मुंबई : अनेक दिवसांपासून नव्या लोकलच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांची प्रतीक्षा सोमवारी अखेर संपणार आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी येथून ही नवीन लोकल मुंबई मध्य रेल्वेच्या ताफ्यात सोमवारी रात्री दाखल झाली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत हार्बर मार्गावरील प्रवाशांना या नव्या लोकल प्रवासाचा मान मिळणार आहे. या लोकलची किंमत ४३ कोटी रुपये आहे.
मेधा बनावटीच्या या नवीन लोकलची क्षमता ताशी ११० किलोमीटर प्रति तास इतकी आहे. हैदराबादस्थित भारतीय कंपनीने या लोकलमधील इलेक्ट्रॉनिक कंट्रोल यंत्रणा तयार केल्यामुळे या लोकलला ‘मेधा’ या नावाने ओळखले जाते. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-२ (एमयूटीपी-२) अंतर्गत बम्बार्डिअर लोकलच्या धर्तीवर मेधा लोकलची बांधणी करण्यात आली आहे. ‘थ्री फेस आयजीबीटी’ या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मेधा लोकल ही ‘अ‍ॅडव्हान्स’ लोकल म्हणून ओळखली जात आहे. मेधा बनावटीची ही लोकल एमयूटीपी-१ आणि एमयूटीपी-२पेक्षा अत्याधुनिक आहे.
रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च २०१८पर्यंत १३ नवीन लोकल मध्य रेल्वेत दाखल होणार आहेत. यासाठी तब्बल ७१४.१० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हार्बर मार्गावरील ९ डब्यांच्या लोकलचा विस्तार १२ डब्यांपर्यंत करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने हा विस्तार होणार असून, यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासी क्षमतेत ३३ टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे, अशी माहिती एमआरव्हीसीच्या सूत्रांनी दिली.