टर्मिनल १ चे एलईडीकरण वर्षाअखेरीस पूर्ण; वीज वापरात होणार घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 03:59 AM2018-07-31T03:59:18+5:302018-07-31T03:59:28+5:30

मुंबई विमानतळावरील विजेचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विमानतळाच्या टर्मिनल १ वरील विजेचे सध्या असलेले दिवे बदलून त्या जागी कमी वीज वापरणारे एलईडी दिवे बसविण्यात येत आहेत.

 Terminal 1's LEDization completed by the end of the year; Reduction in electricity usage | टर्मिनल १ चे एलईडीकरण वर्षाअखेरीस पूर्ण; वीज वापरात होणार घट

टर्मिनल १ चे एलईडीकरण वर्षाअखेरीस पूर्ण; वीज वापरात होणार घट

Next

- खलील गिरकर

मुंबई : मुंबई विमानतळावरील विजेचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विमानतळाच्या टर्मिनल १ वरील विजेचे सध्या असलेले दिवे बदलून त्या जागी कमी वीज वापरणारे एलईडी दिवे बसविण्यात येत आहेत. या वर्षाअखेरीस हे काम पूर्ण होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. यामुळे विजेच्या वापरात कमालीची घट होईल, असा दावा करण्यात आला आहे.
टर्मिनल १ वर सध्या ७० टक्के एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. उर्वरित दिवे लवकरच बदलण्यात येतील. टर्मिनल १चे एलईडीकरण डिसेंबर २०१८पर्यंत करण्याचे ध्येय प्रशासनाने समोर ठेवले आहे, तर टर्मिनल २ (टी २)चे सर्व एलईडीकरण २०२० पर्यंत करण्यात येईल. सध्याचे दिवे बदलून एलईडी दिवे लावल्याने व विमानतळ परिसरात सुरू केलेल्या सौरऊर्जा प्रकल्पामुळे वीजबचत करण्यात यश मिळेल, असे सांगण्यात आले.
सध्या टर्मिनल २ वर नैसर्गिक पद्धतीने उजेड येईल व कमी उष्णता तयार होईल, अशी रचना करण्यात आल्याने विजेचा वापर शक्य तितका कमी करण्यात येतो. कमी उष्णता इमारतीमध्ये येत असल्याने वातानुकूलन यंत्रांचा (एसी) वापरदेखील तुलनेने कमी प्रमाणात होत आहे. सध्या विमानतळावर प्रति वर्षी १५ कोटी २० लाख युनिट वापर होतो. टर्मिनल २ वर सन २०१६-१७ मध्ये ७,६०८ एलईडी दिवे बसविण्यात आले, तर सन २०१७-१८ मध्ये १२,५३३ दिवे बसविण्यात आले. सध्या १४,५०० दिवे बदलण्याचे काम शिल्लक राहिले आहे. हे काम पुढील दोन वर्षांत करण्यात येईल व २०२० पर्यंत टर्मिनल २ वरील सर्व दिवे बदलून त्याऐवजी एलईडी दिवे बसविले जातील. विमानतळाच्या परिसरातील ७०० स्ट्रीट लाइट पोलवर एलईडी दिवे बसविलेही आहेत.

३.२ मेगावॅट सौरऊर्जेचा वापर
सध्या विमानतळावर वापरल्या जाणाऱ्या विजेपैकी तब्बल ४५ टक्के विजेचा वापर एसीसाठी केला जातो. एसीचा वापरामध्ये कमी वीज वापरली जावी, यासाठी एसीची नियमितपणे देखभाल केली जाते. रूममध्ये कोणीही माणूस नसेल, तर वीज आपोआप बंद होईल, अशी प्रणाली अंमलात आणली गेली आहे. त्यामुळे विनाकारण विजेचा वापर होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. एसीप्रमाणे नेहमी २३ डिग्री १ डिग्री कमी-अधिक कायम ठेवले जाते. विमानतळ परिसरात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या सौरऊर्जेच्या माध्यमातून सध्या ३.२ मेगावॅट वीज तयार केली जाते. ही क्षमता ४.५ मेगावॅटपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे तेवढा विजेच्या वापराचा खर्च कमी होईल.

Web Title:  Terminal 1's LEDization completed by the end of the year; Reduction in electricity usage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई