आजीच्या बटव्यातून दोन किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 05:57 AM2019-01-18T05:57:39+5:302019-01-18T05:57:53+5:30

पवई पोलिसांची कारवाई, अटकेच्या भीतीमुळे रक्तदाब वाढल्याने रुग्णालयात दाखल

Two kilograms of Ganja seized from a bag of grandmother | आजीच्या बटव्यातून दोन किलो गांजा जप्त

आजीच्या बटव्यातून दोन किलो गांजा जप्त

googlenewsNext

मुंबई : पूर्वी आजीच्या बटव्यातून औषधे मिळायची. पवई पोलिसांनी केलेल्या कारवाईत मात्र, ६५ वर्षांच्या आजीबाईच्या बटव्यातून दोन किलो गांजा आढळल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भाजीविक्रीच्या आड आजीबाई गांजा विक्री करत होती.

अजगरीबेगम सय्यद अली (६५) असे आजीचे नाव असून, अटकेच्या भीतीमुळे रक्तदाब वाढल्याने पवई पोलिसांनी आजीला रुग्णालयात दाखल केले आहे. पवईच्या मोरारजी नगर परिसरात अली ही आजीबाई तीन मुलींसोबत राहते. यापूर्वी तिच्या मुलीलाही ड्रग्ज तस्करीत शिक्षा झाली होती. ती सात महिन्यांपूर्वी शिक्षा भोगून बाहेर पडली. पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धामुनसे, सपोनि वाघ, गुरव, पोलीस उपनिरीक्षक महामुनी, ढिवरे आणि अंमलदार पवई परिसरात बुधवारी गस्त घालत होते. त्याच दरम्यान मोरारजी परिसरात भाजी विकणाऱ्या अली यांच्या संशयास्पद हालचाली पोलिसांनी हेरल्या.

पोलिसांना तिला येथे काय करते, असे विचारताच, ‘सब्जी बेच रही हूँ बेटा...’ अशी म्हणाली. त्यांनी भाजी बाजूला करताच, तेथे लपवून ठेवलेला बटव्यात दोन किलोचा गांजा आढळून आला. त्यांनी तो ताब्यात घेतला. आणखी शोध घेतला असता, मातीखाली दडवलेली २ लाख ३५ हजार आणि ८३० रुपयांची रोकडही पोलिसांच्या हाती लागली. अटकेच्या भीतीने तिचा रक्तदाब वाढल्याने पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून दोन दिवसांनी डिस्चार्ज मिळताच तिला अटक करण्यात येईल, असे पोफळे यांनी सांगितले.

२० वर्षांपासून ड्रग्जची तस्करी
गेल्या २० ते २५ वर्षांपासून आजीबाई ड्रग्जची तस्करी करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पवई पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध २ गुन्हे आहेत. तर अमली पदार्थविरोधी पथकाकडूनही तिच्यावर कारवाई करण्यात आली होती. यापूर्वी १ ग्रॅम ते २ ग्रॅम गांजासह ती सापडत असल्याने तिची सुटका व्हायची. यंदा पहिल्यांदाच तिच्याकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले आहेत.

Web Title: Two kilograms of Ganja seized from a bag of grandmother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.