Uddhav Thackeray slams BJP government over agriculture situation of maharashtra | ‘जवान’ आणि ‘किसान’ यांना वार्‍यावर सोडून राज्यकर्ते निवडणुकांमध्ये गुंतलेत - उद्धव ठाकरे
‘जवान’ आणि ‘किसान’ यांना वार्‍यावर सोडून राज्यकर्ते निवडणुकांमध्ये गुंतलेत - उद्धव ठाकरे

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी प्रश्नावरुन भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सध्या केंद्रीय पथक राजाच्या दुष्काळी दौर्‍यावर आले आहे. केंद्रीय पथकासमोर शेतकरी आपल्या व्यथा मांडत आहेत. यावरुन उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ''फडणवीस सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी प्रचंड घोषणाबाजी केली, पण शेतकरी मरणपंथाला लागला आहे. केंद्रीय दुष्काळ पथकाला महाराष्ट्रात ‘बॉडीगार्ड’ घेऊन फिरावे लागले. किसन वारे आणि संजय साठे हा काट्यावरचा प्रवास आहे. ज्या वाटेवरून सरकार आले त्याच वाटेवर आता सुरुंग पेरले आहेत'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा देऊ केला आहे.
सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे :
-  संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ चार-पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक प्रचारात गुंतले आहे. पण महाराष्ट्र राज्य मात्र दुष्काळाच्या वणव्यात होरपळत आहे. मुख्यमंत्री स्वतः धुळे महापालिका प्रचारात व्यग्र आहेत. राज्याच्या इतर मंत्र्यांनाही धुळे महापालिकेचे प्रभाग नेमून दिले आहेत. देशाचे संरक्षण राज्यमंत्री असलेले सुभाष भामरेही सध्या धुळ्यातच मुक्कामी आहेत. 
- म्हणजे ‘जवान’ आणि ‘किसान’ यांना वार्‍यावर सोडून पालिकांपासून विधानसभा निवडणुकांपर्यंत आमचे राज्यकर्ते गुंतले आहेत. याच दरम्यान केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या दुष्काळी दौर्‍यावर आले आहे. केंद्रीय पथकासमोर शेतकरी आपल्या व्यथा मांडत आहेत व त्या अत्यंत वेदनादायी आहेत. 
- ‘‘सांगा साहेब, आम्ही कसं जगायचं? प्यायला पाणी नाही की जनावरांना चारा नाही. सावकाराचं कर्ज काढलंय ते फेडायचं कसं? बँकेचंही कर्ज कढलंय. त्यामुळे पुन्हा बँकेच्या दारात जाऊन मागता येणार नाही आणि आमच्यावर विष प्यायची वेळ आली आहे.’’ अशी व्यथा करमाळ्याच्या जातेगावचा शेतकरी किसन वारे याने मांडली. किसनची व्यथा ही राज्यातील प्रत्येक दुष्काळग्रस्त शेतकर्‍याची व्यथा आहे. ‘‘अधिकारी येतात, नुसता सर्व्हे करून जातात. आता मदत मिळाली नाही तर आम्ही सगळे आत्महत्या करू, साहेब…’’ केंद्रीय दुष्काळ पथकासमोर राज्याचा शेतकरी आक्रोश करीत आहे. हे राज्य कारभारास लांच्छन आहे. 
-  संजय साठे या निफाडच्या शेतकर्‍याने काय केले? निफाड बाजार समितीत कांद्याला प्रति किलो  फक्त एक रुपया चाळीस पैसे भाव मिळाल्याने त्रासलेल्या संजय साठे यांनी साडेसात क्विंटल कांद्याचे एक हजार चौसष्ट रुपये पंतप्रधान निधीला पाठवले. संपूर्ण राज्याचे हे चित्र आहे.  आता या शेतकर्‍याचा कांदाच कसा फालतू दर्जाचा होता हे सिद्ध करण्यासाठी सरकारी यंत्रणा धडपड करीत आहेत. 
- शेतकरी हवालदिल आहे व त्यांच्या संतापाचा उद्रेक होऊ नये म्हणून केंद्रीय पथकाला म्हणे कडेकोट बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, शेतकर्‍यांत संताप आहे याची खात्री सरकारला आहे. शेतकरी संतापला आहे. तो मनातून अशांत आहे, पण त्याची जगण्याची इच्छा मेली आहे तशी लढण्याची जिद्दसुद्धा संपली आहे. 
-  सरकार चालवायला जेथे शिर्डी संस्थानकडून कर्ज घ्यावे लागले तेथे शेतकर्‍यांचे प्रश्न कसे सोडवणार? केंद्रीय दुष्काळ पथकाला महाराष्ट्रात ‘बॉडीगार्ड’ घेऊन फिरावे लागले. किसन वारे आणि संजय साठे हा काट्यावरचा प्रवास आहे. ज्या वाटेवरून सरकार आले त्याच वाटेवर आता सुरुंग पेरले आहेत.


Web Title: Uddhav Thackeray slams BJP government over agriculture situation of maharashtra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.