सिंहासनकार गेले! ज्येष्ठ साहित्यिक, व्यासंगी पत्रकार अरुण साधू यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 06:08 AM2017-09-26T06:08:11+5:302017-09-26T06:12:07+5:30

ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रविवारी सकाळी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

The Throne Gone! Senior journalist and journalist Arun Sadhu passed away | सिंहासनकार गेले! ज्येष्ठ साहित्यिक, व्यासंगी पत्रकार अरुण साधू यांचे निधन

सिंहासनकार गेले! ज्येष्ठ साहित्यिक, व्यासंगी पत्रकार अरुण साधू यांचे निधन

Next

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रविवारी सकाळी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
अरुण साधू यांचे पार्थिव सोमवारी सकाळी वांद्रे कलानगर येथील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. वात्रटिकाकार रामदास फुटाणे, लेखक अच्युत गोडबोले, दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, दिनकर गांगल, लेखक कुमार नवाथे, शिवसेना नेत्या नीलम गोºहे, ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. साधू यांनी देहदान केलेले असल्याने दुपारी त्यांचे पार्थिव जे.जे. रुग्णालयाला सोपवण्यात आले.
मराठीबरोबरच इंग्रजी भाषेवरही चांगले प्रभूत्व असलेल्या साधू यांनी सुरुवातीला ‘केसरी’ व नंतर ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘द टाइम्स आॅफ इंडिया’, ‘स्टेट्समन’, ‘फ्री प्रेस जर्नल’च्या माध्यमातून सुमारे तीन दशके इंग्रजी पत्रकारितेत योगदान दिले. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय ‘टाइम’ साप्ताहिकासाठीही काम केले. वास्तववादी लिखाण करणारा लेखक अशी त्यांची ओळख होती. ‘मुंबई दिनांक’ आणि ‘सिंहासन’ कादंबºयांद्वारे राजकारणासारखा विषय अत्यंत कुशलतेने हाताळला. त्यातूनच ‘सिंहासन’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाची निर्मिती झाली. कथा, कादंबरी, नाटक, ललित अशा विविध साहित्य प्रकारांत त्यांनी मुशाफिरी केली.
साधू यांनी १९९५ ते २००१ या काळात त्यांनी पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान’ पुरस्कार, अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासह अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते.


अरुण साधू यांची साहित्यसंपदा
कादंब-या : मुंबई दिनांक, सिंहासन, झिप-या, त्रिशंकू, बहिष्कृत, मुखवटा, विप्लवा, शापित, शोधयात्रा, स्फोट
कथासंग्रह : एक माणूस उडतो त्याची गोष्ट, कथा युगभानाची (निवडक कथा - संपादिका मीना गोखले), ग्लानिर्भवति भारत, बिनपावसाचा दिवस, बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणाºया इमारती, मंत्रजागर, मुक्ती
नाटक : पडघम
ललित लेखन : अक्षांश-रेखांश, सभापर्व, सहकारधुरीण (चरित्र)
समकालीन इतिहास : आणि ड्रॅगन जागा झाला, जेव्हा ड्रॅगन जागा होतो, फिडेल, चे आणि क्रांती, तिसरी क्रांती

समाजव्यवस्थेचा प्रभावी भाष्यकार
साहित्यातून समकालीन राजकीय-सामाजिक स्थितीचे यथार्थ दर्शन घडवून, मराठी साहित्याला वास्तववादी वळण देणारा लेखक आपण गमावला आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि सामाजिक स्थित्यंतराचे अभ्यासू निरीक्षक असलेल्या साधू यांनी, अनेक सामाजिक प्रश्नांची प्रभावीपणे मांडणी केली. महानगरी जीवनातील व्यथा त्यांनी अचूकपणे मांडल्या. सिंहासन आणि मुंबई दिनांक या कादंबºया वाचकांच्या कायम स्मरणात राहतील. मराठी साहित्याला समृद्ध करतानाच, त्यांनी पत्रकारितेला एक वेगळा आयाम दिला. त्यासोबतच, पत्रकारांच्या नव्या पिढ्या घडविल्या. त्यांच्या निधनाने केवळ एक व्यासंगी पत्रकार आणि लेखकासोबतच पत्रकार घडविणारा प्राध्यापक आपण गमावला आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

व्यासंगी साहित्यिकाला मुकलो
जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणाºया साधू यांच्या, एकाहून एक सरस कलाकृतींनी मराठी साहित्यविश्वात स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले होते. समीक्षक आणि चतुरस्र प्रतिभेच्या अरुण साधू यांनी मराठीत कादंबरी, कथासंग्रह, एकांकिका, नाटक आणि ललित लेखन आदी साहित्यप्रकारांच्या माध्यमातून विपुल लेखन केले. गेली ४० वर्षे सातत्याने समकालाचा वेध घेणारे लेखन त्यांनी केले होते, त्यांच्या निधनाने साहित्य, पत्रकारिता क्षेत्राची हानी झाली आहे.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री

उदारमतवादी लेखक हरपला
पुरोगामी उदारमतवादी लेखक हरपला आहे. साधू यांनी ३० वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत, जागतिक दैनिकांपासून ते साप्ताहिकांमध्ये काम केले. जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत साधू यांनी मराठी वाचकांपर्यंत पोहोचविला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.
- खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस

योगदान स्मरणात राहील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपटाची कथा त्यांच्या लेखणीतूनच पुढे आली. ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्याची संधी आम्हाला मिळाली, हे आम्ही भाग्य समजतो. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आग्रहाखातर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या चरित्राची मांडणी साधू यांनी केली. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे चरित्र मराठीमध्ये ‘सहकार धुरीण’ आणि इंग्रजी भाषेत ‘पायोनिअर’च्या माध्यमातून शब्दबद्ध करण्यासाठी, त्यांनी दिलेले योगदान हे विखे पाटील परिवाराच्या सदैव स्मरणात राहणारे आहे.
- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा

योगदान मोलाचे
अरुण साधू यांनी लेखणीच्या माध्यमातून हिंदी, इंग्रजी आणि मराठी साहित्यात प्रचंड योगदान दिले आहे. शिवाय, पत्रकारितेतही त्यांनी केलेली कामगिरी महत्त्वाची आहे. त्यांच्या लेखनातून ते कायम स्मरणात राहतील.
- सोनिया गांधी, अध्यक्ष, काँग्रेस

एक पर्व काळाच्या पडद्याआड
पत्रकारिता व साहित्य या दोहोंमधले भान सजगपणे जपणारे अरुण साधू यांच्या निधनाने एक पर्वच काळाच्या आड गेले.
- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

पुरोगामित्व अखेरपर्यंत जपले
दर्जेदार साहित्यकृतीतून महाराष्ट्राची पत्रकारिता व साहित्यविश्व समृद्ध करणारे ‘साधू’ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. पत्रकारितेतल्या वास्तव अनुभवांना शब्दबद्ध करून त्यांनी मराठीत अजरामर साहित्यनिर्मिती केली. पत्रकारिता व साहित्याच्या क्षेत्रात येणाºया नवयुवकांसाठी ते मार्गदर्शक होते. मृत्यूनंतर देहदानाच्या निर्णयातून त्यांनी पुरोगामित्व अखेरपर्यंत निष्ठापूर्वक जपले.
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

राजकारणाची समज असलेले विश्लेषक
साधू हे माझे बरेच जुने स्नेही होते. एखादी भूमिका घेणारे आणि त्यावर ठाम राहणारे होते. आमच्या भूमिकांमध्येही बरेच साम्य होते. समताधिष्ठित समाजासाठीचा लोकानुवर्ती विचार हा त्यांच्या लेखनाचा आणि पत्रकारितेचाही मूलाधार होता.
- डॉ. श्रीपाद जोशी, अध्यक्ष,
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

पत्रकारितेची मला ओढ असल्याने त्यानिमित्ताने गप्पा मारायचो. मला संत गाडगे महाराज अरुण साधू यांनी समजावून सांगितले. देवत्व आणि माणूस या विषयावर आमच्या गप्पा व्हायच्या. या भेटीतून मला खूप काही मिळायचे. आपल्या विचारांतून शब्दांतून समाजाला जागे करणारे व्यक्तिमत्त्व अरुण साधू
यांचे होते.
- राजदत्त, दिग्दर्शक

ग्रंथालीच्या चळवळीपासून आम्ही एकत्र होतो. मुंबई दिनांक कादंबरीतून महाराष्ट्राचे राजकारण असो किंवा अंडरवर्ल्ड, त्यांचे वास्तव चित्रण त्यांनी केले. आजही ते इतक्या वर्षांनंतर ताजे वाटते. माणसाच्या मूलभूत प्रवृत्तीला हात घालणारे ते लेखक होते.
- रामदास फुटाणे,
वात्रटिकाकार

पटकथालेखनकार म्हणून ते उत्तम होते. तेंडुलकरांचे आवडते साहित्यिक होते. त्यांच्या लेखनामुळे आणि व्यक्तिमत्त्वामुळे सर्व साहित्य विश्वाचा त्यांना पाठिंबा लाभला. ते अत्यंत मृदू स्वभावाचे होते. त्यांचे काही लेखन वैचारिक, राजकीय आणि चिंतनात्मक आहे. अत्यंत शांतपणे कुठेही वादंग न उठविता सर्जनशीलपणे कायम लिखाण करायचे. स्फूर्ती देणारा लेखक आपल्यातून निघून गेला आहे. - कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार

साधू यांच्याशी खूप जवळचा स्नेह होता. सामान्यांची कळकळ कायम त्यांना होती. त्यामुळे त्यांच्या जाण्याने माझे वैयक्तिक नव्हे, तर महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे.
- अच्युत गोडबोले, साहित्यिक

मराठी, इंग्रजी आणि हिंदी साहित्यविश्वासाठी साधू प्रेरणास्रोत होते. सामाजिक चळवळींमध्ये त्यांनी कायम हिरिरीने सहभाग घेतला. त्यामुळे त्यांच्या जाण्याने अतीव दु:ख होत आहे.
- मनमोहन सरल, कला समीक्षक

Web Title: The Throne Gone! Senior journalist and journalist Arun Sadhu passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई