तीनशे लोकल रद्द, उद्रेकाची भीती; पश्चिम रेल्वेने इतर यंत्रणांना विश्वासात न घेताच केले नियोजन

By मनीषा म्हात्रे | Published: October 30, 2023 05:55 AM2023-10-30T05:55:16+5:302023-10-30T05:55:49+5:30

अपुरे पोलिस, लाखो प्रवासी, कुठे धक्काबुक्की, कुठे तुफान गर्दी

Three hundred local cancellations, fear of outbreak; Western Railway planned without taking other systems into consideration | तीनशे लोकल रद्द, उद्रेकाची भीती; पश्चिम रेल्वेने इतर यंत्रणांना विश्वासात न घेताच केले नियोजन

तीनशे लोकल रद्द, उद्रेकाची भीती; पश्चिम रेल्वेने इतर यंत्रणांना विश्वासात न घेताच केले नियोजन

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: रेल्वेने कसलेही नियोजन न करता, तीनशे लोकल रद्द केल्या. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी. अपुरी बेस्ट व्यवस्था. रिक्षा-टॅक्सी चालकाकडून होणारी लूट आणि स्टेशनवर प्रचंड गर्दीत होणारी रेटारेटी. यामुळे प्रवाशांचा संयम सुटू शकतो. अपुरे पोलिस बळ असताना, पोलिस विभागाला विश्वासात न घेता, पश्चिम रेल्वेने खार-गोरेगाव दरम्यान हाती घेतलेल्या सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होण्याची भीती पोलिसांना वाटत आहे. पोलिस अधिकारी मोकळेपणाने यावर बोलायला तयार नाहीत.

ब्लॉकच्या घोषणेपूर्वीच त्याचा परिणाम लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने अचूक नियोजन करण्याची गरज होती. अतिरिक्त मनुष्यबळ, गर्दीचे व्यवस्थापन, तसेच सुरक्षेचा आधीच विचार व्हायला हवा होता, यावर सुरक्षा यंत्रणांनी बोट ठेवले आहे. मुंबईतील सर्व वाहतूक यंत्रणांशी आधीच चर्चा करणे, रात्रीच्या वेळी काम, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे फेरनियोजन, मेट्रोला फेऱ्या वाढविणे किंवा मध्य रेल्वेची मदत घेत हार्बरच्या फेऱ्या वाढविल्या असत्या, तर ही परिस्थिती आली नसती, पण पश्चिम रेल्वेने त्याचे व्यवस्थापन नीट न केल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत असल्याचे  पोलिसांचे म्हणणे आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीला ३०० पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात आहे. मात्र, सकाळी आणि सायंकाळी पोलिसांची दमछाक होत आहे. प्रवाशांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे.

पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेसाठी सुरु असलेल्या कामामुळे दररोज शेकडो लोकल फेऱ्या रद्द होत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या स्थानकात अशा प्रकारे प्रवाशांची गर्दी आणि कोंडी होत आहे.

महत्त्वाच्या स्थानकांवर लक्ष

रेल्वे स्थानकांतील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र संयम संपत चाललेल्या प्रवाशांकडून कुठे धक्काबुक्की, तर कुठे अंगावर धावून येण्याच्या घटना घडत आहेत. अंधेरी, बोरीवली, मालाड, दादर, कांदिवलीसह महत्त्वाच्या गर्दीच्या स्थानकांवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. गर्दीवर सीसीटीव्हीद्वारेही वॉच ठेवला जात आहे. त्याचप्रमाणे स्थानकात गाडी आल्यावर गोंधळ, रेटारेटी, चेंगराचेंगरी होणार नाही, याचीही काळजी पोलिस घेत आहेत.

गरज नसल्यास गर्दीची वेळ टाळा

लोकलच्या फेऱ्या रद्द झाल्याने त्याचा भार अपरिहार्यपणे अन्य लोकलवर येतो. गर्दी टाळण्यासाठी आम्ही नियोजन करत आहोत, पण गर्दीच्या तुलनेने पोलिसबळ कमी पडते. तरीही भविष्यात होणाऱ्या सुधारणांच्या दृष्टीने रेल्वे, तसेच पोलिसांना सहकार्य करा. नागरिकांनी गरज नसल्यास गर्दीच्या वेळी बाहेर पडणे टाळावे.
- रवींद्र शिसवे, आयुक्त, लोहमार्ग पोलिस.

सुविधा गरजेच्याच

लोकल मुंबईची लाइफलाइन आहे. तिच्या सुविधेसाठी जास्तीतजास्त पावले उचलणे गरजेचे आहे. लोकलने जवळपास ७० लाख, बेस्टने ३५ लाख, रिक्षा-टॅक्सीने दिवसाला ५० लाख प्रवासी जातात. मेट्रोतून सहा ते सात लाख प्रवासी जातात. रेल्वेच्या अतिरिक्त मार्गिकेमुळे लांब पल्ल्याच्या गाड्या स्वतंत्र मार्गावरून जातील. त्यामुळे लोकलचा विलंब टळेल. 
- अशोक दातार, वाहतूक तज्ज्ञ

समन्वय हवाच 

दीर्घकालीन सुविधा मिळतील, म्हणून ब्लॉकच्या त्रासाकडे प्रवाशांनी दुर्लक्ष करायला हवे. या गर्दीवर नियंत्रणासाठी वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणांत एकसूत्रता हवी. समन्वयाचा अभाव असल्यामुळे नियोजनात त्रुटी दिसून येतात. त्यासाठी एकत्रित कामे करणे गरजेचे आहे.
- ए.व्ही. शेणॉय, वाहतूक तज्ज्ञ.

प.रे.ची सध्याची स्थिती

  • रेल्वेकडे होमगार्डसह ६,००० पोलिस बळ
  • पश्चिम रेल्वेवर दररोज १,३९४ लोकल फेऱ्या 
  • ३० लाख प्रवासी रोज प्रवास करतात

 

पोलिसबळ कसे?

  • महिलांच्या डब्यात, ठराविक बंदोबस्तासाठी पोलिस नेमले
  • शिर्डी, तुळजापूरसह इतर ठिकाणी बंदोबस्तासाठी रेल्वे पोलिस 
  • आज ३० ऑक्टोबरपासून ६ नोव्हेंबरपर्यत दररोज ३१६ लोकलच्या तब्बल १,७८३ फेऱ्या रद्द होणार
  • पोलिसांवरील ताण रद्द फेऱ्यांमुळे वाढणार


 

Web Title: Three hundred local cancellations, fear of outbreak; Western Railway planned without taking other systems into consideration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.