मिशन मुंबईचा कायापालट! १८७ सुशोभीकरण कामांचा आज प्रारंभ  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 09:32 AM2022-12-08T09:32:36+5:302022-12-08T09:33:05+5:30

महत्त्वाचे रस्ते, चौक, स्कायवॉक, फ्लायओव्हर यांचे सुशोभीकरण करावे, मिशनमोडवर हे काम हाती घ्यावे, असे  निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Transformation of Mission Mumbai! 187 beautification works start today | मिशन मुंबईचा कायापालट! १८७ सुशोभीकरण कामांचा आज प्रारंभ  

मिशन मुंबईचा कायापालट! १८७ सुशोभीकरण कामांचा आज प्रारंभ  

Next

मुंबई : मुंबईच्या वैभवात भर घालेल अशा प्रकारे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेऊन दृश्यस्वरूपात मुंबईचा कायापालट करावा. मिशन मोडवर हे काम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आज, गुरुवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई सुशोभीकरणाच्या सुमारे १८७ कामांचा एकाच वेळी प्रारंभ करण्यात येणार आहे. 

सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशोभीकरण कामांचा आढावा घेतला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह खासदार राहुल शेवाळे, आमदार आशीष शेलार उपस्थित होते.

मुंबईतील सुशोभीकरणाच्या कामाला गेल्या चार महिन्यांत वेग देण्यात आला आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण, कोळीवाड्यांचे सौंदर्यीकरण, आपला दवाखाना यासारख्या निर्णयांमुळे गतिमान मुंबईच्या वैभवात भर पडणार आहे. जी-२० परिषदेच्या बैठका महाराष्ट्रात होत असून, त्यातील पहिली बैठक मुंबईत होणार आहे. हा मान आपल्या राज्याला आणि मुंबईला मिळाला असून, त्यासाठी शहराचा कायापालट करून त्यांचे ब्रँडिंग जोरदारपणे करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

स्वच्छता या विषयाला प्राधान्य देऊन दृश्यस्वरूपात बदल दिसावे यासाठी मुंबई सुंदर करण्यासाठी ५००० स्वच्छतादूतांची नेमणूक करावी, महत्त्वाच्या इमारतींवर रोषणाई करावी, महत्त्वाचे रस्ते, चौक, स्कायवॉक, फ्लायओव्हर यांचे सुशोभीकरण करावे, मिशनमोडवर हे काम हाती घ्यावे, असे  निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

स्कायवॉकवर रोषणाई 
स्वच्छतागृहांच्या कामांना गती द्यावी. त्याचबरोबर पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गावर अद्ययावत स्वच्छतागृहांची उभारणी तातडीने करावी. शहरातील स्कायवॉकवर रोषणाई करावी. स्कायवॉकवर महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

‘यंत्रसामग्री घ्या’
मुंबईतील रस्ते, समुद्र किनारे, शौचालये यांची निरंतर स्वच्छता व्हावी. त्यासाठी महापालिकेने आवश्यक यंत्रसामग्री घ्याव्यात. स्वच्छतेच्याबाबतीत जगातल्या सर्वोत्तम संकल्पना राबवाव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. झोपडपट्टी भागात कम्युनिटी वॉशिंग मशिन संकल्पना अमलात आणावी, असेही त्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी मुंबई सौंदर्यीकरण आराखड्याचे सादरीकरण केले. मुंबईतील रस्त्यांच्या वरच्या थरांचे नूतनीकरण, पदपथ, रस्ते, पूल, वाहतूक बेटं, वॉलपेंटिंग, उद्याने आणि कोळीवाडे यांच्या सुशोभीकरणाची माहिती यावेळी देण्यात आली.

 

Web Title: Transformation of Mission Mumbai! 187 beautification works start today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.