वेसावे कोळीवाड्यात हावली आणि रंगपंचमी उत्साहात साजरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 04:36 PM2018-03-02T16:36:48+5:302018-03-02T16:36:48+5:30

Vesave celebrated in Koliwada with Havli and Rangpanchami | वेसावे कोळीवाड्यात हावली आणि रंगपंचमी उत्साहात साजरी

वेसावे कोळीवाड्यात हावली आणि रंगपंचमी उत्साहात साजरी

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : मुंबईतील सर्वात मोठ्या आणि केरळ नंतर मासेमारीत देशात दुसरा क्रमांक असणाऱ्या वेसावे कोळीवाड्यात हावली आणि रंगपंचमी उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. काल रात्री डोक्यावर मडकी घेऊन पारंपारिक वेषात वेसावे गावातून कोळी महिलांची निघालेली नेत्रदीपक मिरवणूक तसेच विविध रूपे परिधान करून येथील कोळी बांधवानी सादर केलेली सोंगे बघण्यासाठी वेसावकरांनी एकच गर्दी केली होती.

वेसावे कोळीवाड्यात हावलीची परंपरा काही औरच आहे.हावली निमित्त ' बाजार गल्ली कोळी जमात ' आणि ' मांडवी गल्ली कोळी जमाती' च्या महिलांची मडकी मिरवणुक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे. देशातील पहिली डिजीटल सॅनेटरी पॅड बैंक सुरू करणाऱ्या आणि ' पॅडवुमन'  म्हणून ओळख असणाऱ्या वर्सोवा विधानसभेच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर या गेली 3 वर्षे येथील पारंपरिक होळीचा आनंद लुटतात. आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी काल रात्री या होळी उत्सवात सामील होऊन होलीकेची पूजा केली व 
कोळी महिलांबरोबर पारंपारिक कोळी गाण्यांवर ठेका धरला. यावेळी के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष योगिराज दाभाडकर,नगरसेविका रंजना पाटील,माजी नगरसेविका ज्योत्स्ना दिघे,बाजार गल्ली कोळी जमातीचे अध्यक्ष पराग भावे उपस्थित होते.

काल मध्यरात्री शिमग्याला गावच्या पाटलाने अग्नी दिल्या नंतर कोळी नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला. वेसावकरांचे कौतुक करताना आमदार डॉ. भारती लव्हेकर म्हणाल्या, " मुंबई सारख्या वेगाने बदलणाऱ्या शहरात देखील कोळी बांधवांनी आपली संस्कृती टिकवली आहे आणि याचे मोठे श्रेय वेसावकरांना देखील जाते कारण सण साजरा करताना वेसाव्यातील कोळ्यांच्या आनंदाला आलेले उधाण खरच पाहण्यासारखे होते" 

शिमगा हा कोळी बांधवांचा महत्वाचा सण असल्यामुळे या दिवसाचे महत्व म्हणजे कोळी राजा आपल्या होड्यांची रंगरंगोटी करून त्यावर छान रंगीत बावटे (झेंडे), पताके व मखमली झालर लावून सजावट केली जाते. त्याचप्रमाणे धुळवडीला आज संध्याकाळी होडीची पूजा देखिल केली जाते. विशेष म्हणजे तळलेल्या घोळ माश्याच्या तुकडीचा नैवेद्य होडीला दाखवण्यात येतो. सोबत गोड शेव, उकडलेले रताळे व इतर मिठाई असते. पूजा झाल्यानंतर छोटी मुलं फटाके फोडण्यात जणू रंगूनच गेली होती अशी माहिती राजहंस टपके आणि प्रवीण भावे, पंकज भावे यांनी दिली.

कोळी लोकांसाठी त्यांचा शिमगा सण इतका महत्वाचा आहे कि अनेक कोळी गीतं खास होळीचे महत्व सांगणारी आहेत. शिवाय पूर्वीच्या काळी तर होळी पोर्णिमेला कोळी बांधव एक विशिष्ट प्रकारचे नृत्य करायचे ज्याला बोली भाषेत "डांगर्या" म्हणायचे.या डांगर्या म्हणजे गुजरात-मध्यप्रदेशच्या गरबा-दांडीयाला देखील लाजवेल असे असायचे. डांगर्या मारताना कोळी बांधव "जोय जाय, जोय जाय" असे होळीचे गीत देखील गायचे. आजही मुंबईतील मनोरीचे कोळी बांधव होळीला डांगर्या नृत्य करतात. महत्वाची बाब म्हणजे कोळ्यांच्या जीवनावर होळीचा इतका प्रभाव आहे कि आमच्या आजी आजोबांची नावे देखील हावलु, शिमगा वैगरे असायची. अशी माहिती येथील एबीए असलेल्या मोहित रामले यांनी सांगितले. येथील पुरातन संस्कृती जतन करणऱ्या वेसावकरांच्या या महतीला पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने शासनाने ठोस पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत रामले यांनी व्यक्त केले.

Web Title: Vesave celebrated in Koliwada with Havli and Rangpanchami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.