Satara Bus Accident : राज्यातील प्रत्येक अनैसर्गिक मृत्यूस राजाच कारणीभूत, उद्धव ठाकरेंची भाजपा सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 07:39 AM2018-07-30T07:39:26+5:302018-07-30T09:27:13+5:30

पोलादपूर बस दुर्घटनेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे

Uddhav Thackeray criticized BJP government over poladpur bus accident | Satara Bus Accident : राज्यातील प्रत्येक अनैसर्गिक मृत्यूस राजाच कारणीभूत, उद्धव ठाकरेंची भाजपा सरकारवर टीका

Satara Bus Accident : राज्यातील प्रत्येक अनैसर्गिक मृत्यूस राजाच कारणीभूत, उद्धव ठाकरेंची भाजपा सरकारवर टीका

Next

मुंबई - पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावर आंबेनळी घाटात शनिवारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 30 जणांचा मृत्यू झाला. वर्षासहलीसाठी गेलेल्या दापोलीच्या कोकण कृषि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची बस सुमारे 800फूट खोल दरीत कोसळली होती. या दुर्घटनेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.  ''हिंसाचार, जाळपोळ, आत्महत्या व अपघातांमुळे सध्या राज्याचे मानसिक खच्चीकरण सुरू आहे. अपघात हा अपघात असतो आणि मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांनी दापोलीच्या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मात्र असे प्रसंग सरकारवर रोज येणे चांगले नाही. सध्या चाणक्यसूत्रांचा जोर राजकारणात वाढला आहे, पण युद्ध न करता मरण पावलेले सैनिक आणि राज्यातील प्रत्येक अनैसर्गिक मृत्यूस राजाच कारणीभूत असतो. हे पाप राजाच्या डोक्यावरच असते असेही कुठेतरी चाणक्याने लिहून ठेवले आहे काय?'' अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.

- काय आहे आजचे सामना संपादकीय
हिंदुस्थानात सर्वाधिक बळी रस्त्यांवरच जात आहेत. रोज कुठे ना कुठेतरी अपघात होत असतात व अपघातांतील मृतांचे आकडे पाहून आपण फक्त हळहळत असतो. दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांना सहलीसाठी घेऊन जाणारी बस दरीत कोसळली व ३० जणांचा त्यात मृत्यू झाला ही बातमी मन विषण्ण करणारी आहे. या अपघातामुळे फक्त कोकणवासीयच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. दापोली कृषी विद्यापीठ हे देशातील एक सक्षम आणि संशोधन कार्यात क्रांती करणारे विद्यापीठ आहे. राज्यभरातले विद्यार्थी येथे कृषी पदवीधारक होण्यासाठी येतात व राज्यभरातील अनेक शिक्षक, प्राध्यापक, संशोधक येथे ज्ञानदानाचे काम करतात. ज्या ३० लोकांवर काळाने झडप घातली त्यात हे असेच अनेक जण होते. राज्यात हिरवळ फुलवणारे, धान्य, फुले, फळे, भाज्यांत नवे शोध लावणारे हे कोकण कृषी विद्यापीठ आता जणू उजाड झाले आहे. एकाच संस्थेतील हे सामुदायिक मृत्युकांड महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला पाच पावले मागे ढकलणारे आहे. महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण तसे बरे नाही. हत्या, आत्महत्या व रस्त्यांवरील हिंसाचाराचा भडका उडाला आहे. जनतेचे मन स्थिर नाही व महाराष्ट्र एका रहस्यमय सावटाखाली जगतो आहे. 
राजकारणात कोणताही विषय चालतो, पण पोलादपूर – महाबळेश्वरदरम्यान आंबेनळी घाटात बस कोसळून एकाच वेळी ३० जण मृत्यू पावतात हे तितकेच गंभीर आहे. आंबेनळी घाटातील वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस दरीत कोसळली हे सांगितले जाते, पण महाराष्ट्राचा प्रवास हा दर्‍याखोर्‍या आणि कडेकपारीतूनच आहे. समृद्धी महामार्गाचा हट्ट धरणार्‍यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. बुलेट ट्रेनसाठी आग्यावेताळी तांडव करणार्‍यांनी महाराष्ट्राचा नागमोडी रस्ता समजून घेतला पाहिजे. बुलेट ट्रेनचे जपानी रूळ टाकले म्हणजे विकास नाही, तर दापोलीसारखे अपघात व सामुदायिक मृत्यू रोखण्यासाठी काम करणे हाच विकास आहे. महाराष्ट्राच्या रस्त्यांवर, दर्‍याखोर्‍यांत आणखी किती बळी जाणार आहेत? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सरकारचा राज्य करण्याचा धंदा चांगला आहे. समुद्रावर सहली जातात व तरुण पोरे बुडतात म्हणून समुद्रावर सहली घेऊन जायचे नाही, धबधब्यावर अपघात होतात म्हणून लोकांनी धबधब्यावर जायचे नाही. लोकांनी हे खायचे नाही आणि ते खायचे नाही. मग आता अपघात होतात म्हणून लोकांनी बसेस व गाड्यांत बसायचे नाही व प्रवास करायचा नाही असे फर्मान सुटणार आहे काय? 
लोकल ट्रेन्स भंगार झाल्या, सिग्नल यंत्रणा कोलमडली, रेल्वेचे रूळ नादुरुस्त आहेत. ते दुरुस्त करण्याचे सोडून सरकार बुलेट ट्रेन आणत आहे. मुख्यमंत्र्यांचे जुने हेलिकॉप्टर भरकटले व दैव बलवत्तर म्हणून ते बचावले. आम्ही मुख्यमंत्र्यांना उदंड, निरोगी दीर्घायुष्य चिंतीत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या सोयीसाठी राज्य सरकार नवे हेलिकॉप्टर खरेदी करीत आहे, ते खरेदी करायला हरकत नाही. मात्र दापोलीसारखे अपघात कधी टाळणार? निरपराध्यांचे जीव कसे वाचवणार? निवडणुका जिंकण्यासाठी ज्या जोरजबरदस्तीचा वापर होतो तेवढा जोर राज्याच्या कामकाजावर लावला तर हे असे शोकमय बळींचे राज्य निर्माण होणार नाही. हिंसाचार, जाळपोळ, आत्महत्या व अपघातांमुळे सध्या राज्याचे मानसिक खच्चीकरण सुरू आहे. अपघात हा अपघात असतो आणि मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांनी दापोलीच्या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मात्र असे प्रसंग सरकारवर रोज येणे चांगले नाही. सध्या चाणक्यसूत्रांचा जोर राजकारणात वाढला आहे, पण युद्ध न करता मरण पावलेले सैनिक आणि राज्यातील प्रत्येक अनैसर्गिक मृत्यूस राजाच कारणीभूत असतो. हे पाप राजाच्या डोक्यावरच असते असेही कुठेतरी चाणक्याने लिहून ठेवले आहे काय?

Web Title: Uddhav Thackeray criticized BJP government over poladpur bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.