त्रिपुरा : शून्य से शिखर तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 01:44 AM2018-03-25T01:44:06+5:302018-03-25T01:44:06+5:30

Tripura: From zero to peak | त्रिपुरा : शून्य से शिखर तक

त्रिपुरा : शून्य से शिखर तक

Next

५-१० नव्हे, तब्बल २५ वर्षांपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता असलेल्या त्रिपुरात पूर्ण बहुमतानिशी भाजपाचा झेंडा फडकला. विशेष म्हणजे या राज्यात सत्ता येण्यापूर्वी भाजपाचा एकही आमदार नव्हता. त्यामुळेच या विजयाचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘शून्य से शिखर तक’ असे केले. हे वर्णन ज्या भाजपाच्या शिलेदाराने सार्थ ठरविले त्या त्रिपुराच्या भाजपा प्रभारी सुनील देवधर यांच्याशी कॉफी टेबल अंतर्गत केलेली ही खास बातचीत.

त्रिपुराच्या घवघवीत यशाचे रहस्य काय?
परिणामांची चिंता न करता सतत कार्यरत राहणे हा भाजपाच्या कार्यकर्त्या$ंचा मूळ धर्म आहे. काम करताना चिंता करत राहिलो तर पराभव अटळ आहे, असे समजूनच मी आणि माझे सर्व सहकारी त्रिपुरात लढत राहिलो. हा आत्मविश्वास कायम ठेवल्यानेच भाजपाने त्रिपुरासह ९० टक्के भागावर वर्चस्व मिळविले आहे. कोणतेही काम करताना प्रामाणिकपणा ठेवला, स्वत:ला झोकून देत कार्यरत राहिलो तर अशक्य गोष्टीही शक्य होतात, हेच या विजयाने दाखवून दिले आहे.

डावे खरे तर कडवट विचारसरणीचे म्हणून ओळखले जातात; त्यांना तुम्ही कसे सामोरे गेलात?
त्रिपुरात काम करताना आम्ही प्रथमत: त्यांची विचारसरणी समजून घेतली; त्यांच्या पक्षाच्या कामकाजाचा अभ्यास केला. गरीब हा गरीबच राहिला पाहिजे, हीच डाव्यांची विचारसरणी असल्याचे दिसून आले. पंचवीस वर्षे डाव्या त्रिपुरात हाच अजेंडा सरकारने राबविला. त्यामुळे त्रिपुराचे नागरिक कमालीचे वैतागलेले होते. ही खदखद निवडणुकीच्या रूपाने बाहेर आली. सीपीएमचे कार्यकर्ते एकच लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून काम करत होते; ते म्हणजे कोणालाच डोके वर काढू द्यायचे नाही.

कोणत्या आव्हानांचा तुम्ही सामना केला?
त्रिपुरात काम करताना संघटना उभी करणे मोठे आव्हान होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी त्रिपुरात ‘आॅनलाइन मेंबरशिप’चा प्रयोग राबविला. हा प्रयोग केवळ त्रिपुरातच नाही तर देशभरात राबविला गेला. पण त्रिपुरात हा प्रयोग राबविणे सोपे काम नव्हते. कारण येथे विजेचा प्रश्न होता. मोबाइल टॉवरचा प्रश्न होता. असंख्य अडचणींना तोंड देत हा प्रयोग त्रिपुरात जबरदस्त यशस्वी ठरला.

आॅनलाइन मेंबरशिपमुळे सदस्यसंख्या किती वाढली?
२००८ साली भाजपाची त्रिपुरातील सदस्यसंख्या केवळ दहा हजार होती. या मोहिमेनंतर ही संख्या पावणेदोन लाखांवर पोहोचली. पावणेदोन लाखांचा डेटा जमा झाल्यावर त्यातील सुमारे वीस हजार सदस्य शेजारच्या राज्यांमधील होते. ते आम्ही वेगळे काढले. त्यानंतर ही संख्या १ लाख ५५ हजारांवर आली. पावती पुस्तकांवरील सदस्य नोंदणीही आम्ही सुरू ठेवली; त्यातून ४५ हजार सदस्य मिळाले. दोन्ही सदस्यसंख्या एकत्रित केल्यावर भाजपाचे दोन लाख सदस्य झाले.

तुमच्या यशात ‘माइलस्टोन’ ठरेल, असा कोणता प्रयोग केला?
आम्ही आणखी एक प्रयोग येथे राबविला. तो म्हणजे ‘मोदीदूत योजना’. आमचा हा प्रयोगही यशस्वी ठरला. त्रिपुराच्या पश्चिम टोकाला आगरतळा आहे. मोदी सरकारने तिथपर्यंत ब्रॉडगेज टेÑन आणली. पूर्वी येथे मीटरगेज टेÑन होती. आगरतळ्याला येणाऱ्या आणि परतणाºया टेÑनमध्ये तुफान गर्दी असते. त्यामुळे या टेÑनच्या माध्यमातून आम्ही संपर्क अभियान सुरू केले. पंतप्रधानांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट प्रिंट केले. कार्यकर्ते ते टी-शर्ट घालून लोकांशी संवाद साधायचे. माणिक सरकारच्या निष्क्रियतेची लक्तरे आम्ही यानिमित्ताने वेशीवर टांगली. आम्ही काय करणार आहोत, हे लोकांना सांगणे सुरू केले. लोकही खुल्या दिल्याने याला प्रतिसाद देऊ लागले.

ट्रेनमध्ये लोकांशी संवाद साधताना काही अडचणी आल्या का?
यातही आम्ही असंख्य अडचणींचा सामना केला. सुरुवातीला लोक बोलायला घाबरायचे. माणिक सरकारविरुद्ध बोलायची हिंमत कोणात नव्हती. मात्र आम्ही हार मानली नाही; आम्ही काम करत राहिलो. दोन वर्षे हे काम सुरू होते. लोकांशी बोलताना ९० टक्के लोक सरकारच्या विरोधात असल्याची खात्री पटली. त्याचेच फलित म्हणजे भाजपाला मिळालेले घवघवीत यश आहे. त्रिपुरात आम्ही ५१ जागा जिंकू, असा विश्वास आम्हाला होता. मात्र सात जागा कमी मिळाल्या. पण ज्या जागा गमावल्या तिथला पराभव अत्यंत कमी मतांच्या फरकाने झालेला आहे.

माणिक सरकारचे अनेक घोटाळेही तुम्ही चव्हाट्यावर आणलेत, त्याबाबत काय सांगाल?
त्रिपुरातील रोझव्हॅली चिटफंड घोटाळा खूप गाजला. हा सर्वात मोठा घोटाळा. त्रिपुरातील गरिबांच्या खिशातील पैशाची लूट करण्यासाठी चिटफंड कंपन्या काढण्यात आल्या. या कंपन्यांना माणिक सरकारचे उघड समर्थन होते. शिवाय सरकारी जमिनी या कंपनीला दिल्या गेल्या. रोझव्हॅलीचा मालक गौतम कुंडूचे माणिक सरकारशी घनिष्ठ संबंध आहेत. या कंपनीत लोकांनी पैसे गुंतवले आणि लोकांचे पैसे बुडाले. या घोटाळ्याची सीबीआय चौकशी झाली, त्या वेळी
माणिक सरकारने यात काहीही घोटाळा नसल्याचे लेखी प्रमाणपत्रच सीबीआयला सादर केले; आणि या प्रकरणावर पांघरुण घातले गेले.

मनरेगातही मोठा घोटाळा झाला, तो कसा बाहेर काढला?
मनरेगा योजनेची कथा तर खूपच सुरस आहे. त्रिपुराच्या एकूण क्षेत्रफळापेक्षाही जास्त क्षेत्रफळाची कामे मनरेगाच्या माध्यमातून झाल्याचे माणिक सरकारने सांगितले. प्रत्यक्षात जेव्हा या कामांचे जिओ टॅगिंग करण्यात आले, तेव्हा हे क्षेत्र दाखविल्यापेक्षा ७ टक्केही भरले नाही. वीस ते पंचवीस वर्षांत येथील सरकारने कोणतेही ठोस काम केले नाही.

त्रिपुराच्या विकासाचा रोडमॅप कसा असेल?
त्रिपुरात पर्यटनवाढीच्या खूप संधी आहेत. धार्मिक पर्यटन येथे अधिक आहे. त्रिपुरा सुंदरी हे शक्तिपीठ पाहण्यासारखे आहे. गोमती नदीवरील बोटिंगही आकर्षण ठरू शकते. अर्धा तास बोटिंग करत गेल्यास दगडात कोरलेली दुर्गेची सुंदर मूर्ती पाहता येते. ऊनकोटी येथे डोंगरात शंभर ते
दीडशे मूर्ती कोरलेल्या आहेत. त्रिपुराच्या राजाचा नीरमहलही पाहण्यासारखा आहे. एकंदर येथील पर्यटनासाठी आम्ही उत्तम मोहीम आखणार आहोत. त्रिपुरात रबर उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. या व्यवसायात सुसूत्रता आणून रोजगारवाढीसाठी अग्रक्रम असणार आहे. त्रिपुरातील बांबूला मोठी मागणी आहे. राष्ट्रीय बांबू धोरणानंतर बांबूची शेती फायदेशीर ठरणारी आहे. फणस, संत्र, अननस, खजूर अशा फळांचे उत्पादन येथे मोठ्या प्रमाणावर होते. या सर्व प्रयत्नातून त्रिपुराला सक्षम बनविण्याचा आमचा मानस आहे. कायदा-सुव्यवस्थेला आमचे प्राधान्य असणार आहे.

मुंबई, महाराष्ट्राचे योगदान
पुण्याच्या अद्वैत कुलकर्णी यांनी येथील छामोनु या दुर्गम भागात काम केले. व्यवसायाने गायक असलेल्या शंभूलाल चकमा या उमेदवाराचा शोधही कुलकर्णी यांचाच. मूळचा बिहारी असलेल्या श्रवण झा यांनीदेखील येथे उत्तम काम केले. विलेपार्ले येथील शिवानंद नाडकर्णी यांनीदेखील पडद्याआड राहून चोख कामगिरी बजावली. सोलापूरच्या राहुल बंडगुडे यांनीदेखील त्रिपुराच्या दुर्गम भागात काम केले. ही नावे तशी प्रातिनिधिक आहेत. खरे तर अशा शेकडो समर्पित कार्यकर्त्यांचा हा विजय आहे.

बहुमोल मार्गदर्शन
आसाम राज्याचे अर्थमंत्री डॉ. हिमंत विश्वशर्मा आणि संघटनमंत्री फणिंद्रनाथ शर्मा यांनी शेवटचे तीन महिने खूप मेहनत घेतली. आसामचे डझनभर आमदार आणि शेकडो कार्यकर्ते शेवटचे २०/२५ दिवस राज्यभर तळ ठोकून होते. त्यांनी तळागाळात खूप काम केले. राष्ट्रीय महासचिव आणि ईशान्य भारताचे प्रभारी राम माधव यांचे मार्गदर्शन बहुमोल ठरले.

जनता ‘पार्टीबाजी’ला त्रासली
त्रिपुरामधील जनता पार्टीबाजीला त्रासली होती. आमच्या तब्बल ५५० कार्यकर्त्यांची डोकी फुटली होती. तर आमच्या अकरा कार्यकर्त्यांचे खून झाले. पण याची जगाला काहीच पडली नव्हती. लेनिनचा पुतळा पाडल्यावर मात्र चर्चा रंगली. ही घटना चुकीचीच होती. मी त्याचे समर्थन करणार नाही. पण तेव्हा काळजीवाहू मुख्यमंत्री माणिक सरकारच होते. त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी होती. आमच्या नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.

चलो पालटाई
बंगाली युवक अनुपम पाल यांनी ‘चलो पालटाई’ ही घोषणा दिली. आम्ही ही घोषणा उचलून धरली. ही घोषणा एवढी गाजली की त्रिपुरा अक्षरश: ढवळून निघाले; जणू वणवा पेटला. डाव्यांची तर पळता भुई थोडी झाली. त्यांची एकही घोषणा आमच्यापुढे तग धरू शकली नाही. लोक एकमेकांना भेटले की ‘चलो पालटाई’ असे म्हणत अभिवादन करू लागले.

हरकती आणि आक्षेप
त्रिपुरातील लोक जेथे वास्तव्यास आहेत; त्यांची माहिती घेत ते निवडणुकीला येणार की नाही, याची खातरजमा केली. माहिती गोळा करून ती आमच्या वॉर रूममधून संबंधित कार्यकर्त्यांना दिली. त्यात महत्त्वाचे म्हणजे मी पत्रकार परिषद घेत आमच्याकडे सगळ्या मतदारांची वस्तुनिष्ठ यादी असून बोगस मतदान करू नका, असा इशाराच दिला. अगदी बूथ स्तरावर मोठे नेटवर्क उभे केले. जेथे हरकती घ्यायच्या तेथे घेत आक्षेप नोंदविले; त्याचा परिणाम चांगला झाला.

वन बुथ टेन युथ
अमित शाह यांचा ‘पन्नाप्रमुख’ फॉर्म्युला हा त्रिपुरात कमालीचा यशस्वी झाला. बंगाली भाषेत आम्ही त्याला पृष्ठप्रमुख म्हणायचो. त्रिपुरात आम्ही बुथप्रमुखही दिले. ‘वन बुथ टेन युथ’ हे काम आम्ही प्रत्यक्षात त्रिपुरात केले. तब्बल ३२ हजार युवकांचा केडर आम्ही उभारला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरदेखील येथे आल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीत आम्ही वीस हजार महिलांचे संमेलन घेतले. तेही यशस्वी ठरले.

बोगस मतदान हाणून पाडले
देशभरात त्रिपुरावासी राहतात. त्रिपुरा विधानसभा निवडणुकांपूर्वी आम्ही त्यांच्याशी संपर्क करून संवाद साधला. त्यांची बिगर राजकीय संमेलने घेतली. त्रिपुरात परिवर्तन व्हावे; अशी त्यांचीही इच्छा होती. डाव्या पक्षांचे सरकार ज्या राज्यात आहे; तेथे बोगस मतदान हमखास होते; हे काही नवे नाही. यंदाही त्रिपुरामध्ये बोगस मतदान होणार हे आम्हाला माहीत होते. पण आम्ही खबरदारी घेत हे सगळे प्रयत्न हाणून पाडले.

(शब्दांकन : सचिन लुंगसे)

 

 

Web Title: Tripura: From zero to peak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.