आव्हान दाऊद इब्राहिमच्या टेरर फंडिंगचे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 12:54 PM2022-11-14T12:54:28+5:302022-11-14T12:54:28+5:30

Dawood Ibrahim: कधी काळी नागपाड्याच्या गल्ल्यांमध्ये राडेबाजी करणारा कुख्यात दाऊद इब्राहिम केवळ १९९३ साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून गप्प बसलेला नाही. आयएसआय या पाक हेर संघटनेच्या कच्छपी लागून   टेरर फंडिंग करणाऱ्या दाऊदला लगाम कसा घालायचा, असा पेच सध्या केंद्रीय तपास यंत्रणांना पडला आहे.

The challenge of Dawood Ibrahim's terror funding | आव्हान दाऊद इब्राहिमच्या टेरर फंडिंगचे

आव्हान दाऊद इब्राहिमच्या टेरर फंडिंगचे

Next

- रवींद्र राऊळ
वृत्तसंपादक

कधी काळी नागपाड्याच्या गल्ल्यांमध्ये राडेबाजी करणारा कुख्यात दाऊद इब्राहिम केवळ १९९३ साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून गप्प बसलेला नाही. आयएसआय या पाक हेर संघटनेच्या कच्छपी लागून   टेरर फंडिंग करणाऱ्या दाऊदला लगाम कसा घालायचा, असा पेच सध्या केंद्रीय तपास यंत्रणांना पडला आहे. तीन दशकांपूर्वी सुरू झालेला त्याचा शोध अद्याप सुरूच आहे.
कधी असाध्य आजाराने ग्रस्त असल्याची कंडी पिकवून, तर कधी मुलाला विरक्ती येऊन तो धार्मिक कार्याकडे वळल्याने, हतबल झाल्याची वावडी उठवून दाऊद तपास यंत्रणांची दिशाभूल करीत राहिला. त्यामुळे दाऊद संपला असावा, अशा गैरसमजात पडलेल्या एनआयएला धक्का बसला तो सहा महिन्यांपूर्वी. मालाड येथे हवालामार्फत शब्बीर शेख याला मिळालेल्या २५ लाखांच्या रकमेचा शोध घेता-घेता एनआयए पोहोचली ती सूरतमध्ये. शब्बीर शेखला पाकिस्तानातून दुबईमार्फत ती रक्कम सूरतहून हवालामार्फत मुंबईत पोहोचविण्यात आल्याचे चौकशीत आढळले. 
अधिक खोलात गेल्यावर गेल्या चार वर्षांत दाऊदने तब्बल १३ कोटी रुपये मुंबई आणि परिसरात दहशतवादी कृत्ये करण्यासाठी पाठविल्याचे उघड होताच, तपासयंत्रणा खडबडून जागी झाली. मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांत घातपाती कृत्ये आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्या घडविण्यासाठी दाऊदने ही रक्कम पाठविल्याचे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे.
या साऱ्या प्रकाराची उकल झाल्याने, एनआयएने सप्टेंबर महिन्यात दाऊदची माहिती देणाऱ्यास २५ लाख रुपयांचे रोख इनाम देण्याची घोषणा केली. त्याच्या इतर साथीदारांसाठीही इनाम ठेवण्यात आले आहे, पण ही केवळ औपचारिकता असल्याचे एनआयएलाही चांगलेच ठाऊक आहे. आयएसआयसह लष्कर ए तोयबा, जैश ए महंमद, अल कायदा या दहशतवादी अतिरेकी संघटना दाऊद इब्राहिमला चुचकारण्याची कारणे अनेक आहेत. दाऊदचा भारतात सर्वदूर पसरलेला स्लीपर सेल या संघटनांच्या पथ्यावर पडला आहे. इथल्या वेगवेगळ्या स्तरांत त्याचे हस्तक पसरले आहेत. इथले अंडरवर्ल्ड सिंडिकेट, मनी लॉन्ड्रिंग, शस्त्रांची तस्करी, नार्को आतंकवाद दाऊदच्या मुठीत बंदिस्त आहे. त्याच्यासारखे बळकट नेटवर्क असलेला दुसरा माफिया सापडणे कठीण आहे. संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याने, पाकिस्तानातून बाहेर पडणे ही दाऊदसाठी अशक्यप्राय बाब आहे. म्हणूनच त्याला आता दहशतवादी संघटनांच्या इशाऱ्यावर नाचल्याशिवाय तरणोपाय राहिलेला नाही.

गल्लीबोळात स्लीपर सेलचे आव्हान
    दाऊदचा गल्लीबोळात पसरलेला स्लीपर सेल उद्ध्वस्त करण्याचे आव्हान देशासमोर आहे. मात्र, ते कसे आणि किती कालावधीत पार पाडायचे, याचे कोणतेच नियोजन कुठल्याच तपासयंत्रणांकडे नाही, ही खरी गोम आहे. 
 लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, अल कायदा यांच्याशी असलेला दाऊदचा संबंध पुराव्यानिशी स्पष्ट कसा करायचा, ही आणखी एक अडचण आहे.

बॉलीवूडवर पकड
aदाऊदचा शब्द झेलण्यासाठी बड्या बड्या हस्ती इथे मौजूद आहेत. त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले असले, तरी अजूनही साथीदारांमार्फत बॉलीवूडवर त्याची पकड आहे.
ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रे विक्रीचे त्याचे जाळे कुठल्या पाठबळावर सुरळीत चालते, हे उघड गुपित आहे. देशाच्या सीमेबाहेर मांडी ठोकून बसलेल्या दाऊदच्या इशाऱ्यावर इथली यंत्रणा चोख हलते, यातच इथल्या व्यवस्थेचे अपयश आहे.

Web Title: The challenge of Dawood Ibrahim's terror funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.