तपासाची कागदपत्रे घरी नेणाऱ्या निरीक्षकावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 03:13 AM2019-06-10T03:13:58+5:302019-06-10T03:14:11+5:30

न्यायालयाचे पोलीस आयुक्तांना आदेश : बदलीनंतर सहा वर्षे तपासच नाही

Take action against the investigation inspector at home | तपासाची कागदपत्रे घरी नेणाऱ्या निरीक्षकावर कारवाई करा

तपासाची कागदपत्रे घरी नेणाऱ्या निरीक्षकावर कारवाई करा

googlenewsNext

मुंबई : बदली झाल्यानंतर फसवणूकीच्या गुन्ह्याच्या तपासाची कागदपत्रे स्वत:सोबत नेऊन त्याबाबत पोलीस ठाण्याला काहीच न कळवणाºया पोलीस निरीक्षक जयंत परदेशी यांच्या वर्तणूकीची माहिती पोलीस आयुक्तांना देऊन त्यांच्याविरूद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, असे आदेश महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत.

नऊ वर्षांपूर्वी तरमिंदर खुराणा यांनी त्यांच्यासोबत बनावट दस्तावेजाद्वारे झालेल्या फसवणुकीची तक्रार अनेकदा निर्मल नगर पोलीस ठाण्यात केली होती. मात्र पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही तसेच बनावट कागदपत्रे हस्तगत करणे वा साक्षीदाराच्या जबानी नोंदवणे याबाबत काहीच दखल न घेतल्याने त्यांनी २0१३ साली उच्च न्यायालयात धाव घेतली.
त्यांच्यातर्फे अ‍ॅड. निरंजन मुंदरगी यांनी न्या. एस.बी शुक्रे आणि न्या. एस. सी. धर्माधिकारी यांच्या खंडपीठासमोर बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने याबाबत महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडे दाद मागून खाजगी गुन्हा दाखल करण्याच्या परवानगीचे आदेश ६ आॅगस्ट २0१३ रोजी खुराणा यांच्या वकीलांना दिले. त्यानुसार महानगर दंडाधिकारी आर.एन. आंबटकर यांनी खुराणा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षकांना दिले. निरीक्षक जयंत परदेशी यांच्याकडे हा तपास सोपवण्यात आला.

काही काळाने परदेशी यांची बदली झाली असता ते या गुन्ह्याच्या तपासाची कागदपत्रे घरी घेऊन गेले. खुराणा यांनी गुन्ह्याचा तपास कुठवर आला याची चौकशी करण्यासाठी पाच वर्षे हेलपाटे घातले असता निर्मलनगर पोलिसांनी त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे निराश होऊन त्यांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाद मागितली. त्यांच्यातर्फे अ‍ॅड. सुशील पांडे यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशावरून दाखल झालेल्या या गुन्ह्याच्या तपासाबाबत निरीक्षक परदेशी यांनी आरोपींना वाचवण्यासाठी अक्षम्य हेळसांड करून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे त्यांनी निदर्शनास आणलं. परदेशी यांना पालीस उपायुक्तांसारख्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी अनेकदा सूचना करून ते कागदपत्रे सादर करीत नाहीत, असा अहवाल निर्मलनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक हेमंत गुरव यांनी न्यायालयात सादर केला.

गुन्ह्याचा तपास निर्मलनगर पोलिसांकडे
या प्रकरणाची सुनावणी होत असतानाच ३ जून रोजी परदेशी स्वत: गुन्ह्याच्या तपासाची कागदपत्रे घेऊन न्यायालयात हजर झाले. अ‍ॅड. सुशील पांडे यांनी कागदपत्रांबाबत न्यायालय निर्मलनगर पोलीस ठाण्यास विचारणा करीत असल्याने परदेशी यांनी थेट न्यायालयात हजर होण्यास आक्षेप घेतला. गुन्ह्याचा तपास व्यवस्थित होऊ नये यासाठी प्रदिर्घ काळ त्यांनी आपल्यासोबत कागदपत्रे नेल्याचे त्यांनी युक्तिवादात म्हटले. त्यानंतर महानगर दंडाधिकारी सुधीर शिंदे यांनी परदेशी यांच्या वर्तणूकीबाबत मुंबई पोलीस आयुक्तांनी कारवाई करावी, असे आदेश दिले. दरम्यान या गुन्ह्याचा पुढील तपास निर्मल नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Web Title: Take action against the investigation inspector at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.