उस्ताद झाकीर हुसेन यांना उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार

By संजय घावरे | Published: January 17, 2024 09:20 PM2024-01-17T21:20:48+5:302024-01-17T21:21:20+5:30

'हाजरी'मध्ये सोनू निगमने वाहिली दिग्गजांना सांगीतिक श्रद्धांजली

Ustad Ghulam Mustafa Khan Award to Ustad Zakir Hussain | उस्ताद झाकीर हुसेन यांना उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार

उस्ताद झाकीर हुसेन यांना उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार

मुंबई- उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा जणू मला त्यांच्याकडून मिळालेला आशिर्वाद असून यामुळे भविष्यात काम करण्यासाठी जबाबदारी वाढल्याची भावना उत्साद झाकीर हुसेन यांनी व्यक्त केली. उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.

पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचा वारसा त्यांच्या कुटुंबियांसह विद्यार्थ्यांनी उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्काराच्या माध्यमातून जपला आहे. गुलाम खान यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीचे औचित्य साधत त्यांच्या पत्नी अमिना गुलाम मुस्तफा खान यांच्या हस्ते तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना उस्ताद गुलाम मुस्तफा खान प्रदान करण्यात आला. सायन येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडलेल्या या सोहळ्याला खान यांचे पुत्र कादिर मुस्तफा खान, मुर्तुझा मुस्तफा खान, रब्बानी मुस्तफा खान, हसन मुस्तफा खान आणि कन्या उपस्थित होत्या.

गुलाम खान यांचे पुत्र रब्बानी खान म्हणाले की, या वर्षी झाकीर हुसेन यांना हा पुरस्कार प्रदान करताना खूप अभिमान वाटतो. यंदा सोनू निगमच्या सादरीकरणाबरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय कलाकारांच्या संगीताचा संगम घडवण्यात आला. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा वारसा सर्वदूर पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. त्या दिशेने उचललेले हे एक पाऊल असून, पुढल्या वर्षी यात आणखी शहरांचा समावेश करण्याचे ध्येय असल्याचेही खान म्हणाले.
या निमित्त दोन दिवस सांगितीक मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.

पुरस्कार सोहळ्यानंतर गुलाम खान यांचे शागिर्द पद्मश्री सोनू निगम यांनी 'हाजरी' या सांगितीक मैफिलीत दिवंगत उस्तादांना श्रद्धांजली वाहिली.या कार्यक्रमाला गायक हरिहरन, शान, सुरेश वाडकर, तलत अझीझ, अरमान मलिक, खासदार आशिष शेलार, समाजसेवक डॉक्टर अनिल काशी मुरारका यांच्यासह आघाडीचे गायक, संगीतकार, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सेलिब्रिटीज यांची मांदियाळी अवतरली होती. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या दिवशी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकलेचे सादरीकरण करण्यात आले. यात राकेश चौरसिया यांचे बासरीवादन, पूरबायन चटर्जी यांचे सितार वादन आणि पं. व्यंकटेश कुमार यांचे गायनाचा आनंद श्रोत्यांनी घेतला.

Web Title: Ustad Ghulam Mustafa Khan Award to Ustad Zakir Hussain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.