पक्षाचे आदेश डावलून विधान परिषदेत मतदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:32 AM2018-05-22T01:32:11+5:302018-05-22T01:32:11+5:30

भाजपाकडून शिवसेनेची कोंडी : लढत चुरशीची, गुरूवारी मतमोजणी

Voting in the Legislative Council by the order of the party! | पक्षाचे आदेश डावलून विधान परिषदेत मतदान!

पक्षाचे आदेश डावलून विधान परिषदेत मतदान!

Next

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी सोमवारी सरासरी ९० टक्क्यांच्या वर मतदान झाले. जवळपास सर्व पक्षांत पक्षादेश डावलून मतदान करण्याचे प्रकार घडल्याची माहिती पुढे आली त्यामुळे गुरुवारच्या निकालाबाबत उत्सुकता आहे. काही ठिकाणी ‘लक्ष्मीदर्शन’ घडविण्यात आल्याची उघड चर्चा दिवसभर होती.
मतदान गुप्त असल्याने क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता आहे. पालघरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवार दिल्याचा वचपा काढण्याच्या इराद्याने की काय पण नाशिक व कोकण विधान परिषद मतदारसंघात शिवसेनेची भाजपाने ठरवून कोंडी केली.
मराठवाड्यातील दोन जागांवर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे़ अमरावती मतदारसंघात विद्यमान राज्यमंत्री भाजपाचे प्रवीण पोटे व काँग्रेसचे अनिल माधोगडिया यांच्यात सरळ सामना आहे. कोकणात माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी अवधून तटकरे यांना पाठिंबा दिला. आपल्या मतदारांनी सद्सद्विवेकबुद्धीने मतदान करावे, अशी मोकळीक भाजपाने सदस्यांना दिली होती.

नाशिकमध्ये भाजपा राष्ट्रवादी काँगेसच्या पाठीशी
नाशिकमध्ये मतदानाच्या अवघ्या काही तास अगोदर भाजपाने राष्टÑवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना पाठिंबा देऊन शिवसेनेला जोरदार धक्का दिला. सेनेचे नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे व जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी यांच्यात लढत आहे. मात्र, अधिकृतपणे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचे कोणतेही आदेश पक्षाकडून दिले नव्हते. भाजपाच्या मतदारांनी सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावे, असे आवाहन आम्ही केले होते, असा दावा नाशिकचे पालकमंत्री आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना केला.

मतदार संघ टक्केवारी
नाशिक १००
कोकण ९९.७९
परभणी-हिंगोली ९९.६०
लातूर-उस्मानाबाद-बीड ९९
अमरावती १००
चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली ९९.७२

Web Title: Voting in the Legislative Council by the order of the party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.