वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 06:27 AM2019-03-15T06:27:56+5:302019-03-15T06:28:16+5:30

आरक्षणामुळे केवळ पाच टक्के जागा; विद्यार्थी, पालकांची आरक्षण रद्द करण्याची मागणी

Students from open category for medical post-graduate admission | वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची कोंडी

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची कोंडी

Next

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी राज्य आणि केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या आरक्षण धोरणानुसार खुल्या प्रवर्गासाठी अवघ्या पाच टक्के जागा उरणार आहेत. याची प्रवेशप्रक्रिया २५ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांची यामुळे कोंडी झाली आहे. आरक्षणाचा सर्वात जास्त फटका वैद्यकीय प्रवेशांना बसत असून यातून आरक्षण काढून टाकण्याची मागणी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी, पालकांकडून होत आहे.

पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षणामध्ये राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ५० टक्के जागांवरील प्रवेश अखिल भारतीय कोट्यातून होतात. उर्वरित ५० टक्के जागांमध्ये २५ टक्के जागांवर संसदीय आरक्षण दिले जाईल, तर सात टक्के जागा संरक्षण दलातील जवानांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आता आठ टक्के जागा या मराठा आरक्षणासाठी, तर पाच टक्के जागा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील. यामुळे खुल्या प्रवर्गासाठी अवघ्या पाच टक्के जागा शिल्लक राहतील. मुंबई उच्च न्यायालयात वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशांमध्ये असलेल्या आरक्षणाविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र तोपर्यंत पार पडणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी जागांचे गणित प्रवेश परीक्षा कक्षाच्या वेबसाइटवर देण्यात आले आहे, त्यात हे आरक्षण ठेवण्यात आले आहे. यामुळे खुल्या प्रवर्गासाठी जागा कमी होत असून त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय पदव्युत्तरसाठी पात्र असणाऱ्या अंगद रणदिवे या विद्यार्थ्याने दिली.

कोणाच्याही जागा कमी व्हाव्यात हा आमचा उद्देश नाही मात्र सर्वांना समान संधी मिळावी, अशी अपेक्षा अंगद रणदिवे या विद्यार्थ्याने व्यक्त केली. तर खुल्या प्रवर्गात कुणीही अर्ज करू शकतो, त्यामुळे याचा फायदा सर्वांनाच होणार असल्याची प्रतिक्रिया आणखी काही पालकांनी दिली. सध्या ५ एप्रिलपर्यंत पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची पहिली यादी अपेक्षित आहे. तोपर्यंत न्यायालयाचा निर्णय न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊन प्रक्रियेला स्थगिती घेऊ, असे पालक डॉ. सुभाष उदय ढोपळे यांनी सांगितले.

प्रवेशाचा मार्ग खडतर होण्याची भीती
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी देशभरातून १.४८ लाख विद्यार्थी बसत असून महाराष्ट्रातून ७ हजारच्या आसपास विद्यार्थी पात्र ठरतात. या पात्र विद्यार्थ्यांमधून ४ हजारच्या आसपास पुढील कौन्सिलिंग फेरीसाठी पात्र ठरतात. यामधील किमान ३ हजार विद्यार्थी हे खुल्या वर्गातील असल्याने आरक्षणाअभावी प्रवेशाचा मार्ग खडतर होणार असल्याची भीती विद्यार्थ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Students from open category for medical post-graduate admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.