ईव्हीएमची झुंडशाही आणि ‘चोळकरां’ची लोकशाही प्रकार खतरनाक, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 08:08 AM2018-05-30T08:08:25+5:302018-05-30T08:53:05+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएमच्या घोळावरुन भाजपा व निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray criticizes BJP and election commission over evm machines failed in loksabha by election | ईव्हीएमची झुंडशाही आणि ‘चोळकरां’ची लोकशाही प्रकार खतरनाक, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र 

ईव्हीएमची झुंडशाही आणि ‘चोळकरां’ची लोकशाही प्रकार खतरनाक, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र 

googlenewsNext

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएमच्या घोळावरुन भाजपा व निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. ''साम, दाम, दंड, भेद नीतीपेक्षा ई.व्ही.एम.ची झुंडशाही आणि ‘चोळकरां’ची लोकशाही हा प्रकार खतरनाक आहे'', अशी बोचरी टीका त्यांनी सामना संपादकीयमधून केली आहे. 

''सध्या आमचा निवडणूक आयोग हा शेव-गाठी व ढोकळा खाऊन सुस्तावल्यासारखा पडला आहे. त्याला घोटाळे दिसत नाहीत, तक्रारी ऐकू येत नाहीत. भंगारपद्धतीच्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वापर करून लोकशाही व निवडणुका कायमच भंगारात टाकण्याची ही सुरुवात आहे. साम, दाम, दंड, भेद नीतीपेक्षा ई.व्ही.एम.ची झुंडशाही आणि ‘चोळकरां’ची लोकशाही हा प्रकार खतरनाक आहे. रशियाचे पुतिन व चीनचे शी जिनपिंग यांनी तहहयात सत्तेवर राहण्याची सोय लोकशाही पद्धतीने करून घेतली आहे. हिंदुस्थानात तशी तयारी सुरू झाली असली तरी ते शक्य होणार नाही!'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?
हिंदुस्थान म्हणजे जगातील सर्वात मोठी लोकशाही असा डांगोरा पिटण्यात आता काही अर्थ उरलेला नाही. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राने आमच्या लोकशाहीचा बाजार उठवला आहे. सध्याच्या हुकूमशाही, झुंडशाही वृत्तीच्या सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीस स्वतःची रखेल बनवून ठेवले आहे. ‘लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही’ ही नागरिकशास्त्रातील साधी-सोपी व्याख्या आहे. मात्र आता भाजपवाल्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांना भ्रष्ट करून स्वतःसाठी राबवलेली यंत्रणा म्हणजेच लोकशाही, असे काहीसे चित्र नागडेपणाने रोजच समोर येऊ लागले आहे. त्यामुळे निवडणुका व निवडणूक आयोग म्हणजे पिला हाऊसच्या गंजलेल्या कोठ्यांतील तवायफ बनल्या आहेत. पालघर व गोंदियाच्या व्होटिंग मशीन घोटाळ्याने हे सिद्ध झाले. दोन्ही मतदारसंघांतील चारशेच्या वर मतदान यंत्रे तासन्तास बंद पडतात. त्यामुळे दोन-चार तास रांगेत उभे राहून कंटाळलेले मतदार मतदान न करता निघून जातात, हा काय प्रकार म्हणायचा? इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या मनमानीवर किंवा मेहेरबानीवर आमची निवडणूक यंत्रणा सध्या श्वास घेत आहे. लोकशाहीत एका एका मतासही मोल आहे. एका मताने सरकारे पडतात व तरतात. एका मताने जय-विजयाचे पारडे फिरत असते, पण येथे हजारो मतदार मतदान केंद्रांवर येऊन परत जातात व निवडणूक अधिकारी हात चोळत बसले की आणखी काय ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. सध्याचा निवडणूक आयोग व त्याची यंत्रणा म्हणजे सत्ताधाऱ्यांचे ‘चोळकर’ बनली आहे. त्यामुळे ते निवडणुकीतील दारू वाटप, पैसे वाटप, सत्ताधाऱ्यांची दडपशाही, बेताल धमकीवजा भाषणे याबाबतच्या तक्रारी घ्यायला तयार नाही. पालघर-गोंदियाप्रमाणे उत्तर प्रदेशातील कैराना येथे लोकसभेची पोटनिवडणूक झाली. तेथेही तीनशेच्या वर मतदान यंत्रे बंद पडल्याची तक्रार समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केली. 

उन्हाचा पारा वाढल्याने मतदान यंत्रे बिघडली असे उत्तर निवडणूक अधिकारी यावर देतात. हिंदुस्थानातील हवामान व तापमान हे असे बदलतच असते. पण तापमान वाढल्याने पंतप्रधानांचे विमान बंद पडल्याचे उदाहरण नाही. तापमानामुळे भाजप यंत्रणेच्या सुसाट, मोकाट सुटलेल्या सोशल मीडियाचे कॉम्प्युटर्स बंद पडत नाहीत, फक्त इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच कसे काय बंद पडते बुवा? पुन्हा एवढी वर्षे ई.व्ही.एम. मशीन्स ‘भेल’ कंपनी किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाकडूनच मागविल्या जात असताना यंदाच्याच निवडणुकांसाठी ही यंत्रे सुरत येथील खासगी कंपनीकडून का मागवली गेली हा प्रश्न खुद्द राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनीच उपस्थित केला आहे. इतरांनीही याच मुद्द्यांवर बोट ठेवून निवडणूक आयोगाला सवाल केला आहे. हा प्रकार संशयाला बळकटी देणारा आहे. हे नक्की काय गौडबंगाल आहे, ते सरकार आणि निवडणूक आयोगालाच माहीत. ज्या निवडणूक पद्धतीवरचा विश्वास उडाला आहे ती पद्धत लोकशाहीला मारक आहे. लोक मते देतात, पण आपले मत नक्की कुणाला जाते याबाबत मतदारांच्या मनात शंका आहेत. म्हणजेच लोकशाहीचे छप्पर उडाले आहे. आता म्हणे इलेक्ट्रॉनिक मशीनचे बटण दाबताच त्यातून एक कागदी स्लीप बाहेर पडते व ती स्लीप तुमचे मतदान नक्की कुणाला झाले ते दाखवते. शंका वाटल्यास त्या कागदी कपटय़ांचीही मोजणी होईल, पण कर्नाटकात मशीनमधून बाहेर पडलेल्या कागदी कपट्यांचाही घोटाळा झाला. अनेक मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष झालेले मतदान व बाहेर पडलेल्या कागदी कपटय़ांच्या आकड्यांचा मेळ जमत नाही. हा असा घोळ सतत सुरू आहे. त्यात पालघरमधील चिंचरे गावातील काही ई.व्ही.एम. यंत्रे खासगी वाहनातून नेली जात असल्याचे आता उघडकीस आले आहे. काही नागरिकांच्या दक्षतेमुळे हा प्रकार समोर आला. आता पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आणि चौकशी करण्याचे आश्वासन वगैरे दिले आहे. 

मात्र अनेकदा ही निव्वळ धूळफेक असते आणि त्यामुळे ईव्हीएम आणि निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर लागलेले आणि गडद होणारे प्रश्नचिन्ह पुसट होणार नाही. भारतीय जनता पक्ष व त्यांच्या कारभाराविषयी जनतेत रोष आहे आणि तरीही ते विजयी होत आहेत. यामागे ईव्हीएम मशीनचे ‘सेटिंग’ आहे असे जे आरोप पुराव्यानिशी होत आहेत त्याला चिंचरेसारख्या घटना आणि पालघरमधील ईव्हीएम यंत्रांच्या ‘बिघाडां’मुळे बळच मिळत आहे. कोणे एकेकाळी भाजपवाल्यांनीच मतदानाच्या या मशीनशाहीविरुद्ध मोहीम उघडली होती व आता सारा देश या मशीनविरुद्ध बोंब मारीत असताना भाजपवाले मशीन यंत्रणेचा पुरस्कार करीत आहेत. गोवंश हत्येस बंदी घालावी या मागणीप्रमाणे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर बंदी घालावी व ‘बॅलेट पेपर’चीच मतदान पद्धती पुन्हा आणावी अशी सगळ्यांचीच मागणी आहे. जगातून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हद्दपार झाली मग आमच्याच देशातील राज्यकर्त्यांना त्याविषयी इतके प्रेम का? हा संशोधनाचा विषय आहे. गोंदियात तर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘वारस’ प्रकाश आंबेडकर यांनीच इलेक्ट्रॉनिक मशीन घोटाळय़ाविरुद्ध आवाज उठवला. आंबेडकरांचे तरी खरे माना. सध्या आमचा निवडणूक आयोग हा शेव-गाठी व ढोकळा खाऊन सुस्तावल्यासारखा पडला आहे. त्याला घोटाळे दिसत नाहीत, तक्रारी ऐकू येत नाहीत. भंगारपद्धतीच्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वापर करून लोकशाही व निवडणुका कायमच भंगारात टाकण्याची ही सुरुवात आहे. साम, दाम, दंड, भेद नीतीपेक्षा ई.व्ही.एम.ची झुंडशाही आणि ‘चोळकरां’ची लोकशाही हा प्रकार खतरनाक आहे. रशियाचे पुतिन व चीनचे शी जिनपिंग यांनी तहहयात सत्तेवर राहण्याची सोय लोकशाही पद्धतीने करून घेतली आहे. हिंदुस्थानात तशी तयारी सुरू झाली असली तरी ते शक्य होणार नाही!

Web Title: Uddhav Thackeray criticizes BJP and election commission over evm machines failed in loksabha by election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.