Varun Dhawan gets 'Dos' from Mumbai Police | हे धाडस सिनेमापर्यंतच ठेव, वरूण धवनला मुंबई पोलिसांचा 'डोस'  

मुंबई - बॉलिवूड अभिनेता वरूण धवन याला मुंबई पोलिसांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. मुंबईच्या रस्त्यावर गाडीतून प्रवास करत असताना त्याने रिक्षातून प्रवास करणा-या एका फॅनसोबत सेल्फी काढला होता. सेल्फी काढतानाचा हा फोटो एका इंग्रजी वृत्तपत्राने छापला. तो फोटो ट्विट करून मुंबई पोलिसांनी वरूण धवनला झापलं आहे. या शिवाय त्याला इ-चलान देखील आकारण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या ट्विटला उत्तर देत अभिनेता वरुण धवनने पोलिसांची माफी मागत यापुढे सुरक्षेच्या दृष्टीनं आधी विचार करेन असं म्हटलं आहे. 

इंग्रजी वृत्तपत्र मिड-डेने वरूण धवनचा एक सेल्फी छापला होता. यामध्ये तो भररस्त्यात आपल्या गाडीच्या खिडकीतून डोकावून बाजूच्या रिक्षातून प्रवास करणा-या एका आपल्या फॅनसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी हा फोटो ट्विट करून वरूणला खडेबोल सुनावले आहेत. 

''हे धाडस सिनेमांपर्यंत ठिक आहे... पण मुंबईच्या रस्त्यांवर नाही. तू स्वतःचा , तुझ्या फॅनचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घातला... तुझ्यासारख्या तरूणाकडून आणि एका जबाबदार मुंबईकराकडून चांगली अपेक्षा असते. थोड्यावेळात  इ-चालान तुझ्या घरी पोहोचेलच...पण... पुढच्या वेळी आम्ही जास्त कठोर होऊ...'' अशा शब्दांमध्ये मुंबई पोलिसांनी वरूण धवनला डोस दिला आहे.  Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.