळवत ते लंपास केल्याचेही सीबीआयच्या तपासात दिसून आले आहे. 

wadhawan diverted 24 thousand crores from 66 companies cbi investigation reveals information | वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 

वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशातील १७ प्रमुख बँकांना ३४ हजार कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या डीएचएफएल कंपनीच्या वाधवान बंधूंनी ड्रगमाफिया इक्बाल मिर्चीसोबतही (आता हयात नाही) आर्थिक व्यवहार केल्याची माहिती पुढे आली असून, सीबीआयचे अधिकारी आता याचा तपास करत आहेत. तसेच राकेश वाधवानचे पुतणे असलेल्या धीरज आणि कपिल यांनी बँकांकडून मिळालेल्या महाकाय कर्जापैकी २४ हजार ५९५ कोटी रुपये हे ६६ कंपन्यांच्या माध्यमातून वळवत ते लंपास केल्याचेही सीबीआयच्या तपासात दिसून आले आहे. 

वाधवान बंधूंनी या कर्जाच्या रकमेतील पैशांचा मिर्चीसोबत काय व कसा व्यवहार केला, याचा तपास ‘सीबीआय’चे अधिकारी करत असल्याचे समजते.  तर ‘ईडी’चे अधिकारीही या प्रकरणाचा तपास करत आहेत. यापूर्वी अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील याचा हस्तक असलेल्या अजय नावंदर या व्यक्तीच्या मार्फतही वाधवान बंधूंनी व्यवहार केला होता. काही महागडी चित्रे, नामांकित शिल्पकारांनी घडवलेल्या मूर्ती आदींचे व्यवहार त्यांनी केले होते. या व्यवहारासाठीही  या कर्जापोटी मिळालेल्या पैशांचाच वापर केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. युनियन बँक प्रणीत १७ बँकांकडून डीएचएफएलने एकूण ४२ हजार ८७१ कोटी रुपयांच्या कर्जाची उचल केली होती. कर्ज प्राप्त पैसे वाधवान बंधूंनी हे पैसे डीएचएफएलशी संबंधित अन्य कंपन्यांना कर्जापोटी वितरित केले आणि यापैकी कर्ज देणाऱ्या १७ बँकांचे ३४ हजार ६१५ कोटी रुपये थकवले. 

हे पैसे प्रत्यक्षात थकवले नसून त्यांनी अन्य कंपन्यांमध्ये वितरित करत तेथून ते हडपल्याचे तपासात दिसून आले आहे. ६६ कंपन्यांतून २४ हजार कोटी रुपये वळवतानाच एकूण कर्जापैकी आणखी १४ हजार कोटी रुपये देखील वाधवान बंधूंनी तब्बल १ लाख ८१ हजार ६६४ लोकांना दिल्याचे कागदोपत्री दाखवले. मात्र, ज्या लोकांना हा पैसै दिल्याचा दावा त्यांनी केला आहे ती माणसेच अस्तित्वात नसल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. 

दरम्यान, याप्रकरणी २०२२ मध्ये सीबीआयने वाधवानविरोधात आरोपपत्र देखील दाखल केले होते. त्यावेळी त्याला सीबीआयने अटक केली होती. मात्र, त्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला होता. परंतु मंगळवारी सीबीआयने त्याला पुन्हा अटक केली आहे.

 

Web Title: wadhawan diverted 24 thousand crores from 66 companies cbi investigation reveals information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.