कचरा फेकलात, तर दंडाचे पैसे तयार ठेवा; मुंबईत पुन्हा क्लिनअप मार्शल तैनात 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 10:01 AM2024-04-03T10:01:30+5:302024-04-03T10:12:02+5:30

मुंबईत उघड्यावर घाण, कचरा फेकणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी महापालिकेने क्लिनअप मार्शल योजना पुन्हा हाती घेतली आहे.

those who throw dirt and garbage in the open in mumbai they will be fined cleanup marshal are back again in mumbai | कचरा फेकलात, तर दंडाचे पैसे तयार ठेवा; मुंबईत पुन्हा क्लिनअप मार्शल तैनात 

कचरा फेकलात, तर दंडाचे पैसे तयार ठेवा; मुंबईत पुन्हा क्लिनअप मार्शल तैनात 

मुंबई : मुंबईत उघड्यावर घाण, कचरा फेकणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी महापालिकेने क्लिनअप मार्शल योजना पुन्हा हाती घेतली आहे. पालिकेच्या ‘ए’ विभागातून मंगळवारपासून या योजनेची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू झाली आहे. क्लिनअप मार्शल हे ऑनलाइन पद्धतीने दंडात्मक कारवाई करणार आहेत. 

पालिकेच्या आयटी विभागाने ॲपची निर्मिती केली असून, यामुळे मार्शलकडून दंडात्मक कारवाई करताना कोणताही गैरप्रकार होणार नाही, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी राबविलेल्या या योजनेत मार्शलकडून झालेल्या गैरप्रकारांमुळे ही योजना गुंडाळण्यात आली होती. 

कोरोना काळात मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी क्लिनअप मार्शल तैनात करण्यात आले होते. परंतु ते बेकायदा दंड वसूल करत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्यावर त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले. सध्या शहरात क्लिनअप मार्शल नसल्याने रस्त्यांवर अस्वच्छता केली जात असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. 

त्यानंतर स्वच्छता मोहीम व्यापक स्तरावर राबवण्यासाठी स्वच्छतादूत नेमण्यात आले. ते स्वच्छतेबाबत जनजागृती, प्रशासनाला माहिती देऊन स्वच्छतेचे काम करणे, सोसायट्यांमध्ये कचरा वर्गीकरण करण्याबाबत नजर ठेवणे, अशी कामे करत आहेत. परंतु, पुन्हा अस्वच्छता करणाऱ्यांवर लक्ष ठेवत दंडात्मक कारवाईसाठी क्लिनअप मार्शल तैनात केले जाणार आहेत. यासाठी प्रत्येक विभागात प्रशिक्षित मार्शलची नेमणूक केली आहे.

सध्याच्या पद्धतीप्रमाणे कमीत कमी १०० रुपये, तर जास्तीत जास्त एक हजार रुपये इतका दंड आकारण्याचे अधिकार क्लिनअप मार्शल यांना असणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने दंडात्मक कार्यवाही मंगळवारपासून सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी या योजनेला सहकार्य करावे आणि स्वच्छ मुंबईला हातभार लावावा. - डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त

अशी होणार कारवाई-

क्लिनअप मार्शलकडे मोबाइल ब्लू टूथवर चालणारा छोटा प्रिंटर दिला आहे. ते या प्रिंटरद्वारे दंडाच्या रकमेची पावती देणार आहेत. यामुळे नागरिकांना मार्शलकडून  कुठलीही आरेरावी होणार नाही. इतर कोणत्याही छापील पावतीचा वापर केला जाणार नाही. दंडाची रक्कम ही क्लिनअप मार्शल संस्थेच्या बँक खात्यात जमा होणार आहे. 

Web Title: those who throw dirt and garbage in the open in mumbai they will be fined cleanup marshal are back again in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.