रमाबाई आंबेडकरनगरच्या १३,४३५ झोपड्यांचे सर्वेक्षण; याद्या आठ दिवसांत होणार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:15 AM2024-04-10T11:15:32+5:302024-04-10T11:16:21+5:30

घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगरमधील सुमारे १३,४३५ झोपड्यांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.

survey of 13435 huts of ghatkopar ramabai ambedkarnagar the lists will be announced in eight days | रमाबाई आंबेडकरनगरच्या १३,४३५ झोपड्यांचे सर्वेक्षण; याद्या आठ दिवसांत होणार जाहीर

रमाबाई आंबेडकरनगरच्या १३,४३५ झोपड्यांचे सर्वेक्षण; याद्या आठ दिवसांत होणार जाहीर

मुंबई : घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगरमधील सुमारे १३,४३५ झोपड्यांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) उर्वरित झोपड्यांचे सर्वेक्षण या महिनाअखेरपर्यंत पूर्ण केले जाणार असून, त्यानंतर रहिवाशांच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. यातील पूर्व मुक्त मार्गालगतच्या 
१६९४ झोपड्यांच्या प्रारूप याद्या पुढील आठवड्यात प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

रमाबाई आंबेडकरनगर येथील ३३.१५ हेक्टर जागेचा विकास करून तेथील अंदाजे १६,५७५ झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि एसआरए यांच्या माध्यमातून हे पुनर्वसन केले जाणार आहे. एसआरएकडून या भागातील झोपड्यांच्या सर्वेक्षणाला १५ मार्चपासून सुरुवात झाली आहे. या प्रकल्पामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग विस्तार प्रकल्पाकरिता लागणारी जमीन एमएमआरडीएला विनामूल्य मिळणार आहे. 

या भागातील सुमारे दोन हजार रहिवाशांचेही पुनर्वसन केले जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेमुळे एमएमआरडीएला अतिरिक्त ५ हजार घरे उपलब्ध होणार आहेत.

एमएमआरडीएवर बांधकामाची जबाबदारी-

१) एसआरएच्या माध्यमातून या भागातील बाधित झोपड्यांचे सर्वेक्षण, रहिवाशांची पात्रता निश्चिती, जागा मोकळी करून देणे आणि पात्र रहिवाशांना घराचा ताबा देण्याचे काम केले जाणार आहे. 

२) एमएमआरडीएवर पुनर्विकास केल्या जाणाऱ्या इमारतींच्या बांधकामाची जबाबदारी असणार आहे.

३) एसआरएकडून जमीन सर्वेक्षण करून जमीन हस्तांतरित केल्यानंतर एमएमआरडीएकडून कामाला सुरुवात केली जाईल.

Web Title: survey of 13435 huts of ghatkopar ramabai ambedkarnagar the lists will be announced in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.