Torture in the toilet, abduction of 12-year-old girl, incident in Govandi | शौचालयात डांबून अत्याचार, १२ वर्षांच्या मुलीचे अपहरण, गोवंडीतील घटना

मुंबई : नृत्य शिकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १२ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून, तिच्यावर सार्वजनिक शौचालयात लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गोवंडीत घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
शिवाजीनगर परिसरात १२ वर्षांची नेहा (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहते. येथीलच परिसरात ती नृत्याच्या क्लासला जाते. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे क्लाससाठी घराबाहेर पडली. याचदरम्यान, दोन इमारतींमध्ये असलेल्या मार्गातून जात असताना, एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाची नजर तिच्यावर पडली. त्याने तिचे तोंड दाबून तिला ओढत जवळच्या शौचालयात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास बदनामीची धमकी दिली.
शिकवणीला न जाता मुलीने तेथून घर गाठले. घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने मुलीला धीर देत, शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
तिच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी तरुणाविरुद्ध पॉक्सो, अपहरण, लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेत, त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.